टवटवीत, तेजस्वी मोती

दागिन्यांना नेहमी भावनांशी जोडले जाते. आपल्या माणसावरचे प्रेम व्यक्त करताना दागिने उत्तम भेट ठरतात. ही भेट उत्तमच असावी म्हणून दागिन्यांची निवड करताना मोत्यांचा साज लक्ष वेधतो.
टवटवीत, तेजस्वी मोती
टवटवीत, तेजस्वी मोतीsakal
Updated on

फॅशन ट्रेंड्स

-पृथा वीर

दागिन्यांना नेहमी भावनांशी जोडले जाते. आपल्या माणसावरचे प्रेम व्यक्त करताना दागिने उत्तम भेट ठरतात. ही भेट उत्तमच असावी म्हणून दागिन्यांची निवड करताना मोत्यांचा साज लक्ष वेधतो. सबंध मोत्यांचे दागिने छान दिसतात आणि अन्य दागिन्यांच्या प्रकारांसोबत उठून दिसतात. बारीक मोत्यांचे कानातले, ब्रेसलेट, अंगठी, चोकर, तोडे, अंबाड्यात माळायची फुलं आणि अगदी मोत्यांची जोडवी घेण्याचा मोह आवरत नाही.

प्रिन्सेस डायनाचा फोटो बघितला, की तिचा तो मोत्यांचा हार सुंदर की प्रिन्सेस डायना अधिक देखणी असे वाटते. ते मोती आणि ती सौंदर्यवती डायना बघताना हेवा वाटतो. खरच फॅशन ट्रेंड बदलले; पण मोत्यांचे दागिने अजूनही ट्रेंडमध्ये आहेत. भारतीय सण आणि उत्सवाला अभिजात शैलीने सजवण्यासाठी मोत्याच्या दागिने म्हणजे उत्तम माध्यम. मोती ही निसर्गाची अद्‍भुत किमया. मोत्यांचे दागिने शोभिवंत, ठळक, सुंदर आणि कालातीत वाटतात

मोत्यांचे हार, कानातले आणि ब्रेसलेटसोबत मिनिमलिस्ट-स्टाईल ॲक्सेसरी म्हणून पर्ल पेंडंट्स आणि दागिन्यांचा स्टेटमेंट पीस म्हणून मोत्याच्या बांगड्या साडी किंवा एथनिक वेअरवर छान दिसतात. पांढरे शुभ्र मोती यांना सर्वाधिक पसंती असली, तरीही जांभळा, हिरवा, निळा, काळा, गुलाबी आणि अगदी मल्टीकलर रंगांमध्ये मोती उपलब्ध आहेत. सध्या काळ्या रंगाचे आणि गुलाबी रंगाचे मोती वेस्टर्नवेअरवर छान दिसतात. सध्या जरा बारीक आकाराचे मोती जास्त वापरले जातात. गोल आकाराचे मोती मात्र नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. शिवाय मल्टीकर्लड मोत्यांचा साजही आवर्जून घेतला जातो.

गुलाबी, जांभळा, लाल, काळा, नारिंगी आणि तपकिरी रंगाचे मोती वापरून तयार केलेले हार, ब्रेसलेट किंवा कानातले अत्यंत देखणे वाटतात. मोत्याचे वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये मोत्यांचा राणीहार, मोत्यांची माळ, तन्मणी, तोडे, बाजूबंद, मोती चोकर नेकलेस, बुगडी, अंगठी, कडे, झुबे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तन्मणी हा प्रत्येकीचा आवडता आणि पारंपरिक दागिना आहे. तन्मणी घातल्याशिवाय कोणताही सणसमारंभ पूर्ण होत नाही. त्यांच्यामध्येही अनेक प्रकार असतात. पिवळे, गुलाबी, पांढरा अशा सगळ्या मोत्यांचे तन्मणी मिळतात. एकसर, तीनसर असे विविध तन्मणी उपलब्ध असतात. ट्रॅडिशनल कुर्ता ते साडी अशा कशावरही तन्मणीचा वापरता येतो. मोत्यांच्या बांगड्यांसोबत मोत्याचे तोडेही अतिशय सुंदर दिसतात. हिरव्या बांगड्यांमध्ये मोत्याच्या बांगड्या आणि अगदी हाताच्या पुढे मोत्याचे तोडे म्हणजे कदाचित पूर्वापार चालत आलेली फॅशन.

सध्या तर चोकरचा ट्रेंड सुरू असून, मोत्यांमध्येही अनेक डिझाईन्सचे चोकर्स मिळतात. डाळिंंबी रंगाच्या खड्यांपासून ते हिरव्या आणि जांभळ्या खड्यांचे, पांढऱ्या आणि पिवळसर रंगाच्या मोत्यांचा चोकर अप्रतिम दिसतो. मोत्यांचा चोकर कोणत्याही आऊटफीटवर छान दिसतो. वेगवेगळ्या रंगांच्या मोत्यांच्या साखळ्या किंवा वेगवेगळ्या रंगांच्या मोत्यांनी बनवलेला सिंगल-स्ट्रँड मोत्याचा हार पारंपरिक साडीवर खूप छान दिसतो. म्हणूनच मोत्यांचे दागिने ‘वेडिंग पर्ल ज्वेलरी’ म्हणूनही दिमाखात दिसतात. वधूच्या जीवनातील नवीन अध्यायाच्या सुरुवात म्हणून मोती शुद्धता, निरागसता आणि अभिजाततेने आशीर्वाद देतात.

अनेक प्रकार

मोत्यांचे अनेक प्रकार असतात. यामध्ये रिअल कल्चर्ड मोती, हाफ पर्ल, माबे पर्ल, फ्रेशवॉटर पर्ल, साऊथ सी हे प्रकार प्रामुख्याने बघायला मिळतात.

सोने आणि मोती

सोन्याच्या दागिन्यांसोबत मोत्यांचे दागिने घालत असाल, तर त्यासाठी तुमचे मोती हे पिवळसर रंगाचे असायला हवेत हे लक्षात घ्या. मोती हा मुळातच सुंदर असतो. त्यामुळे पारंपरिक कपडे, जरदोसी, जाड अथवा बारीक काठापदराची साडी या सगळ्यांवर हे मोत्यांचे दागिने सोन्याच्या दागिन्यांसह उठून दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.