
शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
संवाद हा कोणत्याही नात्याचा एक मुख्य भाग असतो. जितका संवाद उत्तम, तितकेच ते नाते उत्तम, असे म्हटले तरी हरकत नाही. म्हणून कोणतेही नाते सुदृढ करण्याकरता फक्त संवाद नव्हे, तर सुसंवाद असणे आवश्यक आहे. पण सुसंवाद म्हणजे नक्की काय? तर प्रभावी, सकारात्मक, आदरयुक्त आणि संवेदनशील संवाद म्हणजे सुसंवाद. कोणत्याही नात्यामध्ये, संवाद किती सहज आहे, तणावमुक्त, भीतीमुक्त आहे, आणि किती संवेदनशील आणि आदरयुक्त आहे, या सर्व गोष्टींचा त्या नात्यावर प्रभाव पडत असतो. म्हणून सुसंवाद हा सुदृढ नात्याचा पाया असतो. मग ते, नवरा-बायकोतील नाते असो, बहीण-भावंडातले असो, मित्र-मैत्रिणीतले नाते असो, पालक आणि मुलांमधले नाते असो, किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींबरोबरील नाते असो. नाते कोणतेही असो, ते चांगल्या पद्धतीने अनुभवण्यासाठी सुसंवाद अनिवार्य आहे.