स्टाइल म्हणजे काय? कलाकाराला त्याच्या प्रेरणेतून कलाकृती सापडते. एखादी कलाकृती अमुक पद्धतीने दिसायची असेल, तर त्यांना त्यासाठी काय दिसायला हवं? निर्मितीसाठी सर्जनशीलता महत्त्वाची असते. त्या कल्पनेतून जे काही भासवण्याचा प्रयत्न असतो, त्यासाठी वापरली जाणारी कल्पकता असते तीच स्टाइल...आपल्या स्टाइलसाठी आपला प्रेरणास्रोत काय आहे, त्याप्रमाणे आपण दृष्टीस येतो.
कित्येक वेळेला वेगवेगळ्या माध्यमांचा सामान्य माणसांवर प्रभाव दिसून येतो आणि त्यात वावगं काहीच नाही. क्रिकेटपटू एम. एस. धोनीच्या काळात त्याच्या लांब केसांची स्टाइल म्हणून कित्येक मुलांनी केस वाढवले होते. केसांना वेगवेगळ्या हायलाइट्स करण्याचं फॅड आलं होतं. मला एक गमतिशीर किस्सा आठवतोय, मी एका नवीन घरामध्ये शिफ्ट झाले होते.
आता नवीन घरात शिफ्ट झालो, की कितीही ब्रोकरनं सांगितलं, तरी आपल्या वाट्याला छोट्या मोठ्या कामांची यादी येतेच. ‘आम्ही करून देऊ हो’ असा आश्वासनात्मक सूर ते पद्धतशीरपणे विसरतात. आता या गोष्टीत अडकण्यापेक्षा आधी घर लावूया हा चंग बांधलेला असल्यामुळे ‘जाऊ दे ना.. करून घेऊ आपणच’ असा मोठेपणा मी दाखवला.
असंच प्लंबिंगचं काम निघाल्यामुळे एका प्लंबरला मी बोलावलं. या स्टायलिश प्लंबरचे केस धोनीसारखे मोठे होते. ते त्याला सूट करत असले, तरीही प्लंबिंगचं काम करताना ते इतक्या वेळेला डोळ्यावर येत होते की त्यामुळे तो विचलित आणि त्याचा सावरण्याचा त्रास बघून मी त्रस्त. त्याला काम जमत नाही की काय यामुळे मी अस्वस्थ होऊ लागले.
माझ्या चेहऱ्यावरचे वैतागलेले भाव बघून त्यानं मला शेवटी विचारलं, ‘केस बांधायला काही मिळेल का?’ मी एक हेअर बँड काढून त्याला दिला. त्यानंतर थोड्याच वेळात काम मार्गी लागलं आणि काम झाल्यानंतर तो बँड मला परत करू लागला. माझा सूर त्याच्या वर्मी लागू नये याची काळजी घेऊन म्हटलं, ‘तुम्हालाच ठेवा आता हे. खूप ठिकाणची काम करायची असतील ना..लागेल तुम्हाला...’
फॅशनच्या नावाखाली आपण एखाद्याला कॉपी करतो त्यावेळेला ते आपल्या शरीराच्या ठेवणीला शोभेल का? आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार ते आपल्याला मेंटेन करता येणार आहे का? एखाद्या ऋतूनुसार योग्य वाटेल का?... या सगळ्याचाच विचार व्हायला हवा.
नाहीतर त्या प्लंबरसारखी स्टाइल करून शब्दशः स्टाइल इतरांवर मारल्यासारखी वाटेल. गमतीचा भाग सोडला, तर अशी स्टाइल मारण्यापेक्षा आपण ज्या आदर्श व्यक्तींना बघून ही स्टाइल करू पाहतो आहे ती आपल्याला शोभेल का किंवा झेपेल का याचा निश्चितपणे विचार करायला हवा. अर्थातच स्टाइल करताना आपलं प्रेरणास्थान असतंच.
परंतु केवळ नक्कल न करता ओळख निर्माण होईल याचा विचार अधिक व्हायला हवा. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याचे विचार, मानसिकता आवडीनिवडी यानं होत असते. प्रत्येक उत्तम कलाकारांसारखीच स्वतःची वेगळी स्टाइल असते. त्यासाठी आपला दृष्टिकोन हा मोठा आणि वैचारिक असायला हवा.
तुमची फॅशन प्रेरणा किंवा स्टाइल शोधण्यासाठी अशा व्यक्ती पात्र किंवा व्यक्तिमत्त्वांचा शोध घ्या- जे तुमच्या मनात गहिरे रुजले आहेत. तुम्ही तुमच्या स्टाइलसाठी एक गट तयार केला, तर त्यामध्ये कोण असेल? खऱ्या किंवा काल्पनिक अशा लोकांना निवडण्यासाठी वेळ द्या- त्यावर शांतपणे विचार करा.
या मुद्द्यांचा विचार करा
1) आपण एखाद्या सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तीला प्रेरणास्थानी ठेवणार असू, तर आपल्यामध्ये तसे काही साम्य आहे का, याचा विचार केला जावा.
2) तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी तुमच्या आवडत्या कादंबऱ्या किंवा कवितेतील पात्रं डोळ्यासमोर ठेवा.
3) गाण्यांच्या ओळींतूनही प्रेरित पात्रं आपल्याला दिसू शकतात. त्याचा रंगसंगतीचा आणि आकृतीसाठी विचार करावा.
4) स्टाइल म्हणजे केवळ कपडे किंवा ॲक्सेसरीज नाहीत, तर संपूर्ण तुमचा लूक जो की वेगवेगळ्या कपड्यांच्या स्टाइलने किंवा रंगसंगतीने ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.