Health & Fitness: धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगण्यासाठी ५०+ टीप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

Health & Fitness: धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगण्यासाठी ५०+ टीप्स

आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे साधे आणि संतुलित आयुष्य असं म्हणायला काही हरकत नाही, हे जरी कठीण असल तरी अशक्य नक्कीच नाही. पण काही छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या रूटीनचा भाग केल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

निरोगी आयुष्यासाठी काही टिप्स

१. शक्यतोवर आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा. आपल घर, ऑफिसचा डेस्क, गाडीची डिक्की, बॅग या गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवा. अस्थाव्यस्थ ठेवल्याने त्याचा आपल्याला त्रासही होतो आणि चिडचिड देखील वाढते.

२. आपले विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतशील ठेवा. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून जरा दूर रहा.

३. रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

४. रोज थोडा का होईना पण व्यायाम करा आणि संतुलित नाश्ता करा.

५. ऑफिसची काम, तिथला स्ट्रेस कामाचं टेन्शन घरी आणू नका, घरी आपल्यावर आपल्या कुटुंबासोबत जगा.

६. रोजच्या रोज आपली टू-डू लिस्ट लिहीत चला, म्हणजे दिवसभरात काय काय करायचं आहे हे लक्षात असेल.

७. जेवण नेहमी आरामात आणि चावून चावून खा, ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले ठरेल.

८.वाचनाची सवय वाढवा म्हणजे दररोज एक चांगले पुस्तक, चांगले साहित्य वाचा. यामुळे तुमचे ज्ञान तर वाढेलच, पण हे तुम्हाला सकारात्मक बनवून तुमची सर्जनशीलताही वाढेल.

९. वर्तमानपत्र वाचा किंवा बातम्या पहा, जेणेकरून तुमची माहिती अपडेट होईल.

१०. बसताना, लक्षात ठेवा की पाय क्रॉस करून बसू नका, यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी याशिवाय वैरिकास व्हेन्स आणि स्पायडर व्हेन्स होतात.

११. तुम्ही गुडघ्याऐवजी तुमचे घोटे क्रॉस करून बसलेत तर बरे होईल.

१२. खूप जास्त उंच हिल्स घालू नका. 2 इंचापेक्षा जास्त उंच हिल्स घालणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

१३. सतत कॉम्पुटर वर काम करू नका, त्याचा परिणाम डोळे, खांदे आणि मानेवर होतो. थोड्या थोड्यावेळाने ब्रेक घ्या. काही वेळ डोळे बंद करा आणि आराम करा.

१४. नेहमी तुमच्या मोबाईलवर व्यस्त राहू नका. जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जाल तेव्हा मोबाईल बंद करणे चांगले.

१५. स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरच्या स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत साऱ्याचीच, कारण हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठीच नाही तर उत्तम आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे.

१६. जेवण तयार करण्यापूर्वी आणि जेवण्यापूर्वी हात साबणाने धुवा.

१७. खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवा.

१८. झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका.

१९. घरातली हवा खेळती असावी. दिवसा खिडक्या आणि पडदे उघडे ठेवा, जेणेकरून ताजी हवा आणि भरपूर प्रकाश मिळेल. गरज असेल तेव्हाच एसी वापरा आणि वेळोवेळी त्याची साफसफाई करत रहा.

२०. प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणणे किंवा इतरांच्या चुका शोधणे थांबवा. यामुळे तुमची चिडचिड वाढेल आणि लोक तुम्हाला नकारात्मक व्यक्ती समजतील.

२१. सुट्टीच्या दिवशी दिवसभर आळशीपणा करून घरी राहू नका आणि टीव्ही किंवा कॉम्प्युटरला समोर बसून राहू नका त्यापेक्षा कुटुंबासोबत वेळ घालवा. कुठेतरी फिरायला जा, गप्पा मारा, मुलांना वेळ द्या.

