ईशा डे आणि सचिन गोस्वामी‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निमित्ताने ईशा डे आणि दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी यांची ओळख झाली. ईशा त्यांना केवळ आपले गुरू मानत नाही, तर एक विश्वासू मित्र आणि मार्गदर्शकदेखील समजते..या नात्याबद्दल बोलताना ईशा पुढे म्हणाली, ‘‘जेव्हा मी ‘हास्य जत्रे’त आले, तेव्हा सचिन गोस्वामी सरांना फारसे ओळखत नव्हते. मी त्यापूर्वी दोन-अडीच वर्षे लंडनमध्ये होते, त्यामुळे ‘हास्य जत्रा’ पाहण्याची संधीच मिळाली नव्हती. त्यामुळे सचिन गोस्वामी सर किती मोठे व्यक्तिमत्त्व आहेत, याची मला जाणीव नव्हती; पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कॉमेडीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. सरांना एखादी गोष्ट आवडली, की ते प्रामाणिकपणे कौतुक करतात आणि काही कमी वाटले, तर तेही स्पष्ट बोलतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल माझ्या मनात विशेष स्थान आहे.’’ईशाने सांगितले, ‘‘हास्य जत्रा कार्यक्रमात आम्ही स्किट करताना सचिन गोस्वामी सर प्रत्येक बारकाव्यांकडे लक्ष देतात. संवाद कसा असावा, हावभाव कसे असावेत, भाषा योग्य प्रकारे बोलली जातेय का, हे सर्व तपासून घेतात. त्यांना परफेक्शन हवं असतं आणि प्रत्येक सीन ज्या पद्धतीने हवा आहे, तसाच व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळेच प्रत्येक स्किटमध्ये निखळ मनोरंजन असतं.’’.ईशानं आता छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावरही दमदार प्रवेश केला आहे. सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ या चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल ती म्हणाली, ‘‘सचिन गोस्वामी सरांनी मला ‘गुलकंद’मध्ये संधी दिली, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. सई ताम्हणकर, समीर चौगुले, प्रसाद ओक यांसारख्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप शिकवणारा ठरला. हास्य जत्रा कार्यक्रमामुळे आमच्या सगळ्यांचं एक कुटुंब झाल्यासारखं आहे, त्यामुळे एकमेकांसोबत काम करताना जास्त सोयीचं वाटतं.’’ईशाच्या मेहनतीचं कौतुक करताना सचिन गोस्वामी म्हणाले, ‘‘ईशा अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती अभिनेत्री आहे. तिला सांगितलेली गोष्ट ती बारकाईनं शिकते. कॉमेडी तिच्यासाठी नवीन होती; पण तिनं स्वतःला ज्या पद्धतीनं सादर केले, ते कौतुकास्पद आहे. तिच्यात प्रामाणिकपणा आणि कामाप्रती निष्ठा आहे, त्यामुळे तिचं भविष्य उज्ज्वल आहे. ‘गुलकंद’ चित्रपटातही तिनं उत्तम काम केलं आहे.’’.त्यांच्या या नात्याविषयी सचिन गोस्वामी पुढे म्हणाले, ‘‘माझे व्यावसायिक सहकारी खूप आहेत; पण खऱ्या मित्रांची संख्या कमी आहे. मैत्री ही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय गुंतण्यापेक्षा परस्परांना स्पेस देऊन फुलवली पाहिजे. माझ्यासाठी ईशासोबत असलेलं नातं याच प्रकारचं आहे.‘गुलकंद’ हा निखळ मनोरंजन करणारा चित्रपट असून त्यामध्ये विनोदाच्या माध्यमातून एक वेगळी कथा उलगडणार आहे. यामध्ये सई ताम्हणकर, समीर चौगुले, प्रसाद ओक यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या असून, त्यांच्या सहज अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरणार आहे.’’(शब्दांकन : मयूरी गावडे).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.