जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस : या दिवसासाठी २८ तारीखच का निवडण्यात आली ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

periods

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस : या दिवसासाठी २८ तारीखच का निवडण्यात आली ?

लेखन - दीपाली सुसर

मुंबई : सर्वप्रथम २०१४ साली 'वॉश युनायटेड ऑफ जर्मनी' या संस्थेने 'मासिक पाळी स्वच्छता दिवस' साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस दरवर्षी २८ मे रोजी साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस निवडण्यामागेही एक कारण आहे. प्रत्येक बाईचं मासिक पाळीच्या दिवसांचं गणित वेगळं असतं. पण साधारणतः मासिक पाळीचं चक्र २८ दिवसांचं असतं असं जगभरातले डॉक्टर्स आणि वैज्ञानिक मानतात. म्हणूनच मे महिन्यातल्या २८ वा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून वॉश या जर्मनीमधल्या संस्थेने निवडला असावा.

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, मासिक पाळीबद्दलचं मौन तोडून या काळात चांगली स्वच्छता ठेवली गेली तर महिला आणि मुलींचं किती मोठ्या प्रमाणावर सबलीकरण होईल याचा प्रचार करण्यासाठी, त्याची आठवण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यासाठी मासिक पाळीवर काम करणाऱ्या सगळ्या संस्था, सरकारं, खासगी कंपन्या, प्रसारमाध्यमे आणि व्यक्तींनी एकत्र यावे हा या मागचा हेतू आहे.

जागतिक मासिक पाळी स्वच्छता (28 World Menstrual Hygiene Day)

आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील तरुण तरुणी सोबत मासिक पाळीवर मन मोकळेपणानं संवाद केला त्याच्या हा खास अहवाल...

बुलढाण्याची मृणाल सोमनाथ सावळे सांगते की,

"कितनी गिरहैं खोल दी मैने

कितही गिरहै बाकी है"

वरील ओळीप्रमाणे स्त्रीला आजही समाजात स्वतःला सिद्ध करावे लागते. तिच्या असंख्य संघर्षांपैकी मासिक पाळीशी निगडित असलेले सामाजिक आणि शारीरिक गैरसमज हासुद्धा महत्त्वाचा संघर्ष आहे. समाजाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीची नैसर्गिक शरीरक्रिया आहे . त्यामुळे त्याला अशुभ किंवा वाईट समजणं चुकीचं आहे. बऱ्याच मुलींचा आत्मविश्वास पाळीच्या काळात वेगळं बसविणे, मंदिरात प्रवेश नाकारने या कारणांनी कमी होतो.मासिक पाळीच्या वेळी शरीरात होणारे बदल या विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे मुली खूप गोंधळलेल्या असतात. योग्य काळजी स्वच्छता न पाळल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते. आपण सर्वांनी मिळून ही स्थिती बदलावी असा आज world Menstrual hygiene day ला संकल्प करू या.

सुलतानपुर गावाचा वैभव टकले सांगतो की,

मी गावात राहतो. चारचौघात वावरत असताना असे लक्षात येते की मासिक पाळी हा शब्द सर्वांसमोर बोलण्याची किंवा ऐकण्याची अजून आपल्या समाजाला सवय नाही. एवढेच काय तर ज्या स्त्रीला पाळी येते ती स्त्रीसुध्दा यावर मनमोकळं बोलत नाही. पाळी आली की त्यांनी तयार केलेले सांकेतिक शब्द वापरून एकमेंकीना सांगतात. परंतु मी आज त्याच आई, ताई, मावशी , काकू यांना विनंती करतो कृपया यावर मनमोकळे बोला; कारण गावात प्रत्येक जण पाळीबद्दल वाईट काही तरी सांगतो परंतु मासिक पाळी ही ईश्वराचीच देणगी आहे. त्याच पाळीतून बाळ जन्माला घालण्याची अगाध शक्ती स्त्रीजवळ आहे. पुरूष स्वत:च्या पोटी बाळ जन्माला घालू शकतो का ? मग का त्या पाळीला वाईट ठरवून त्या ४ दिवसाला वेगळं काहीतरी असल्याचं का भासवता. त्या ४ दिवसांत स्त्रीवर विविध बंधने लादली जातात. विज्ञानयुगात आपण कुठे आहोत याचा शोध घेण्याचीच गरज आहे. विचार करा जर मासिक पाळीच आली नाही तर कोणतीच स्त्री बाळाला जन्मच देऊ शकत नाही. मग मासिक पाळीला चांगलं म्हणायचे की वाईट म्हणायचे, अहो चांगलीच म्हणायला हवं मासिक पाळीला.

