‘सुगंधी’ व्यक्तिमत्त्व

योग्य सुगंध आनंददायी भावना निर्माण करू शकतात आणि मानसिक आरोग्यातही सुधारणा घडवून आणू शकतात.
Fragrant Personality
Fragrant Personalitysakal
Updated on

योग्य सुगंध आनंददायी भावना निर्माण करू शकतात आणि मानसिक आरोग्यातही सुधारणा घडवून आणू शकतात. ‘सुगंध झोनिंग’चा वापर आपण स्वतःला नेहमी ताजतवानं ठेवण्यासाठी केला पाहिजे. आता ‘सुगंध झोनिंग’ ही संकल्पना काय आहे, तर आपण घरातल्या वैयक्तिक जागा वेगळ्या राहतील याची खात्रीपूर्वक काळजी घ्यायला हवी.

आपल्या घरामध्ये देवघरासाठी, कामासाठी, झोपण्यासाठी अशी विभागणी आपण करतो, तेव्हा तिथल्या वातावरणनिर्मितीसाठी तसा सुगंध वापरला, तर ती जागा ठराविक कार्यासाठी आपण अधिक कार्यरत करू शकतो. यामुळे आपली कार्यक्षमता आणि स्थैर्य वाढतं.

कामाच्या ठिकाणी उत्साह देण्यासाठी किंवा अभ्यासाच्या ठिकाणी सात्विकता येण्यासाठी चंदन, अष्टगंध यांसारखे भावात्मक सुगंध असावेत. तसंच झोपताना आपल्या बेडरूममध्ये शक्यतो फुलांचा सुगंध असावा. जास्मिन किंवा लव्हेंडर यांसारख्या फुलांचा सुगंध तणाव आणि नैराश्याशी लढण्यास मदत करतो.

तुम्ही सतत उत्साही, प्रसन्न, सकारात्मक राहावं यासाठी सुगंध काम करतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर निश्चितपणे याची काळजी घ्यावी. हॉलमध्ये सिट्रस किंवा फ्रुटी असे सुगंध वापरावेत. जसं की, संत्र, लिंबू ,मोसंबी याला जो नैसर्गिक मंद सुगंध आहे तो रिफ्रेश करणारा असतो.

सुगंधाचा संबंध खूप खोलवर असतो. सुगंध हा स्मृती आणि भावनांशी अद्वितीयपणे जोडला जातो. सुगंधामुळे शक्यतो आनंददायी आणि सुखद आठवणी या दीर्घकाळ राहतात. इतर ज्ञानेंद्रियांमधून निर्माण झालेल्या आठवणींपेक्षा सुगंधाच्या आठवणी ठळक असतात, हे शास्त्रीयरित्या स्पष्ट झालं आहे. मला कायमच लिहिताना बऱ्याच गोष्टी आठवतात.

आमचा चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ लवकरच प्रदर्शित होतोय, त्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी आळंदीला माऊलींच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. तिथे माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर खूप हलकं वाटलं. मन एकाग्र झालं. मला असं वाटतं याचं कारण असं, की तिथला ‘सुगंध’ तुमच्या मनात शांतता निर्माण करतो.

ठराविक सुगंधांमुळे त्या ठिकाणाची, वातावरणाची, ऋतूची ,एखाद्या व्यक्तीची आठवण ही कायमस्वरूपी स्मरणात राहणारी असते. तसंच मोगरा म्हटल्यानंतर मला माझ्या शाळेतल्या मैदासे बाईची आठवण येते. त्या कधीतरीच गजरा माळून यायच्या; परंतु त्याची आठवण मात्र कायमस्वरूपी मनात दरवळते.

तसंच बऱ्याचदा आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आपल्याला सुगंध आकर्षित करत असतात, जसं की तुम्ही आत्मविश्वासू असाल तर अधिक तीव्र, खोल बेसकडे जाणारे सुगंध तुम्हाला आकर्षित होऊ शकतात. सुगंध निवडताना तीव्र खोल, ताजेतवाने, नैसर्गिक शुद्ध, दीर्घकाळ टिकणारे अशी विभागणी होऊ शकते. व्यक्तिमत्व प्रभावी करायचं असेल, तर योग्य सुगंधाची निवड आपण करायला हवी.

आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या एक गंध असतो. त्याला ‘फेरोमोन’ म्हणतात. त्या नैसर्गिक गंधाला सूट करणारा परफ्यूम किंवा अत्तर वापरायला हवं. हे सुगंध शरीरावर स्प्रे केल्यानंतर काही वेळानं किंवा तासानं आपल्याला उग्र वाटत नसतील तर ते आपल्यासाठी योग्य आहे असं समजावं. शिवाय ऋतूनुसार वेगवेगळ्या परफ्युम्सची आणि अत्तरांची निवड करायला हवी.

उन्हाळ्यामध्ये लाईट फ्रेश, फ्लोरल किंवा सिट्रस सुगंध वापरावेत. शिवाय औपचारिक व अनौपचारिक कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स असावेत. परफ्युमची खरेदी करताना अजिबात घाई करू नये. तो मनगटावर मारल्यानंतर थोडा वेळ सेटल होऊ द्यावा. पंधरा ते वीस मिनिटांनंतर पुन्हा सुगंध घेतल्यानंतर, आपल्याला सूट करेल की नाही याची शहानिशा करावी.

परफ्युम दीर्घकाळ टिकतात. उच्च दर्जाचं अत्तर हाही योग्य पर्याय असू शकतो आणि बॉडी मिस्ट आपण शरीरावर मारू शकतो. परफ्युम्स उत्तम दर्जाचेच असावेत. वाईट दर्जाचे परफ्युम किंवा बॉडी स्प्रे त्वचेची पीएच लेव्हल खराब करू शकतात.

हे लक्षात ठेवा

  • स्त्रियांनी फ्लोरल फ्रुटी किंवा सिट्रस पद्धतीचे परफ्युम्स वापरावेत.

  • दिवसा किंवा उन्हाळ्यामध्ये ताज्या पानांचा म्हणजेच ग्रीन फ्रेग्रन्स वापरावा. हा स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठीही असू शकतो.

  • औपचारिक कार्यक्रमांसाठी woody सुगंध असलेले परफ्युम्स वापरू शकतो. हे देखील स्त्री-पुरुष दोघांसाठीही असू शकतात.

  • नैसर्गिक सुगंध देणारे परफ्युम्स म्हणजेच oceanic हे जॉब इंटरव्ह्यूसाठी वापरू शकता.

  • किचनमधल्या म्हणजेच मसाल्याचा सुगंध देणारे पदार्थ जसं की आलं, दालचिनी, वेलची, लवंग हे स्पायसी सुगंध म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारचे परफ्युम्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रयोग म्हणून त्यांचा वापर करून बघू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com