
How to select plant for balcony
आशा उगांवकर
आपल्या अंगणातली किंवा आपल्या बाल्कनीतली, गच्चीवरची आपली बाग हा आपल्या आनंदाचा एक ठेवा. घराभोवतीच्या, गच्चीवरील आणि बाल्कनीमधील बागेसाठी झाडांची निवड कशी करायची ते पाहू.
झाडे हा बागेचा अविभाज्य घटक आहे; मग ती बाग बंगल्याभोवतीची असो,टेरेसवरील असो वा बाल्कनीतील! बागेसाठी झाडांची निवड करताना त्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण ढोबळमानाने कसे करता येते हे समजावून घेऊया.
परसबाग आणि गच्चीवरील बागेसाठी झाडांची निवड करताना या दोन्हींमधील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. त्यांचा थोडा तुलनात्मक विचार करूयात. बाल्कनीमधील बाग करण्यासाठी यामधूनच निवड करायची असून जागेचा विचार प्राधान्याने करावा लागेल.
१) गच्चीवरील बागेमध्ये माती कमी असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे मोजकेच पण वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. तुलनेने जमिनीवरील झाडांना पाण्याचा ताण सहन होतो. बागेला मोजके व वेळेवर पाणी देणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी देण्याची चूक अनेक वेळा होताना दिसते.
२) जमिनीवरील लागवडीच्या तुलनेत कुंड्यांमधील बागेला वारंवार पाणी द्यावे लागते मग त्या कोठेही असोत.
३) गच्चीवरच्या बागेला पुरेसे ऊन मिळते, परंतु आसपासच्या उंच इमारती, मोठी झाडे आदींमुळे परसबागेला पुरेसे ऊन मिळण्यात अडथळा येतो.
४) गच्चीवरच्या बागेत वाऱ्याबरोबर येणारे तण कमी येते, जमिनीवरच्या बागेत तुलनेने ते जास्त आढळते.
झाडांचे आकार, निवड
झाडांचे आकार व प्रकार विचारात घेऊन त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केल्यास ते खालीलप्रमाणे होईल. बाग करताना योग्य जागेची निवड, पाण्याची गरज इत्यादीसाठी ते मार्गदर्शक ठरेल. कुंड्या अगर वाफे यांचा आकार ठरविण्यास आणि त्यांना योग्य जागा देण्यासही हे वर्गीकरण उपयोगी ठरेल.
वर्गीकरण
१) उंचीप्रमाणे वर्गीकरण करावयाचे झाल्यास हर्ब, झुडुपे, कमी उंचीची, मध्यम उंचीची झाडे आणि उंच वाढणारे वृक्ष असे करता येईल.
२) झुडूपवजा झाडे- झुडूपवर्गामध्ये जास्त करून फुलझाडे येतात. उदाहरणार्थ अबोली, शेवंती, सदाफुली गुलबक्षी,कोरांटी, इ. गुलाब हे या वर्गामधील वाढवायला सर्वात कठीण फुलझाड आहे.
३) सवयींप्रमाणे वर्गीकरण करावयाचे झाल्यास उन्हाची कमी किंवा जास्त गरज असणारी, सावलीत वाढणारी, पाणी कमी जास्त लागणारी असे करता येईल. बारमाही किंवा अल्पकाळ फुले देणारी झाडे असेही वर्गीकरण होऊ शकेल.
४) झाडांच्या आयुर्मानाप्रमाणे वर्गीकरण करताना दहा ते पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्य असणारी झाडे, तीन चार वर्षे किंवा एक-दीड वर्षे जगणारी आणि केवळ एकाच सीझनपुरते आयुष्य असणारी असा विचार केला जातो. यामध्ये फुलझाडे, फळझाडे, वेली असेही वर्गीकरण होऊ शकेल.
५) उपयोगाप्रमाणे -
अ) औषधी वनस्पतींमध्ये -तुळस, सब्जा, गवती चहा, अडुळसा, विड्याची पाने (नागवेल) आदींचा समावेश होतो.
ब) शोभेची पाने असणाऱ्या वनस्पतींमध्ये क्रोटोन, बिगोनिया, ड्रेसेना, मनी प्लॅन्ट, फिलोडेन्ड्रॉन वगैरेंचा समावेश होतो.
क) कंपाउंडसाठी संरक्षक काटेरी वेलींमध्ये बोगनवेलीची हजेरी अगत्याची तर मेंदी, डुडोनिया अशी कंपाउंडला लावण्याजोगी! मोठी बाग असल्यास डिव्हायडर म्हणून लावण्यासाठी फायकसच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. सुरूचे प्रकारदेखील हे काम करतात.
६) ताटव्यांमध्ये लावण्यासाठी डेझी, बाल्सम, लार्कस्पर, पिटुनिया, झेंडू, व्हर्बेना अशा हंगामी फुलझाडांची निवड केली जाते. कर्दळ, निशिगंध, ग्लॅडिओला अशी कंदवर्गातील फुलझाडेदेखील एकत्र लावल्यास शोभा देतात. यात बारमाही आणि वर्षातून एकवेळा फुले येणारी असेही प्रकार आहेत.
नव्याने आलेल्या अनेक जाती सध्या उपलब्ध आहेत. त्यामधून देखील निवड करता येईल. सीझनल वर्गातील रोपे आपण विकत घेत असाल तर त्यांचे आयुष्य एकाच हंगामापुरते आहे, याचे विस्मरण होता कामा नये, अन्यथा ती रोपे अल्पावधीत सुकून गेल्याने अगर त्यांचा बहर संपल्याने पदरी निराशा येण्याचा संभव असतो.
