esakal | गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट

बोलून बातमी शोधा

गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट

प्रत्येक मराठी माणसाच्या घरापुढे आज गुढी उभारलेली दिसेल

गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट
sakal_logo
By
शर्वरी जोशी

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कोणताही सण असो वा उत्सव येथे प्रत्येक गोष्ट मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरी केली जाते. यापैकीच एक सण म्हणजे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसाने होते. त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस त्याच्या दारपुढे गुढी उभारुन हा दिवस साजरा करतो. खरं तर प्रत्येक जण दारापुढे गुढी उभारतो. परंतु, ही गुढी का उभारली जाते किंवा तिचं महत्त्व काय हे फार कमी जणांना माहित असतं त्यामुळेच गुढी पाडव्याचं नेमकं महत्त्व काय ते आज जाणून घेऊयात.

गुढी पाडवा हा सण सांस्कृतिक व धार्मिक गोष्टींसोबतच पर्यावरण व निर्सगाशीही जोडला गेला आहे. गुढी उभारतांना आपण कायम त्या गुढीवर कडुलिंब व आंब्याच्या पानांचं तोरण लावतो. त्यानंतर ही पानं खाल्लीदेखील जातात. परंतु हे तोरण का लावण्यात येतं किंवा ही पानं का खावीत हे फार कमी जणांना माहित आहे. वसंत ऋतू सुरु झाला की उन्हाच्या झळा बसू लागतात. परिणामी, या काळात उष्णतेचे विकारही सुरु होतात. हे उष्णतेचे विकार होऊ नये वा उन्हाळा बाधू नये यासाठी कडुलिंबाची पानं खाल्ली जातात. 

गुढी पाडव्याचं दुसरं महत्त्व म्हणजे हा दिवस. ही संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे. ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो दिवस म्हणजे 'गुढी पाडवा' असंही म्हटलं जातं. या दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे अनेक जण नवा व्यापार किंवा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी याच दिवशी करतात.

गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व
 

प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर ज्या दिवशी ते अयोध्येत दाखल झाले. तो दिवस म्हणजे गुढी पाडवा. राम, सीता आणि लक्ष्मण हे तिघे आयोध्येत आल्यानंतर अयोध्यानगरीतील प्रत्येकाने त्यांच्या स्वागतासाठी दारापुढे रांगोळ्या, तोरणे, गुढ्या उभारल्या होत्या. त्यामुळे ही गुढी म्हणजे विजयाची, आनंदाची आणि मांगल्याचं प्रतिक मानली जाते.

गुढी पाडव्याची आहे आणखी एक कथा 

असं म्हटंल जातं,शालिवाहन शकाची सुरुवातदेखील गुढीपाडव्यापासून झाली. शालिवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता. त्याने एक मातीचं सैन्य तयार केलं व त्या सैन्यावर दररोज पाणी शिंपडून सैन्यातील प्रत्येकाला जीवंत केलं. त्या सैन्याच्या मदतीने शालिवाहनाने शत्रूचा पराभव केला. विशेष म्हणजे या कथेमागे एक लाक्षणिक अर्थ असल्याचं सांगण्यात येतं. त्या काळातील लोक हे चेतनाहीन झाले होते. त्यामुळे शालिवाहनाने मातीच्या सैन्याची मदती घेत प्रत्येक व्यक्तीमध्ये चैतन्याचा मंत्र भरला वर प्रत्येक व्यक्तीला लढण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर सर्वसामान्य जनतेला हाताशी धरुन शालिवाहनाने हुणांवर विजय मिळवला. या युद्धात हुणांचा झालेला पराभव पाहून लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे ज्या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात आला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. 

कशी उभारावी गुढी

गुढी उभारण्यासाठी आपण जी काढी घेतो ते प्रथम स्वच्छ धुवून, पुसून घ्या. त्यानंतर त्याला एक रेशमी वस्त्र बांधून त्यावर एक चांदी, तांब्या किंवा अन्य कोणताही स्वच्छ तांब्या ठेवा. गुढीभोवती रांगोळी काढावी. त्यानंतर हा तांब्या व वस्त्र गुढीला व्यवस्थित बांधून घ्या. या तांब्यावर मग कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. तसंच साखरेची माळ बांधावी. गुढी उभारल्यानंतर त्यावर हळद, कुंकू, फुले वाहून तिची पुजा करावी. तसंच उभारलेली गुढी सूर्यास्तापूर्वी पुन्हा नमस्कार करुन उतरवावी.