थ्री-बीएचकेच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Consumer purchase 3BHK flat

थ्री-बीएचकेच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल

पुणे : घरातील वाढती सदस्य संख्या आणि कोरोनाकाळात निर्माण झालेल्या मोठ्या घरांची मागणी अद्यापही कायम आहे. घर घेण्याच्या तयारीत असलेल्या संभाव्य ग्राहकांपैकी ४४ टक्के जणांनी थ्री बीएचके घेण्याची तयारी केली आहे. तर ३८ टक्के जणांनी टू बीएचके खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. फोर बीएचकेच्या मागणीचा वाटाही आता सात टक्क्यांपर्यंत वाढल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कोरोनानंतर घर खरेदीचा बदललेला ट्रेंड समजून घेण्यासाठी अनेक संस्थांनी सर्व्हे केले आहेत. त्यातून पुणेकरांची मोठ्या घरालाच पसंती असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ आणि ‘अनारॉक’ या मालमत्ता सल्लागार कंपनीने केलेल्या ‘कन्झ्युमर सेंटिमेंट’ अहवालातून देखील ही बाब समोर आली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून २०२२) घर खरेदीदारांची पसंती समजून घेण्यासाठी या संस्थेने सर्व्हे केला आहे. त्यात देशातील बड्या १४ शहरांमधील २४ ते ७६ वयोगटातील साडेपाच हजार संभाव्य घर खरेदीदारांची पसंती जाणून घेतली. त्यामध्ये प्रथमच टू बीएचकेपेक्षा थ्री बीएचकेच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या पूर्वी केलेल्या सर्व्हेतून फोर बीएचकेची मागणी दोनवरून सात टक्क्यांवर पोचली आहे.

मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील (जानेवारी ते जून २०२१) सर्वेक्षणात ४६ टक्के संभाव्य ग्राहकांनी टू बीएचकेला, तर ४० टक्के जणांनी थ्री बीएचकेडे कल दाखविला होता. वर्षभरातच हा ट्रेंड बदलून ग्राहकांकडून थ्री बीएचके घरांची मागणी वाढली आहे.

नागरिकांनी घरांना दिलेली पसंती (टक्केवारीत)

शहर- वन बीएचके- टू बीएचके- थ्री बीएचके- फोर बीएचके

 • पुणे -११- ४३- ४०- ६

 • मुंबई- २१- ४०- ३७- २

 • बेंगळुरू- ७- ३४- ५१- ८

 • चेन्नई- ७- ४०- ४८- ५

 • दिल्ली- ९- ४२- ४५- ४

 • हैदराबाद- ७- ४९- ४०- ४

 • कोलकता- ७- ४७- ४०- ६

 • इतर शहरे- ८- २२- ६१- ९

२०२२ च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांची पसंती (टक्केवारीत)

 • वन बीएचके - 11

 • टू बीएचके - 38

 • थ्री बीएचके - 44

 • फोर बीएचके - 7

२०२१ च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांची पसंती (टक्केवारीत)

 • वन बीएचके - 10

 • टू बीएचके - 46

 • थ्री बीएचके - 40

 • फोर बीएचके - 4

सर्व्हेविषयी...

 • ५,५०० - सहभागी संभाव्य खरेदीदार

 • १४ - एकूण शहरे

 • २४ ते ७६ - खरेदीदारांचा वयोगट

दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. कोरोनापूर्व सर्वेक्षणाच्या (२०१९ ची पहिली सहामाही) तुलनेत यंदा या घरांच्या मागणीचा वाटा चार टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे विकासकांकडून या किमतीच्या नवीन घरांचा पुरवठा वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत देशातील प्रमुख सात शहरांमध्ये दीड कोटींपेक्षा अधिक किमतीची ३३ हजार २१० घरे विक्रीसाठी लाँच केली होती.

- अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक