आनंदाचा 'ताल '

मला अनेक छंद आहेत. वेळोवेळी मला अनेक गोष्टी कराव्याशा वाटल्या, अनेक गोष्टी करत आले; पण अगदी लहानपणापासूनची गोष्ट सांगायची झाल्यास नृत्य हाच माझा आवडता छंद आहे. मी वयाच्या अकरा-बाराव्या वर्षापासून मी नृत्य शिकायला सुरुवात केली.
आनंदाचा 'ताल '
आनंदाचा 'ताल 'sakal

-छंद माझा

देविका दफ्तरदार

मला अनेक छंद आहेत. वेळोवेळी मला अनेक गोष्टी कराव्याशा वाटल्या, अनेक गोष्टी करत आले; पण अगदी लहानपणापासूनची गोष्ट सांगायची झाल्यास नृत्य हाच माझा आवडता छंद आहे. मी वयाच्या अकरा-बाराव्या वर्षापासून मी नृत्य शिकायला सुरुवात केली. तो छंद जोपासत मी त्याचं शिक्षणही घेतलं. मी ललित कला केंद्रातून डॉ. सुचेता चापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यममधून एमए केलं. त्यामुळे अजूनही नृत्य हाच माझा अत्यंत आवडता छंद आहे. सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे गेल्या काही वर्षांत मी नृत्यावर म्हणावं तितकं लक्ष देऊ शकलेले नाही, शकत नाही; पण कोरोनाच्या काळात शूटिंग बंद होतं, मी जास्त काळ घरी होते, तेव्हा मी नृत्याचा ऑनलाइन क्लास सुरू केला होता. ऑनलाइन एक लाइव्ह परफॉर्मन्सही केला होता. त्या काळात बाहेर जाणं शक्य नव्हतं, सगळे घरातच होते. त्यामुळे त्या काळात मला माझा हा छंद जोपासता आला. सध्याच्या काळात मला नृत्य करायला, भरतनाट्यमच्या सरावाला फारसा वेळ मिळत नाही; पण जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी स्वतःसाठी वेळ काढून माझी मी सराव करते. मला नृत्य सादरीकरण पाहायला आवडतं, मी कार्यक्रमांनाही जाते.

घरच्यांची या छंदात खरंतर खूपच मदत झाली. मला जेव्हा वाटलं, की मला नाच शिकायचा आहे, तेव्हा मला माझ्या आई-वडिलांनी खूप सपोर्ट केला. मी पाचवी किंवा सहावीत असताना क्लास सुरू केला. तो क्लास माझ्या घरापासून दूर होता; पण माझे आई-बाबा नेहमी मला स्कूटरवरून सोडायला यायचे. माझे बाबा ऑफिसमधून कितीही दमून आले, तरी माझे क्लास बुडू नयेत, यासाठी ते मला सोडायला यायचे. तिथं माझ्यासाठी तास दीड तास बसायचे आणि मग मला घेऊन घरी यायचे. आई-बाबांनी माझ्यासाठी खूप काही केलं, त्यामुळेच मी हे करू शकले. ग्रॅज्युएशनला मी माझं अरंगेत्रम केलं, तेव्हा आम्ही खूप मोठा कार्यक्रम केला. अनेक कलाकारांना बोलावलं होतं, माझ्या अनेक नातेवाईकांनाही बोलावलं होतं. मोठं सभागृह त्यासाठी घेतलं होतं. हे केवळ माझ्या आई-बाबांमुळे शक्य झालं. आता माझा नवरा मला खूप सपोर्ट करतो. नृत्य करायला वेळ मिळत नाही, याबद्दल जेव्हा जेव्हा मी दुःख व्यक्त करते, तेव्हा तेव्हा तो मला समजावतो की, अजूनही तू करू शकतेस. उठ आणि आत्ता नाचायला सुरुवात कर. माझे पती, आईवडील या सगळ्यांकडून असं सतत प्रोत्साहन मिळत असल्यामुळेच मी माझा छंद जोपासू शकते.

मला माधुरी दीक्षितच्या ‘एक दोन तीन’ या गाण्यावर नाचायला फार आवडायचं. कोणीही आलं तरी मी त्यांना हाच नाच दाखवायचे. माझ्या घरात कलेचं वातावरण आहे. सुमित्रा भावे माझी सख्खी मावशी. त्यामुळे चित्रपटांची पार्श्वभूमी घरात होती. माझी भावंडं गायक आहेत, एक बहीण नृत्य करते. त्यामुळे लहानपणापासूनच घरात ते कल्चर आहे. भविष्यात या छंदाबद्दल काय करायचं, याबद्दल मी खरंतर फार विचार केलेला नाही. मी शिकत असताना मला भरतनाट्यमसाठी लीला पूनावाला शिष्यवृत्ती मिळाली होती.

त्यासाठी मी लंडनला जाऊन एक महिना शिकले होते. त्यावेळी माझी इच्छा होती, की काही बॅलेज् करायचे; पण मी अभिनयाकडे वळले आणि ते मागेच पडलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून शूटिंगमधून वेळ काढत मी आजही वेळ मिळेल तसा नृत्याचा सराव करत असते. नृत्य या छंदानं मला खूप काही दिलं. नृत्याच्या माध्यमातून मी कला समजून घेतली. नृत्यामधून संपूर्ण शरीराला व्यायाम होतं. ताल आणि लयीचं, संगीताचं ज्ञान मिळतं. अनेक पौराणिक कथा मी ऐकायला शिकले. या कथा शोधणं, त्याचा अर्थ लावणं हे शिकले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला यातून स्वतःला हवं ते करण्याचा आनंद मिळाला.

गेल्या काही काळात मला शिवणकामाचाही छंद लागला आहे. त्याचेही मी क्लास केले. मी लहान मुलींचे फ्रॉक, ड्रेस करायलाही शिकले. वेळ मिळेल तेव्हा या छंदाचंही शिक्षण घेण्याची माझी इच्छा आहे. मला सिनेमे पाहायलाही आवडतं. मी नवनवे सिनेमे, नाटकं पाहते, त्यावर भरपूर चर्चा करते.

तुमचा छंद तुम्हाला जगणं शिकवतो. जगण्यातले अनेक पैलू, आनंद मला माझ्या छंदानं दिल्या. अभिनय क्षेत्रात मी जे काम करू शकले ते माझ्या छंदामुळे. अभिनयाची सुरुवात नृत्यातून झाली असावी, असं मला वाटतं. कारण अभिनय मी नृत्यातूनच शिकले. खूप पाहणं, अनुभव घेणं हे मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे नृत्य करायचे तेव्हा मी अनेक नृत्याचे कार्यक्रम पाहायचे. अभिनय करते, तर मी चित्रपट पाहते. त्यामुळे कोणतंही काम करत असताना पाहणं, अनुभवणं खूप महत्त्वाचं आहे.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर-इंगळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com