हॅप्पी पेरेंटिग : ऑनलाइन ‘बिन’लाइन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Parenting

कोविड-१९ च्या साथीने चांगले काय झाले असेल, तर शिक्षण क्षेत्रात ‘डिजिटल क्रांती’ झाली. अगदी तीन वर्षाच्या चिमुरड्यापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळे ऑनलाइन शिकत होते.

हॅप्पी पेरेंटिग : ऑनलाइन ‘बिन’लाइन!

कोविड-१९ च्या साथीने चांगले काय झाले असेल, तर शिक्षण क्षेत्रात ‘डिजिटल क्रांती’ झाली. अगदी तीन वर्षाच्या चिमुरड्यापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळे ऑनलाइन शिकत होते. माहितीचे प्रचंड भांडारच जणू प्रत्येकाच्या घरात आले आहे. मुले स्वतःच्या गतीने शिकू शकतात, तेही आकर्षक मांडणी केलेल्या व्हिडिओजमुळे आणखीन आनंददायकही ठरतंय! विशेषतः अध्ययन अक्षमता असलेला मुलांनाही तंत्रज्ञानाची मदत खूपच उपयोगाची होत आहे. परंतु जशी मुले परत शाळेत जाऊ लागली, तसे या ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणामही जाणवू लागले.

समस्या

 • मुलांना समाजात, मिसळण्याची गरजच जाणवत नाही आहे. मी आणि माझा संगणक/ मोबाईल अशा छोट्याशा जगात रहाणे त्यांना आवडू लागते.

 • विशेषतः शिशूवयातील मुलांचा विकासाच्या सगळ्याच आघाड्यांवर (शारीरिक, भाषाविषयक, सामाजिक, भावनिक) विकास खुंटला आहे. स्वमग्नते‌ची लक्षणे अनेक मुलांमध्ये दिसू लागली आहेत. मित्र नकोसे झाले आहेत.

 • ऑनलाईन शिक्षणात ‘माहिती’ भरपूर मिळतील; पण ज्ञान आणि त्यातून समज निर्माण होत नाही आहे. एका हुषार मुलाने विश्व, ग्रह, तारे, आकाशगंगा इतकंच काय, तर कृष्णविवराबद्दल विस्तृत माहिती पटापट सांगितली; पण या प्रकारात बिचाऱ्याला दिवस-रात्रीतला फरक समजेनासा झालाय. रात्री एक-दोन वाजेपर्यंत त्याचे संगणकावर ‘माहिती संकलन’ चालू असते.

 • अनेक शिक्षक कळवळून सांगत आहेत, की या मुलांचे लेखनकौशल्य विकसित झालेले नाही आहे. शुद्धलेखनाच्या, स्पेलिंगच्या चुका वाढल्या आहेत.

 • मुलांचे मोकळ्या हवेत खेळणेच थांबले आहे. त्यातून शारीरिक विकास, प्रतिकारशक्ती, उत्साह सगळ्यावरच वाईट परिणाम होतोय!

उपाय

 • ऑनलाइन शिक्षण आता ‘वास्तव’ आहे. त्याचा स्वीकार करताना ‘हायब्रीड’ मॉडेल (शाळा + ऑनलाइन) विचारपूर्वक विकसित केले पाहिजेत.

 • मुले मोकळ्या हवेत भरपूर खेळाली पाहिजेत.

 • मुलांचा हस्तकौशल्यांना जाणीवपूर्वक प्रोसाहन दिले पाहिजे.

 • फक्त ‘माहिती संकलनाच्या’ प्रकल्पांपेक्षा त्यावर ‘विचार’ करायला शिकवले पाहिजे.

 • पहिली पाच वर्षे ऑनलाईन शिक्षणाची ‘गरज’ नाही.

 • पालकांनी स्वतःचा ‘ऑनलाइन’ वेळ मर्यादित केला पाहिजे.