नातीगोती : आदरयुक्त संवाद गरजेचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relations

माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे, की प्रत्येकाची आवड-निवड वेगळी आहे. कुणी कुणावर दबाव आणत नाही. प्रत्येकाच्या आवडीचा मान ठेवला जातो.

नातीगोती : आदरयुक्त संवाद गरजेचा

- दीप्ती देवी

कुटुंबव्यवस्था ही प्रेम, विश्वास आणि प्रोत्साहन या गोष्टींवर अवलंबून आहे. मी माझ्या आईच्या खूप जवळ आहे. मला तिच्यातली सोशिकता, प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याची कला, तिचा आत्मविश्वास, हजार वेळा तुटूनही हजार वेळा पुन्हा स्वतःला जोडून ठेवण्याची क्षमता आणि अविरत शिकत राहण्याची कला खूप भावते. अजूनही ती विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. तिनं भगवद्‌गीता तोंडपाठ केली आहे.

माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे, की प्रत्येकाची आवड-निवड वेगळी आहे. कुणी कुणावर दबाव आणत नाही. प्रत्येकाच्या आवडीचा मान ठेवला जातो. आम्ही चारजण चार ठिकाणी विखुरलेलो असलो, तरी आमचं नातं सैल झालेलं नाहीये. आम्ही ज्यावेळी एकत्र येतो, त्यावेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याबददल चर्चा करतो. एकमेकांना मार्गदर्शन करतो, मदत करतो, गप्पा मारतो आणि अर्थपूर्ण चर्चा करतो.

नातेसंबंध चांगले राहण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. अडीअडचणीला किंवा इतर वेळी चांगला संवाद आणि संपर्क ही नातेसंबंध टिकविण्याची गुरुकिल्ली आहे.

मला पहिल्यापासूनच कुटुंबाचं महत्त्व माहीत आहे. त्यामुळेच मी जमिनीवर आहे. माझ्या कुटुंबातील साधेपणा मला अतिशय आकर्षित करतो. माझं अभिनय क्षेत्र हे इतकं ग्लॅमरस आणि हवेवर उडणारं आहे; पण त्या हवेत उडून न जाण्याची किंवा त्यात वाहून न जाण्याची कला माझ्या कुटुंबानं मला शिकवली आहे. इतर सर्व गोष्टी तात्पुरत्या असतात; मात्र कुटुंब आयुष्यभर तुमच्यासोबत असतं. त्यामुळे त्या गोष्टींना आहे तसं स्वीकारल्याने कुटुंब माझ्या खुप जवळ आलं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठं वादळ आल्यानंतरही कुटुंबीय माझ्या बाजूला उभे होते. त्यामुळे मला माझं कुटुंब सर्वांत महत्त्वाचं वाटतं. माझ्या कुटुंबांतील लोकांना ज्यांच्याबद्दल प्रेम आहे, त्या लोकांनासुद्धा जवळ घेणं, हे मी त्याच्यातून शिकले.

नाती दृढ होण्यासाठी...

  • नाती दृढ होण्यासाठी सुयोग्य संवाद गरजेचा असतो. तुमच्यात कुठलाही पडदा न ठेवता आदराने संवाद साधायला हवा.

  • उत्तम ऐकण्याची कला हवी. उत्तम निरीक्षणही हवं.

  • जवळच्या व्यक्तीने सांगण्याच्या आधीच आपल्याला त्यांच्या मनातील गोष्ट ओळखता आली पाहिजे.

  • कुटुंबातील व्यक्तींना आनंद होईल म्हणून चार गोष्टी मनापासून कराव्यात.

  • आई-बाबा, आजी- आजोबा यांचे आनंदाचे क्षण वेगळे असतात. ते आपण स्पेशल करावेत. वेळ मिळेल तेव्हा त्यांच्याशी जवळीक साधणे. त्याना आपला आधार वाटला पाहिजे, अशी जबाबदारी घेणे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

टॅग्स :Relationslifestyle