२२. मेसेज करत असताना लोक अनेकदा मान वाकवून फोनवर मेसेज वाचतात किंवा टाईप करतात, पण ही पद्धत चुकीची आहे. यामुळे मानेवर ताण येतो आणि वेदना होऊ शकतात.

२३. जंक फूड कमी खा. त्यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच, पण त्यात कॅन्सर निर्माण करणारे घटकही असतात.

२४. अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी केसांची पिन, पेन किंवा पेन्सिल वापरतात, ते धोकादायक असू शकते. सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे करंगळीला टॉवेल गुंडाळून कान स्वच्छ करणे किंवा कानात टाकता येणार औषध वापरा.

२५. तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तुम्ही लठ्ठ असाल तर, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक किंवा हृदयविकार यासारख्या आजारांकडे लक्ष द्या.

हेही वाचा: Fashion: हिवाळ्यात हे 5 स्टायलिश ॲक्सेसरीज तुमच्या नॉर्मल लूकला एकदम स्टायलिश बनवतील

२६. प्रत्येक व्यक्तीची गरज आणि शरीराचे चक्र वेगळे असते, त्यानुसार आहार आणि व्यायामाचे नियोजन करा. आठवड्याच्या आहाराचे नियोजन करून एक तक्ता बनवा.

२७. तुमच्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण कमी करा. मांस, दुग्धजन्य पदार्थ, तळलेले आणि बेक केलेले पदार्थ, कँडीज आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा.

२८. वेगवेगळी प्रोटीन घ्या. हे तुम्हाला सोयाबीन्स, नट्स, शेंगदाणे, टोफू या उत्पादनांमध्ये मिळेल. दूध, ताक आणि दही यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थही खा. याशिवाय हिरव्या पालेभाज्या देखील कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत.

२९. जास्त खाणे टाळा. नेहमी भुकेपेक्षा थोडे कमी खा. अनेकदा आपण आपले आवडते पदार्थ पाहून जास्त खातो, पण अस करणं चुकीचं आहे.

३०. सतत पेनकीलर खाऊ नका. अनेकदा आपण डोकेदुखी किंवा अंगदुखी होताच कोणतेही पेनकिलर खातो, जे हानिकारक असू शकते. घरगुती उपाय करून पाहणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

३१. दर आठवड्याला मालिश करा. यामुळे थकवा देखील दूर होईल आणि रक्त संचार सुधारेल.

३२. सुट्टीचा प्लॅन करा आणि बाहेर गावी फिरायला जा, कारण हवा आणि पाणी बदलण्याने तुम्हाला ताजेतवाने वाटतेच, पण पोटाशी संबंधित आजारही कमी होतात.

३३. नियमित आरोग्य तपासणी देखील करत रहा. कधीकधी मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारखे आजार वर्षानुवर्षे कळत नाहीत.

३४. रात्री डोळ्यात गुलाबपाणी टाका किंवा कापूस गुलाब पाण्यात बुडवून भिजवून डोळ्यांवर ठेवा यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो.

३५. एकाच वेळी सर्वांना आनंदी ठेवणे अशक्य आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही काही लोक तुम्हाला नापसंत करतात, तर ती त्यांची समस्या आहे. यासाठी स्वतःला दोष देऊ नका आणि आनंदी राहायला शिका. एकाच वेळी सर्वांना आनंदी ठेवता येत नाही हे नीट समजून घ्या.

३६. तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींवर तणाव घेणे मूर्खपणाचे आहे, जसे की तुम्ही घरातून वेळेवर निघालात पण ट्रेन किंवा बस उशीरा आली किंवा ट्रॅफिक जास्त असेल, मुसळधार पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे उशीर झाला तर त्याचा तणाव घेऊ नका, कारण यात तुमची चूकही नाही.

३७. दुसऱ्याची प्रगती किंवा आनंद पाहून कधीही न्यूनगंड बाळगू नका. जगात असे अनेक लोक असतील ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त यश आणि पैसा असेल. तुम्ही तुमचे काम मनापासून करत आहात, त्यात आराम करा.

