प्राणी पाळणं म्हणजे ‘थेरपी’सारखंच

माझा छंद म्हणजे प्राणी पाळणं, त्यांची काळजी करणं, त्यांचं ग्रूमिंग करणं. माझ्या लग्नाअगोदर माझ्याकडे पाळीव प्राणी नव्हते.
animals
animalssakal

माझा छंद म्हणजे प्राणी पाळणं, त्यांची काळजी करणं, त्यांचं ग्रूमिंग करणं. माझ्या लग्नाअगोदर माझ्याकडे पाळीव प्राणी नव्हते. कारण, आमच्या घरी माझ्या आईला आणि ताईला प्राण्यांची खूपच भीती वाटायची. त्यामुळे आम्ही कधी प्राणी पाळले नाहीत; पण माझ्या नवऱ्याकडे लहानपणापासून पाळीव प्राणी होते. आता आमच्याकडे सेंटबर्नार्ड प्रजातीचा ‘गब्बर’ नावाचा कुत्रा आहे, तो आता सात वर्षांचा आहे. सहा कुत्रे, तेरा घोडे आणि पाच गाई आमच्याकडे आहेत.

लहानपणापासूनच म्हणजे मला आठवते, मी तीन-चार वर्षांची असल्यापासून आमच्या भागात जी काही कुत्र्याची पिल्ले जन्माला यायची, त्यांना मी घरी घेऊन येत असे. मात्र, आई आणि ताईला खूप भीती वाटायची. म्हणून त्यांनी प्राणी सांभाळायला मला कधी परवानगी दिली नाही. मात्र, बाबांना पिल्लं खूप आवडत असत. बाबा आणि मी त्यांना दूध पाजून, काहीतरी खाऊ घालून त्यांना पुन्हा सोडून येत असू.

मला आठवतंय, मी चौथी-पाचवीत होते, त्यावेळेस खूप हट्ट केला म्हणून बाबांनी माझ्यासाठी पोपट आणला. आम्ही त्याचं नाव ‘चाँद’ ठेवलं. चाँद आमच्या घरी सहा ते सात वर्षे होता. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. मात्र, त्यानं चुकीचे औषध दिल्यानं त्याचा तिथं मृत्यू झाला. चाँद अख्ख्या घरात एकटा फिरायचा. सगळ्यांच्या खांद्यावर येऊन बसत असे.

आता आमच्याकडचे सगळे पेट्स आमच्या अलिबागला फार्महाऊसवर असतात. आम्ही कायमस्वरूपी अलिबागला राहायला गेलो आहोत. काम असतं, तेव्हाच मी मुंबईला येते. इतर वेळी अलिबागला असते. अलिबागला माझं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम म्हणजे माझ्या सगळ्या प्राण्यांना खाऊ घालण्यापासून त्यांचं ग्रूमिंग करणं.

आमच्याकडे कुत्र्यांची म्हणजे लहान-लहान पिल्लं आहेत. त्यांना मी स्नान घालते आणि ग्रूमिंग करते. आमच्या १३ घोड्यांना खाऊ घालणं, ट्रेन करणं, फिरवणं अन् त्यांच्यावर बसून फिरणं या गोष्टी सुरू असतात. अलिबागला असताना जास्तीत जास्त वेळ आम्ही आमच्या पेट्सना देण्याचा प्रयत्न करतो.

पाळीव प्राण्यांची काळजी आम्ही मुलांएवढीच घेतो. आम्हाला मूल नाहीये; पण आम्हाला असं वाटतं की, आमची पेट्सच आमची मुलं आहेत. आई मुलांची जेवढी काळजी घेते, तेवढीच काळजी मी माझ्या पेट्सची घेते.

पेट्सबरोबर राहिल्यानं खरंच तुमचं दुःख विसरलं जातं आणि तुम्ही त्यांच्यात रमून जाता. मला अनेक जण म्हणतात, की ‘तुझ्या चेहऱ्यावर व आरोग्यावर चांगले परिणाम दिसत आहेत. तू नेहमी खूश असतेस, तू आनंदी असतेस.’ याचं एकच कारण आहे, ते म्हणजे माझ्या आजूबाजूला असणारे माझे पेट्स.

पेट्स असणं ही एक थेरपी आहे. तुमच्या मानसिक आणि तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी पेट्स खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही मानसिकरीत्या फिट असाल, तर तुम्ही शारीरिकही फिट राहाल. प्राणी मूक असतात. आपण बोलतो, आपल्या भावना व्यक्त करतो; पण प्राणी काहीच सांगू शकत नाहीत.

मात्र, त्यांच्या डोळ्यांतून आपल्याला सगळंच कळतं. प्राण्यांना आपल्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा असते. आपण त्यांच्यावर प्रेम करतो, तेव्हा ते फक्त आणि फक्त आनंद देतात, जो आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो.

(शब्दांकन : प्रज्ञा शिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com