पुढे पुणे जिल्ह्यातील आंधळगावच्या वृषाली रितेश पोपळघट मासिक पाळीविषयी सांगतात,

मासिक पाळीविषयी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाने या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कुठला 'शाप/ विटाळ 'नाही. याची सुरुवात तर आधी घरातून झाली पाहिजे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या विषयावर घरातील व्यक्तीने खास करून पुरुष मंडळी यांनीदेखील याबद्दल जाणून घेऊन मोकळं बोलावं. यावर चर्चा करावी की जेव्हा एक स्त्री अथवा मुलगी प्रत्येक महिन्यातील चार दिवसाला सामोरे जाते तेव्हा तिची काय अवस्था होते हे समजून घेणं फार गरजेचे आहे.

सौ. श्वेता महाले पाटील आमदार चिखली यांनी मासिक पाळीविषयी महत्त्वाचा मुद्दा सांगितला.

त्या सांगतात की "मी एक महिला आमदार म्हणून समाजात वावरत असताना मासिक पाळीसंदर्भातील अनेक गैरसमज आजही समाजात मोठ्या प्रमाणात आहेत हे दिसून येते.

यातील संस्कृती, परंपरा अशा मुद्द्यांव्यतिरिक्त वैज्ञानिकदृष्ट्या मासिक पाळीविषयी समजून सांगणे आणि समजून घेणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे.

आता सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती बघताना जसा संकोच नसतो तसाच मासिक पाळीबद्दल बोलण्यातही आणि वावरण्यातूनही तो नसावा यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं.

सरकारी योजनेतून मिळणारे सॅनिटरी पॅड मिळणे बंद असल्यामुळे महिला, मुलींना ५०-१०० रुपये खर्च करुन मेडिकलमधून सॅनिटरी पॅड खरेदी करावे लागतात. ग्रामीण भागातील गरीब महिला व मुली आता पुन्हा मासिक पाळीच्या काळात कापड वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. ठाकरे सरकारने याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात अधिक स्वतः व दर्जेदार नॅपकिन्स सरकारने पुरवावेत अशी त्यांनी मागणी केली.

पुढे आपल्याला मासिक पाळी व महिलांच्या आरोग्यावर काम करणारे सचिन आशा सुभाष (समाजबंध संस्था) महत्त्वपूर्ण संदेश देतात.

'ते ४ लोक आणि ते ४ दिवस"पाळी येणं म्हणजे Problem नाही; तर उलट पाळी नियमित नाही आल्यावर Problem होऊ शकतो. पाळीला अडचण, Problem म्हणण्यापेक्षा पाळीतील अडचणींविषयी ४ लोकांशी खुलेपणाने बोला आणि पुढे उद्भवणारे आजार वेळीच टाळा.

सरतेशेवटी स्नेहल चौधरी कदम आपल्या सांगतात की,

ज्या मुलीची मासिक पाळी येऊ घातली आहे अशा मुलीला सर्व कुटुंबीय म्हणून पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे.

मुलीची आई, बहीण सोबतच वडील ,भाऊ सर्वांनी मिळून तिला मासिक पाळीविषयी जागृत करायला हवे. जेणेकरून तिचा आत्मविश्वास वाढेल. तिला हिंमत येईल की माझे वडील, माझा भाऊ माझ्यासोबत आहे. त्यामुळे मासिक पाळी हा पुरुष वर्गापासून किंवा समाजापासून लपवण्यासारखा विषय नक्कीच नाही. तिला हा विश्वास असावा की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मला माझ्या कुटुंबातील वडील, भाऊ, नवरा, मुलगा यापैकी कुणीही सहजरित्या पॅड देऊ शकतात. म्हणजे त्या मुलीला किंवा पाळी आलेल्या बाईला मासिक पाळीच्या काळात तितकचं मानसिक समाधान मिळतं की माझं सर्व कुटुंबीय माझ्यासोबत आहे. आणि मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसून मुक्तपणे बोलण्याचा विषय आहे.

Web Title: Deepali Susar Why The World Menstrual Hygiene Day Is Celebrated On 28

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top