३८. जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णत: जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकवेळी तक्रार केल्याने परिस्थिती बदलणार नाही, परंतु तुमचे दुःख आणखी वाढेल. अशा वेळी तुमच्या आयुष्यात आलेले चांगले क्षणही तुमच्यापासून हिरावून घेतात. त्यांचा आनंद घेणे चांगले.

३९. नाटकी पणाने लोकांची सहानुभूती घेऊ नका, बरेच लोक सगळ्यांचं लक्ष आपल्यावरच असावं असा अट्टाहास बाळगतात पण हे चुकीचं आहे. कारण पाठीमागे लोक या सवयीची खिल्ली उडवतात, कारण या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण प्रत्येकजण त्याच्याकडे लक्ष देत नाही.

४०. लोकांबद्दल चुकीचे ग्रह ठरवू नका. सगळ्यांना एकाच तराजूत तोलू नका. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते आणि लोक वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. फक्त एकच गोष्ट मनात बसवून तोच दृष्टिकोन बरोबर मानू नका.

४१. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका आणि स्वतःवर ओढूनही घेऊ नका. विनोदही सहन करायला शिका नाहीतर तुम्ही नकारात्मक व्यक्ती म्हणून ओळखले जाल आणि लोक तुमच्यापासून दूर राहणेच बरे समजतील.

४२. भूतकाळाला चिकटून राहू नका. नेहमी पुढचा विचार करा.

४३. खोट बोलणे टाळा. बरेच लोक आपली खोटी प्रशंसा करतात किंवा नात्यात खोटे बोलतात, ज्यामुळे भविष्यात तुमचे नाते बिघडू शकते तसेच लोकांचे तुमच्याबद्दलचे मत बदलू शकते. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.

४४. तुम्ही परिपूर्ण नाही हे सत्य स्वीकारा आणि तुमच्याकडून चुकाही होऊ शकतात. आपली चूक मान्य करा आणि सॉरी म्हणायला शिका.

४५. दररोज स्वत: ला सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. इतरांच्या आणि स्वतःच्या चुकांमधूनही शिका आणि स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करा.

४६. ​​तुमची आवड आणि छंद यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या सकारात्मक गोष्टी लोकांसमोर आणा.

४७. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार रहा. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमच्या मनात समाधानही राहील.

४८. कधीकधी स्वतःचे लाड करणे देखील चांगले असते. स्वतःसाठी वेळ काढा. सुट्टी घ्या आणि संपूर्ण दिवस आपल्या पद्धतीने आवडेल तसा घालवा. फिरायला जा, खरेदी करा किंवा मूव्ही पहा. हे तुम्हाला रिफ्रेश करेल.

४९. आयुष्यात प्रत्येकाला सर्व काही मिळत नाही. जे नाही मिळाले त्याबद्दल रडण्यापेक्षा जे मिळाले त्याचे कौतुक करा.

५०. स्वतःला खूप ज्ञानी असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनावश्यकपणे इतरांना सल्ला देऊ नका. सल्ला देण्याऐवजी त्यांची समस्या ऐका, समजून घ्या आणि जमेल तशी मदत करा.

५१. स्वतःवर प्रेम करायला शिका. इतरांसारखे बनण्याचा प्रयत्न करून किंवा त्यांचे अनुकरण करून आपली ओळख गमावू नका. तुम्ही आहात तसे चांगले आहात. तुमच्यातल्या चुका सुधारा, पण स्वतःला कमी लेखू नका.

५२. मोकळेपणाने हसा जेणेकरुन तुमचे हसणे आयुष्याच्या धावपळीत अदृश्य होऊ नये. मोकळेपणाने हसल्याने फुफ्फुसातील लवचिकता वाढते आणि त्यांना ताजी हवा मिळते.

५३. रोज थोडे ध्यान करा. यामुळे एकाग्रता वाढते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते.

५४. आपल्या भावना आणि मूड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. जास्त रागावू नका, खूप दुःखी किंवा चिडचिडे होऊ नका. समाजातही तुमच्या वागण्यात आणि भावनांमध्ये संतुलन ठेवा.