esakal | कोरोना झाल्यानंतर चव आणि वास का जातो?

बोलून बातमी शोधा

कोरोना झाल्यानंतर चव आणि वास का जातो?
कोरोना झाल्यानंतर चव आणि वास का जातो?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : चीनपासून उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूने एका वर्षामध्ये संपूर्ण देशाला कवेत घेतलं आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रत्येक जण शक्य होईल त्याप्रमाणे स्वत:ची काळजी घेत आहे. तर पालिका रुग्णालयांमध्येही मोठ्या संख्येने लसीकरण मोहीम राबवली जात आहे. कोरोना विषाणूची सर्वसाधारण लक्षणे आता सगळ्यांनाच ठावूक झाली आहेत. ताप येणं, थकवा, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही कोरोनाची मूळ लक्षणं आहेत. मात्र, या लक्षणांमध्ये तोंडाची चव जाणे व वास न येणे हे प्रमुख लक्षण मानलं जातं. परंतु, कोरोना झाल्यावर तोंडाची चव व वास का जातो हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांमुळेच यामागचं कारण आज आपण जाणून घेऊयात.

कोरोना झाल्यावर प्रथम तोंडाची चव जाते आणि कोणत्याही पदार्थाचा वासही येत नाही. खरं तर अनेक आजारांमध्ये हे लक्षण सहजपणे पाहायला मिळतं. यात फ्ल्यू किंवा ताप आल्यावरही तोंडाची चव जाते. परंतु, कोरोनामध्ये या लक्षणाचं प्रमाण थोडं तीव्र असतं. कारण, फ्लू किंवा ताप आल्यावर जर एखादा पदार्थ नाकाजवळ नेला तर त्या पदार्थाचा हलकासा वास येतो. परंतु, कोरोना झाल्यावर कोणताही तीव्र किंवा उग्र वास येत असलेला पदार्थ नाकाजवळ नेला तरीदेखील वास येत नाही.

हेही वाचा: काळजी घ्या! कोरोना विषाणूची आणखी तीन लक्षणं आली समोर

कोरोनामुळे रुग्णाची चव व वासाची क्षमता पूर्णपणे नष्ट होते?

कोरोना झाल्यावर रुग्णाच्या तोंडाची चव व वास घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते की नाही याविषयी कोणतीही ठोस माहिती नाही. मात्र, काही अभ्यासांमधून एक निकर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार, कोरोना झाल्यावर विषाणू रुग्णाच्या नर्व्हस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्थेवर परिणाम करतात. खरंतर मज्जासंस्थेमुळे वास येणे, चव ओळख या क्रियांमध्ये मदत मिळत असते. मात्र, कोरोनाचे विषाणू याच नर्व्हस सिस्टीमवर हल्ला करत असल्यामुळे चव व वास दोन्ही जातात.

म्युकस प्रोटीन थेरी -

हेल्थलाइन वेबसाइटनुसार, कोरोना विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर शरीरातील जटील पेशींवर त्याचा परिणाम होतो. या पेशींना होस्ट सेल असंही म्हटलं जातं. या पेशींमध्ये ACE2 नामक प्रोटीन असते. हे प्रोटीन खासकरुन नाक व तोंड या भागांमध्ये जास्त असतं. परंतु, कोरोना विषाणूने या पेशींवर हल्ला केल्यानंतर तोंडाची चव जाते व वासही घेता येत नाही, असंही म्हटलं जातं.

कोरोनाचे सौम्य लक्षणे -

कोरोना झाल्यावर चव व वास जाणे या लक्षणांना वैद्यकीय भाषेत एनोस्मिया असं म्हटलं जातं. फ्रान्स, बेल्जिअम आणि इटली येथे २ हजार ५८१ रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. यामध्ये रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ८६ रुग्णांमध्ये चव जाणे व वास न येणे ही लक्षणं आढळून आली होती.