

Diwali 2024: दिवाळी किंवा दीपावली हा एक हिंदू सण व दीपोत्सव आहे. भारतातच नव्हे तर अनेक देशात हा सण साजरा होतो. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तेलाचे लहान दिवे लावून सर्व घर प्रकाशमय केले जाते. उंच जागी आकाशदिवा लावून काळोख नाहीसा करण्याचा प्रयत्न असतो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकाळात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. परंतु, आजकाल ऋतू बदलल्याने पावसात पण पणत्या लावाव्या लागतात.
-अॅड. प्रतिभा देवी
दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असे म्हणतात. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसात. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.