'मर्द को भी दर्द होता है'! Men's Emotions | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Men's Day

International Men's Day : 'मर्द को भी दर्द होता है'!

International Men's Day : पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींवर अनेक बंधनं असतात. पण याच पुरुषप्रधान संस्कृतीने कळत नकळत पुरुषांवरही काही बंधनं घातली आहेत. आज जगभरात मेन्स डे साजरा केला जात असून, आज आपण पुरूषांवर नेमकी कोणती बंधनं असतात हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

हेही वाचा: International Men's' Day : 'हे' आहेत जगातील सर्वात पावरफूल व्यक्ती

असला कसला रंग रे???

एखाद्या मुलाने फिकट किंवा गुलाबी रंगाचे कपडे घेतले की, त्याच्याकडे निराळ्याच नजरेने पाहिलं जातं. गुलाबी रंग काय मुलांचा आहे का, असं म्हणत त्याची हेटाळणी होते. एकवेळ कपडे चालतात पण, वस्तू घेताना चुकून जरी गुलाबी रंगाची घेतली तरी, पोरींचा रंग काय घेतो रे... म्हणत त्याला चिडवलं जातं. तीच गोष्ट कपड्यांच्या आवडीची. पुरुषांची पण फॅशन असते. पण फॅशनमध्ये प्रयोग करणाऱ्या पुरुषांकडे मात्र जरा विचित्रच नजरेनं पाहिलं जातं. म्हणजे पाहा ना, सगळ्या अभिनेत्रींनी केलेल्या फॅशनची कौतुकाने दखल घेतली जाते. पण अशीच फॅशन जर रणवीरसिंग करू पाहत असेल तर, त्याकडे काय आचरटपणा लावलाय यार... म्हणून पाहिलं जातं.

हेही वाचा: International Men's Day 2022 : इथे पुरुषांना मिळतो न्याय; पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांची संघटना

बिच्चारा(??)

स्वयंपाकपाणी करणारी मुलगी ही काही कायम बिचारी नसते, उलट काहीवेळा तिचं विशेष कौतुकच होतं. पण स्वयंपाकपाणी येणारा आणि दररोज ते निगुतीने करणारा मुलगा, पुरुष नक्कीच कुठल्यातरी संकटात असणार असं त्याच्याकडे पाहणाऱ्या ९९ टक्के लोकांना वाटतं. हा का बरं ही कामं करतोय? अरे दुसरं काहीतरी चांगलं कर ना.. असा फुकटचा सल्ला त्याला न विचारता मिळतो. घरकाम करणं, त्यातही एखाद्या पुरुषाने ते करणं म्हणजे अतिशय कमी दर्जाचं मानलं जातं. अशा पुरुषाला 'बिच्चारा/ या टिपिकल प्रतिक्रियेतून बाहेर पडण्यासाठी फार कष्ट करावे लागतात.

हेही वाचा: International Men's Day : पुरुषांसाठी हे सुपरफूड आहेत वरदान

बायकोचा बैल

मुळात लग्न ही पुरुषांसाठी बऱ्यापैकी फायद्याची व्यवस्था असतानाही ती जणू तुरुंगवासच आहे, असं समजून त्यावर जोक्स मारणं, त्याविषयी सतत 'अरे रे' असं म्हणत हळहळणं, नकारात्मक बोलण्याच्या प्रतिक्रिया देणं.. अनेक पुरुषांना जणू बंधनकारकच असतं. जो तसं करत नसेल आणि बायकोचं किंवा गर्लफ्रेंडचं कौतुक करत असेल असा पुरुष त्यामुळे आपसुकच 'बायकोचा बैल' किंवा 'तिच्या ताटाखालचं मांजर' या किताबाचा धनी होतो.

हेही वाचा: International Men’s Day : दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो? वाचा काय आहे इतिहास

बायल्या

माचो मॅन, अनेकींना घुमवणारा, शायनिंग मारणारा म्हणजे सगळ्यात भारी... हाच काय तो पुरुषोत्तम.. अशी व्याख्या असलेल्या या जगात मुलगे आवडणारा किंवा पुरुष आवडणारा समलिंगी पुरुष तर पुरुषपदाच्या उतरंडीत अगदी शेवटच्या पायरीवर असतो. बायल्या, छक्का म्हणत सरसकट त्याची हेटाळणी होतेच, पण त्याच्यातल्या समलैंगिकतेला समजून घेण्याचं सौजन्यही कुणी दाखवत नाही. आपली लैंगिक निवड जितकी नैसर्गिक आहे, तितकीच त्याचीही आहे ही समज सर्वसमावेशक होणं, अजूनतरी नजरेच्या टप्प्यात दिसत नाही..

हेही वाचा: World Toilet Day 2022 : ​इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं आहे बेस्ट

रडूबाई

तीव्र संवेदना असणारा, एखाद्या प्रसंगी टचकन डोळ्यात पाणी येणारा, कुणावरतरी ओरडायला, पटकन हमरीतुमरीवर यायला नकार देणारा, ते टाळू पाहणारा पुरुष बरेचदा रडूबाई म्हणून हिणवला जातो. खरंतर या सगळ्या चांगल्या भावना आहेत. मात्र त्या असणाऱ्या पुरुषाला रडूबाई म्हणून हिणवलं जातं. त्याच्या संवेदनशील असण्याची टर उडवली जाते.

हेही वाचा: Anger Effect On Body: जेव्हा कोणाशी भांडण होतं किंवा राग येतो तेव्हा शरीर का थरथरते?

हे टिपीकल स्टिरीओटाइप्स प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलाला कुठेतरी त्रास देत असतात. पण आपलं सामाजिक पर्यावरणच असं तयार झालंय की, अनेकदा आपली घुसमट होतेय, आपल्याला हे स्टिरीओटाइप्स आवडत नाहीत, हे सांगणंसुद्धा अवघड ठरतं. या आणि अशा अनेक गैरसमजुतींतून गुंतागुंतीचं झालेलं स्त्री पुरुष संबंधांचं जाळं छान मोकळं करूया त्यातल्या 'त्याला' आणि 'तिला' दोघांना मोकळा श्वास घेता येईल, अशी आशा करूया.