जन्मल्यापासून प्रत्येकासाठी आईचं अस्तित्व हे अनन्यसाधारण आणि अत्यंत मौल्यवान असतं. आई म्हणजे केवळ नातं नव्हे, तर ती एक भावना, आधार आणि जीवनाला दिशा देणारी शक्ती असते. तिच्या महत्त्वाचं कारण शोधण्यापेक्षा तिचं अस्तित्वच पुरेसं आहे..माझ्या दृष्टिकोनातूनही आईचं महत्त्व शब्दांत सांगणं फार कठीण आहे. ती का महत्त्वाची आहे, हे सांगणं अशक्य वाटतं. कारण ती महत्त्वाचीच आहे, हे खूप मोठं सत्य आहे. देवाचं प्रत्यक्ष रूप जर कुणाला म्हणता येईल, तर ती फक्त आणि फक्त आईच असते.आईमुळे घरात खूप बदल घडतात. चांगल्या सवयी लागतात. घरामध्ये शिस्त येते. माझ्याही आयुष्यात हे सारं आईमुळेच शक्य झालं आहे. आजही जेव्हा मनात काही गोंधळ असतो, चिंता असते, किंवा काही त्रास होतो, तेव्हा मी सर्वांत आधी तिच्यापाशी जाऊन मन मोकळं करते. तिचा सल्ला केवळ मार्गदर्शक नसतो, तर तो मला मानसिक शांती देतो. चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत असले, तर मला शांत करण्याची ताकद केवळ एकाच व्यक्तीत आहे, ती म्हणजे माझी आई..आईला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती; परंतु काही कारणांमुळे ती तिची आवड करिअर म्हणून जोपासू शकली नाही. मात्र, तिने ती आवड माझ्यामध्ये रुजवली. शाळेत असताना प्रत्येक स्नेहसंमेलनात, स्पर्धांमध्ये मी सहभाग घ्यावा, अशी तिची कायम इच्छा असायची. ती स्वतः मला सजवायची, प्रोत्साहन द्यायची आणि हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसायचा. खरंतर माझ्यातली नृत्याची आवड तिच्याचकडून आलेली आहे..आईचे अनेक गुण माझ्यात उतरले आहेत, हे माझे वडीलही अधूनमधून कौतुकाने सांगतात. मी तिच्यासारखंच बोलते, वागते, चिडल्यावर तिच्यासारखीच प्रतिक्रिया देते. अगदी तिच्या प्रतिमेसारखी वाटते. ती उत्तम स्वयंपाक करते. मी काही अंशी तिचा तो गुण अंगीकारू शकले, तर मला खूप समाधान वाटेल.आईबद्दलचा एक अविस्मरणीय प्रसंग कायम माझ्या मनात कोरलेला आहे. मी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि संघर्षानंतर हळूहळू नाव मिळवायला लागले, तेव्हा तिच्या डोळ्यातले आनंदाश्रू मला आजही आठवतात. ते क्षण आयुष्यभर लक्षात राहणारे आहेत. तिचं एकच वाक्य मनात घर करून आहे, ‘‘तू जे बोलत होतीस, जे स्वप्न दाखवत होतीस, ते आज तू करून दाखवलंस. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.’.सध्या मी ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारत आहे. आजही, जेव्हा कोणी तिला माझ्याविषयी विचारतं, तेव्हा तिचं तोंडभरून कौतुक करणं मला अतिशय आनंद देऊन जातं. हे सगळं ऐकणं, पाहणं हेच तर खऱ्या यशाचं मोजमाप असतं.आईच्या कुशीत मावलेली ही दुनिया, तिच्या स्पर्शानं भरून आलेलं आयुष्य हीच तर माझी खरी संपत्ती आहे.(शब्दांकन : श्रुती भागवत).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.