७) कंदवर्गीय फुलझाडे- या प्रकारात गड्डे असणारी निशिगंध, लिली, कर्दळ इत्यादी फुलझाडे आहेत.
८) कॅक्टस व सक्युलंट- काटेरी, जाड पाने यामुळे पाण्याची गरज कमी आणि उन्हाची गरज जास्त असलेला हा वेगळा वर्ग आहे.
९) पाणवनस्पती- कमळ, कमलिनी अशी केवळ पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती या वर्गात मोडतात.
१०) भाजीपाला आणि त्याचे विविध प्रकार – भाजीपाल्याचा एक स्वतंत्र वर्ग आहे. फळभाज्या, शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्या, कडधान्ये, पालेभाज्या, कंद इत्यादी भाजीपाल्याचे प्रकार या वर्गात मोडतात. हे सर्व अल्पायुषी आहेत.
तुलनेने हळद, आले, केळी जास्त दिवस जगतात. भाजीपाला वर्गातील वनस्पतींचे आयुष्य कमी असल्यामुळे वारंवार लागवड करावी लागते. तुलनेने अधिक परिश्रम, देखभाल, तत्परता यांची गरज असते.
आपल्या बागेचे नियोजन करताना उपलब्ध जागा, ऊन-सावली, पाणी असे काही कळीचे मुद्दे समोर येतात. बागेत एकसुरी लागवड करण्यापेक्षा कमी जास्त उंचीची झाडे आणि त्यामधील वैविध्य जपल्यास सुंदर आणि बहुपयोगी बागेचे उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. रंगांमधील विविधतेमुळेही बाग अधिक आकर्षक दिसते.
योग्य झाडे- झाडांचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊन त्यांचा योग्य मेळ घालण्यामध्ये बाग करणाऱ्याचे कसब पणाला लागते. अयोग्य झाडांची निवड केल्यास वेळ, परिश्रम निष्फळ ठरण्याची शक्यता असते.
झाड लावताना ते पूर्ण वाढल्यावर किती जागा व्यापेल याचा विचार करावा. नारळासारखी झाडे उपद्रव मूल्यांमुळे आणि फणसासारखी अधिक पसारा असणारी झाडे परसबागेसाठी अयोग्य आहेत. तुलनेने योग्य झाडांची यादी बरीच मोठी आहे. शेवगा आणि सोनचाफा यांची सुधारित जातींची झाडे कमी उंचीची असल्यामुळे ती परसबागेत लावण्यास योग्य आहेत.
मध्यम उंचीची, दीर्घायुषी झाडे -जास्वंद, तगर, पारिजातक, कण्हेर, अनंत, सोनचाफा, देवचाफा अशी जास्त आयुष्य असणारी, मध्यम उंचीची आणि जास्त काळ फुले देणारी झाडे आणि कढीपत्ता, ऑल स्पाइसेस, हादगा आणि लिंबू, डाळिंब, सीताफळ, अंजीर, पेरू अशी फळझाडे या वर्गात मोडतात. फळझाडांमध्ये आलेल्या नवीन जाती तुलनेने लहान उंचीच्या आहेत.
वृक्ष - या वर्गात मोडणारी मोठी झाडे परसबाग आणि गच्चीवरील बागेसाठी अयोग्य आहेत. रस्त्याकडेचे वृक्ष बागप्रेमींना मोहात पाडतात पण ते बागेसाठी अयोग्य आहेत.
फुलवेली आणि पानवेली- जाई, जुई, मोगरा, मदनबाण, कुंद या दीर्घायुषी वेली असून त्या ऋतूपरत्वे सुवासिक फुले देणाऱ्या आहेत. कृष्णकमळ, रंगून क्रीपर बागेचे सौंदर्य वाढवतात. विड्याच्या पानांचे प्रकार, मिरीचे वेल, मनी प्लॅन्ट, मॉन्स्टेरा ह्या वेलवर्गातील दीर्घायुषी पानवेली आहेत.
फळझाडे- गच्चीवर डाळिंब, सीताफळ, चेरी, तुती, ड्रॅगन फ्रूट, चिक्कू, केळी, पेरू, लिंबू, पपई, अंजीर, कमरख ही झाडे मोठ्या ड्रमात अगर वाफ्यात लावता येतात.
आंब्याचेही माफक पीक घेता येते. बुटक्या जातीचा शेवगाही लावता येतो. ही सर्वच झाडे जमिनीवरील बागेतही लावणे शक्य असले तरी फणस, नारळ, शेवगा याला अपवाद आहेत. नव्याने मिळणारी कलमी आंब्याची रोपे तुलनेने लहान उंचीची असतात.
बाल्कनीमध्ये बाग करताना कुंड्या आणि हँगिंगमध्ये लावण्यास योग्य अशी झाडे निवडावीत. हँगिंगमध्ये काही फुलझाडे, तुळस, गवती चहा, लिंबू, कढीपत्ता, पानवेल, गोकर्णासारख्या वेली, पुदिना, पालेभाजी लावता येईल. अनेक टप्पे असलेले स्टॅन्डवर अनेक कुंड्या ठेवता येत असल्यामुळे बाल्कनीतील बागेसाठी उपयोगी आहेत.
(सौजन्य : सकाळ साप्ताहिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.