काही दिवसांपूर्वी मी असं ठरवलं, की जोपर्यंत मी पुण्यात आहे माझा हा ‘क्रिएटिव्ह ब्रेक’ सुरू आहे, तोपर्यंत मी असं आपण ज्या गोष्टी आजवर केल्या नाहीत त्या आता करून बघायच्या... ‘करून बघणं’ ही संकल्पना आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवली आहे. प्रा. शामराव जोशी यांच्याकडे मी वाणीसंस्काराचे धडे घेत आहे. ते म्हणतात, ‘करून बघा''! काय हरकत आहे चुकलं तर आणि करून बघता येत नसेल तर बघून करा... परंतु करणं हे महत्त्वाचं आहे. काय सुरेख कल्पना आहे.
या वाक्याचा अर्थ प्रत्येक वेळेला नवनवीन गोष्टी करून बघताना उलगडत गेला. शब्दामागची खोली हळूहळू उमजू लागली. करून बघणं ही थेअरी केवळ अभिनयातच नव्हे तर एरवी आयुष्यातही मी वापरू लागले आहे. नवनव्या गोष्टी करून बघितल्याशिवाय कळणार तरी कशा? आठवड्याचा एक लेख लिहिणं हे तसं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं परंतु करून बघायला लागले तेव्हा आनंद वाटला. विचारांना वाट मिळू लागली. वाट मिळाल्यामुळे विचार होऊ लागला.
अगदी सगळ्याच गोष्टीत मी आता हे वापरू लागल्यामुळे माझ्या लेकालाही सांगते, ‘आज काहीतरी नवीन करून बघ बरं.’ मग कधीतरी माझ्यासाठी या निमित्तानं आयती कॉफी मिळू लागली, तर कधी लिंबाचं सरबत. हे करून बघताना त्याच्या डोळ्यांतला आनंद वाखाणण्याजोगा असतो. कारण यावर टीका होणार नाही हे आधीच कबूल केलेलं असतं. हा एक प्रयत्न आहे हे मी त्याला समजून सांगते.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये हे स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनरसुद्धा करूनच बघतात. लोकांना आवडलं, की त्या फॅशनची स्टाईल होते आणि मग ती ट्रेंडमध्ये येते आणि फसलंच काही तर ते ट्रेंडमध्ये येत नाही इतकंच.. पण करून बघितल्यानं हातून कधीच काही जात नाही. मिळतो तो अनुभवच.. मला विचाराल तर हा अनुभव कुठेही विकत मिळू शकत नाही. तो आपल्याला कमवावा लागतो.
आता स्टायलिंग म्हणजे वेगवेगळ्या कपड्यांबरोबर, रंगसंगतीबरोबर, ब्रँड्सबरोबर किंवा ड्रेसच्या विविध प्रकारांबरोबर नवनवीन प्रयोग करत राहणं. जसे नाटकाचे प्रयोग होतात किंवा अभिवाचनाचे होतात, तसेच फॅशन इंडस्ट्रीमध्येही होतात. खरं सांगू का? असे छोटे मोठे प्रयोग एरवी आपण आपल्या आयुष्यातही करायला हवेत.
कुठल्या प्रकारची ज्वेलरी कशावर घालावी?, कुठल्या साडीवर कशा प्रकारचे दागिने निवडावेत?, किंवा कुठल्या रंगावर कुठल्या रंगाचं संयोजन करावं याचा संभ्रम न ठेवता प्रयोग करून बघायला हवेत. काय होतं, खूप कपडे असूनही आपल्याकडे कपडे नाहीत असं वाटत राहतं. खरंतर यासाठी मिनिमलिस्ट वॉडरोबचा लेख काही दिवसांपूर्वी मी लिहिला आहे.
खरं सांगायला गेलं, तर कपड्यांचं आणि रंगाचं संयोजन करणं याचा आपल्याला कंटाळा असतो. रंगसंगतींबद्दल खेळता आलं पाहिजे. त्याचं संयोजन जमायला हवं. रंगांची गंमत ही न्यारी आहे. एकच एक रंगाच्या कपड्यांचा ढीग लावण्यापेक्षा विविध रंग आपल्या नजरेस दिसायला हवेत.. तेच तेच करण्यानं कार्यक्षमता वाढते असं म्हणतात; परंतु नवनवीन गोष्टींमुळे कलात्मकतेची अनुभूती मिळते. ही कलात्मकता आपल्याला उत्साही ठेवते.
मैत्रिणींनो, हे असे प्रयोग करून बघायला तुम्हाला आवडतील. विविध रंगसंगतींचं संयोजन करताना नवनवीन गोष्टी एकदा तरी ‘करून बघा’ आणि अगदी जमत नसेल, तर रंगसंगतींचं संयोजन देत आहे ते बघून ‘एकदा तरी कराच.’
हे करून बघा
जांभळ्या रंगाच्या साडीवर किंवा मोनोक्रोमॅटिक ड्रेसवर पिवळी ओढणी किंवा ब्लाऊज उठून दिसतो.
नारंगी, ऑरेंज रंगाच्या कापडावर निळा किंवा सी ग्रीन कमाल दिसतो.
बेबी पिंक रंगाची साडी, ड्रेस यांच्यावर मॅचिंग ओढणी किंवा ब्लाऊज घेण्यापेक्षा ग्रीन किंवा सी ग्रीनचा वापर करून बघा.
बरगंडी रंगाबरोबर ऑलिव्ह, नेव्ही, ग्रे, पांढरा रंगाचं आवर्जून संयोजन करा.
कुठलेही कपडे परिधान करताना गडद, गडद आणि फिका रंग असं संयोजन ठेवलं, तर सगळे रंग बॅलन्स होतात आणि सौंदर्य वाढवायला मदत करतात.
खास करून ज्वेलरी, फूटवेअर आणि कपडे निवडताना असा विचार करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.