Children's Day 2021 : अज्ञात बाल हुतात्म्यांची ओळख

Children's Day 2021 : अज्ञात बाल हुतात्म्यांची ओळख

- चंद्रकांत शहासने

'मुले ही देवाघरची फुले' असं म्हटलं जातं. आज भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना आपण हेही लक्षात घ्यायला हवं की भारतीय स्वातंत्र्य समराच्या यज्ञात अशा अनेक फुलांच्याही आहुती पडल्या आहेत. सवंगड्यांसोबत लपछपी, हुतुतू खेळण्याच्या वयात ही लहान मुले सवंगड्यांसोबत ब्रिटिश राज्यसत्तेविरोधात मिरवणुका काढत होती, ब्रिटिशांसोबत लपाछपी खेळत होती. आज बालदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही अज्ञात बाल हुतात्म्यांची माहिती आपण घेऊ.

हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे

जन्म: सन 1925

हुतात्मा दिन 24 जुलै 1943

तिरंगा झेंडा घेऊन, ‘भारत माता की जय’ घोषणा देत मिरवणूक काढली म्हणून अण्णासाहेबांस सांगलीच्या तुरूंगात डांबून ठेवले होते. याच वेळी सांगलीच्या तुरूंगात क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकडे, वसंतदादा पाटील, हिंदुराव हेही क्रांतिकारक बंदी होते. अण्णासाहेबांनी एके दिवशी या क्रांतिकारकांसोबत सांगलीच्या कारागृहाच्या तटावरून उड्या मारल्या व पलायन केले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करताना त्यांच्यावर गोळीबार केला. यात गोळी लागून अण्णासाहेबांस वीरमरण आले. यावेळी अण्णा साहेबांचे वय 18 वर्षे होते.

हुतात्मा किसन जगू कुणबी किस

जन्म १९२८

१९४२ साली ‘चले जाव’ घोषणा देत नागपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघत होत्या. याचा राग येऊन पोलिसांनी नि:शस्त्र आंदोलकांना तसेच सामान्य नागरिकांना घरामध्ये घुसून मारझोड करण्याचे तंत्र अवलंबिले होते. याबाबत किसनने दिनांक १३ ऑगस्ट १९४२ रोजी पोलिसांना जाब विचारला, तेव्हा पोलिसांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे किसनला वीरमरण आले. यावेळी त्यांचे वय 14 वर्षे होते.

हुतात्मा कृष्णाबाई किसन रंगारी, अमरावती

जन्म - १९३०

कृष्णाबाईचा जन्म गणेशपूर (अमरावती) येथे झाला. अमरावतीमध्ये १९४२च्या ‘चलेजाव आंदोलनात’ साने गुरुजींनी पुढाकार घेतला. या लढ्यात विद्यार्थ्यीही मोठ्या प्रमाणात सहभागी होते. अशीच एक विद्यार्थ्यांची मिरवणूक १७ ऑगस्ट १९४२रोजी निघाली. अवघ्या 12 वर्षांच्या कृष्णाबाई देखील यात सहभागी होत्या. वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत मिरवणूक चालली होती. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बेधुंद गोळीबार केला. यातील एका गोळीने कृष्णाबाईचा वेध घेतला. गोळीबारात कृष्णाबाईला जागेवरच वीरमरण आले.

हुतात्मा बाळाजी राघोबा रायपूरकर, चिमूर (चांदा)

जन्म: सन१९२६

विदर्भामध्ये स्वातंत्र्यलढा चेतवीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी चिमूर या गावी मोठ्या प्रमाणात उठाव झाला होता. १६ ऑगस्ट१९४२ रोजी चिमूरला जमलेल्या देशभक्त आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात बाळाजी या शूर बालकास वीरमरण आले. या वेळी त्यांचे वय केवळ १६ वर्षाचे होते.

हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी, कोल्हापूर

जन्म: सन १९२५

कोल्हापूरमध्ये १९४२चे ‘चलेजाव आंदोलन’ सर्वत्र पसरले होते. बिंदू तेव्हा ११ वीत शिकत होता. त्यांनी विद्यार्थी सेना उभी केली. १५ ऑगस्ट १९४२ रोजी मिरवणूकीचे नेतृत्व करीत कोल्हापुरातील विद्यार्थ्यांसह बिंदू घोषणा देत निघाला होता. मिरवणूक कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयापाशी पोहोचली आणि अचानक मिरवणुकीवर पोलिसांनी बेधुंदपणे लाठीमार करायला सुरुवात केली. या लाठीमारात बिंदू नारायण कुलकर्णी यास वीरमरण आले. त्यावेळी त्याचे वय केवळ १७ वर्षाचे होते.

हुतात्मा विश्वनाथ दाभाडे, पुणे

जन्म: सन १९२६.

या काळात पुणे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र होते. लहान-थोर देशभक्तीने प्रेरित झाले होते. नऊ ऑगस्ट १९४२ रोजी पुणे शहरात फार मोठा देशभक्तांचा जमाव जिल्हाधिकाऱ्यांकडे जात होता. या जमावास पोलिसांनी अडविले आणि जमावातील देशभक्तांची पोलिसांशी झटापट सुरू झाली. नारायण दाभाडे यांनी पोलिसाची बंदूक देखील हिसकावून घेतली. या वेळी पोलिसांच्या अंदाधुंद गोळीबारात एका गोळीने नारायणाचा बळी घेतला. यावेळी नारायणचे वय सोळा वर्षांचे होते.

(माहिती सौजन्य - कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे)

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे गेली 20 वर्षे भारतीय स्वातंत्र्य समरात योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकरकांच्या माहितीचे संकलन व संपादन करीत आहे. आजवर त्यांच्याकडे दहा हजारहून अधिक क्रांतिकारकांची माहिती व छायाचित्रे जमा झालेली आहेत. सदर माहिती या संग्रहातून घेतलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com