मधुमेह असल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे का महत्त्वाचे?

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार हातात हात घालूनच येतात.
Diabetes and High Blood Pressure
Diabetes and High Blood Pressure

डॉ सुजॉय घोष- प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ एंडोक्रिनॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, कोलकाता

गेली दोन वर्षे चाललेला कोविड-१९ महामारीचा कहर हळूहळू ओसरत आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष असंसर्गजन्य आजारांच्या गांभीर्याकडे वेधले जात आहे. मधुमेह Diabetes, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचा झपाट्याने होत असलेला प्रसार भारतासाठी अतिशय चिंताजनक आहे. यावर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या एका शास्त्रोक्त अभ्यासात असे दर्शवण्यात आले आहे की, ग्रामीण तसेच शहरी भारतात मधुमेहाचे प्रमाण १९७२ साली अनुक्रमे २.४% आणि ३.३% व २०१५-२०१९ मध्ये अनुक्रमे १५.०% आणि १९.०% वाढले. या आजाराच्या संदर्भात शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीमध्ये असलेला फरक देखील आता पुसट होत आहे. मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास निर्माण होणारी गुंतागुंत विचारात घेता, आजाराचे लवकरात लवकर निदान करणे आणि त्यावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक आहे. (World Diabetes Day)

मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब, आणि उच्च रक्तदाबाची high blood pressure समस्या उद्भवण्याचा धोका मधुमेही रुग्णांच्या बाबतीत दुप्पट असतो. खरे तर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार हातात हात घालूनच येतात आणि म्हणूनच त्यांना 'विशियस ट्विन्स' किंवा 'दुष्ट जोडी' असे म्हटले जाते. टाईप २ मधुमेहामध्ये इन्सुलिनला प्रतिरोध केला जातो ज्यामुळे रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण वाढते. यामुळे अधिकाधिक इन्सुलिन निर्माण होण्याला उत्तेजना मिळते, परिणामी, शरीरात मीठ व द्राव साठून राहतात आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो. आणखी एक दुसरा घटक म्हणजे, मधुमेहामुळे कालांतराने शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होत जाते, ज्यामुळे उच्च रक्तदाब निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा उच्च रक्तदाब आणि टाईप २ मधुमेह हे दोन्ही आजार असतात तेव्हा हृदयविकार किंवा स्ट्रोक किंवा किडनीचे विकार आणि रेटिनोपॅथी यासारख्या इतर गुंतागुंती होण्याचा धोका खूप जास्त असतो.

म्हणूनच, उच्च रक्तदाब तसेच रक्तातील शर्करेचे प्रमाण या दोन्हींवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनांच्या निष्कर्षांनुसार, मधुमेहींचा रक्तदाब १४०/९० एमएम एचजी पेक्षा कमी असला पाहिजे, अशी शिफारस करण्यात येते. स्ट्रोकचा जास्त धोका असलेल्या मधुमेहींसाठी कमी रक्तदाब स्ट्रोकपासून अधिक जास्त संरक्षण देतो. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण नियमितपणे तपासण्याबरोबरीनेच रक्तदाब देखील नियमितपणे तपासणे अनिवार्य आहे, तसेच या रुग्णांनी आपल्या दिनचर्येमध्ये, जीवनशैलीमध्ये पूरक बदल करणे देखील गरजेचे आहे.

Diabetes and High Blood Pressure
वाढता लठ्ठपणा मधुमेह वाढविण्यास कारणीभूत

खरे तर, रक्तदाबाची तपासणी एखाद्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये करणे योग्य आहे पण नियमितपणे असे करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होईलच असे नाही. कॉम्पॅक्ट ब्लड ग्लुकोज मीटर्स वापरून घरीच रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासले जाऊ शकते, त्याचप्रमाणे डिजिटल बीपी मॉनिटर्स असतात, ज्यांच्या साहाय्याने आपण घरच्या घरी रक्तदाब अगदी सहजपणे मोजू शकतो. पण ही तपासणी जर अयोग्य पद्धतीने केली तर चुकीची रीडिंग्स मिळू शकतात त्यामुळे आपण काळजी बाळगणे आवश्यक आहे. चुकीच्या दृष्टिकोनामुळे बीपी मोजण्यात चुका झाल्यास निदान चुकीचे होतेच, शिवाय चुकीचे किंवा अनावश्यक उपचार केले जाण्याचा देखील धोका असतो.

• रक्तदाब दररोज एकाच प्रकारच्या परिस्थितीत, एकाच वेळी तपासला जावा.

• रक्तदाब तपासण्याच्या आधी पाच मिनिटे शांत बसावे.

• रक्तदाब तपासणी करण्याच्या कमीत कमी अर्धा तास आधी तरी धूम्रपान, काहीही खाणे, व्यायाम करणे टाळावे तसेच चहा, कॉफी किंवा इतर कोणतीही कॅफिनेटेड पेये यांचे सेवन करू नये.

• मूत्राशय पूर्ण भरलेले असल्यास रीडिंग्स जास्त येऊ शकतात, त्यामुळे रक्तदाब तपासणीच्या आधी मूत्राशय रिकामी आहे याची खात्री करून घ्यावी.

• बीपी कफ योग्य आकाराचा असावा आणि उघड्या दंडावर (हातावर कोपराच्या वर) तो योग्य पद्धतीने आणि घट्ट बांधावा.

• रक्तदाबाची तपासणी करताना सरळ बसावे, पाय एकावर एक असू नयेत, पावले जमिनीवर सरळ टेकवलेली असावीत आणि हात हृदयाच्या रेषेत एखाद्या आधारावर ठेवलेले असावेत. रक्तदाब मोजत असताना हालचाल करू नये.

• प्रत्येक वेळी तीन रीडिंग्स घ्यावेत आणि शेवटच्या दोन रीडिंग्सची सरासरी रक्तदाब रिडींग मानली जावी.

घरच्या घरी अचूक रक्तदाब मोजला जावा यासाठी या सोप्या उपायांचे पालन केल्यास आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने खूप मोलाची मदत मिळू शकते. महामारीमुळे टेलीमेडिसिनमध्ये वाढ झाली आहे, डॉक्टरांना उच्च रक्तदाबावर प्रभावी उपचार करता यावेत यासाठी रुग्णांना घरी रक्तदाब मोजता येणे महत्त्वाचे आहे. रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर नियमितपणे लक्ष ठेवल्यास मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हींवर योग्य उपचार केले जाऊ शकतात. त्याबरोबरीनेच नियमितपणे मध्यम तीव्रतेचे व्यायाम करणे, निरोगी आहार घेणे आणि वजन योग्य राखणे, मीठ व साखरेचे सेवन मर्यादित ठेवणे, निकोटीन व अल्कोहोल यांचे सेवन पूर्णपणे बंद करणे यासारखे बदल जीवनशैलीमध्ये घडवून आणल्यास मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. अशाप्रकारे आरोग्याच्या बाबतीत अधिक जास्त गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो आणि अधिक चांगले जीवन जगता येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com