हिंमते मर्दा तो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Sanjay watve writes tired man cannot break the vortex himself motivation life

हिंमते मर्दा तो...

- डॉ. संजय वाटवे

खचून गेलेल्या माणसाला स्वतःला भोवरा तोडता येत नाही. त्याला बाहेरनू खेचून काढावा लागतो. नाहीतर बसतो गटांगळ्या खात. पण याच्यासाठी तर समाज हवा! एकटयाला थोडंच व्यवस्थित जगता येतं? जयमल्हार कर्डिले ही अशीच एक केस.

जयमल्हार माझ्याकडे एक तरुण पोराला घेऊन आला होता. जयमल्हार पायजमा, सदरा, मोठा चेहरा, कपाळाला गंध, मध्यम बांधा; पण देहबोली, रुबाबदार. आत आल्याआल्या मला वाकून नमस्कार केला. ‘‘ओळखलं का डॉक्टर? मी तुमचा जुना पेशंट आणि एक भक्त! माझ्याचसारखी अवस्था या पोराची आहे. म्हणून तुमच्याकडं आणलाय.’’

मला काही आठवेना. मला जयमल्हारनं त्याची स्टोरी सांगायला सुरुवात केली. तो १५-१६ वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. खूप विमनस्क अवस्थेत. तो मंचरजवळच्या खेडेगावात राहायचा. घरी अठराविश्वं दारिद्रय, शिक्षण फारसं नाही. मंचरला एका पेढीवर मोलमजुरी करायचा.

मला काही आठवेना. मला जयमल्हारनं त्याची स्टोरी सांगायला सुरुवात केली. तो १५-१६ वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. खूप विमनस्क अवस्थेत. तो मंचरजवळच्या खेडेगावात राहायचा. घरी अठराविश्वं दारिद्रय, शिक्षण फारसं नाही. मंचरला एका पेढीवर मोलमजुरी करायचा. पेढीचा दुकानदार शेतकऱ्यांकडून टोमॅटो, कांदा, बटाटा खरेदी करायचा आणि चाकण किंवा खेडच्या बाजारात नेऊन घाऊकमध्ये विकायचा.

जयमल्हार त्यांच्याकडे पोती उचलून ट्रकमध्ये टाकायचं काम करायचा. मालक पोत्यामागे एक रुपया द्यायचा, अशी काय कमाई होणार! शिक्षण नाही, नोकरी नाही, दातावर मारायला पैसा नाही. पुढे सगळा अंधार आणि अंधार! म्हणून तो खचून गेला होता. काम कसंतरी रेटायचा; मन पार उदास झालं होतं. अवसान, हिंमत, आत्मविश्वास संपला होता. फार वाईट अवस्थेत दिवस ढकलत होता- आशा नसताना.

त्याचा चाकणचा काका थोडा शिकलेला होता. तो जयमल्हारला घेऊन माझ्याकडे १५-१६ वर्षांपूर्वी आला होता. जवळजवळ ४-६ महिने ट्रीटमेंट चालली होती. हळूहळू मल्हार सुधारत गेला. त्याची गेलेली उमेद, कार्यशक्ती, आत्मविश्वास, उत्साह परतला.

...पण नुसतं नॉर्मल होऊन, हिंमत येऊन काय फायदा? नशीबही उघडायला पाहिजे ना! अखेरीस जयमल्हारच्या आयुष्यात तो कलाटणीचा दिवस आला.

पेढीचा मालक खूप खचून गेला होता. टोमॅटोंनी ट्रक खच्चून भरला होता. कारण त्याचा नेहमीचा ड्रायव्हर दशरथ भांडणामुळे आलाच नाही. निरोप पाठवले, तर पिऊन पडलेला! ‘येणार नाही’ म्हणाला. मालक म्हणाला, ‘‘जयमल्हार तुझा कुणी मित्र ड्रायव्हर आहे का? हातापाया पड, जास्त पैसे दे; पण धरून आण. आजच्या आज माल नाही गेला तर खराब होणार. माझं हजारो नाही, लाखांच्या आतबाहेर नुकसान होणार.’’

जयमल्हार मला सांगत होता, ‘‘मी २-३ ठिकाणी खेटे घातले. कोणी मिळेना. मालक घायकुतीला आला, रडायला लागला. मग मीच भितभित मालकाला म्हणालो, ‘मालक मी नेऊ का गाडी चाकणला?’ माझ्याकडे लायसन्स नव्हतं, ट्रक कधी चालवला नव्हता, होती फक्त डेअरिंग!

मालकांनी खूप विचार केला; पण काही इलाज नव्हता. माझ्या हाती त्यांनी गाडीच्या किल्ल्या दिल्या. फक्त डेअरिंगच्या जीवावर गाडी चाकण बाजारात नेऊन अडत्याकडे पोच केली आणि परत आलो. मालक इतका खूश झाला, की त्यांनी मला एक हजार रुपये बक्षिसी दिली. डॉक्टरसाहेब, तेव्हा हजार रुपयेसद्धा फार होते.

‘‘मग मी रीतसर ट्रक चालवणं शिकून घेतलं, लायसन्स काढलं आणि ट्रकवर चाकणला जायला लागलो. काही खेपा झाल्यावर मी मालकाला म्हणालो, ‘साहेब, बाजारात भाव खूप वरखाली करतात, सौदेबाजी, लिलाव चालतो. तुम्ही अडत्याशी भाव ठरवता, मी ट्रक पोचवतो. आज मी लिलाव करू का?’

करताकरता मालक तयार झाला. माझ्या चाकण बाजारात ओळखी झाल्याच होत्या. मी मालकाला खूप चांगली किंमत मिळवून दिली. नफा मालकाच्या पायावर घातला. माझी सचोटी आणि धंद्यातली हातोटी पाहून मालक खूप खूश झाला. मला मोठी बक्षिसी दिली. हजार- दोन हजार नव्हे, त्याहून मोठी! मला पेढीत एक आणा भागी करून घेतलं..

‘‘मग मी मागे वळून पाहिलंच नाही. अत्यंत कष्टाने धंदा खूप वाढवत गेलो. पेढीचं नाव टॉपला नेलं. माझा मालक वयानुसार पेढीचं काम कमी करत गेला. माझ्यावर सोपवत गेला. साहेब, ७-८ वर्षे झाली. आता मीच पेढीचा मालक झालो आहे आणि मालक मला बापासारखा मिळाला. मीही त्याचं मुलासारखं करतो.

‘‘तुमची शेवटची औषधाची चिठ्ठी पेढीच्या ऑफिसच्या टेबलाच्या खणात फ्रेम करून लावली आहे. तुम्ही जर मिळाला नसतात तर अजूनही मी पोती उचलत बसलो असतो. साहेब आता मी मालक आहे आणि हा पोऱ्या पोती उचलतो. माझ्या मालकांनी मला घडवलं, आता मी याला घडवणार.’’

मी थक्क होऊन ही स्टोरी ऐकत होतो, आज मी अजून एक असामान्य सामान्य बघत होतो. एकेकाळी खचून गेलेला जयमल्हार आज दुसऱ्याचा उद्धार करायला बघत होता. आत्मविश्वास, हिंमत, अवसान हे गुण असल्यामुळे जयमल्हार जिंकला होता. जय हो!!