
Kitchen Hacks : घरातल्या किचनमध्ये छोटेसे बदल करा आणि हजारो रुपये वाचवा
एखादी व्यक्ती आपल्या पगाराचा मोठा हिस्सा खाण्यापिण्यावर खर्च करते. कुटुंब असेल तर हा खर्च आणखी वाढतो. अशा परिस्थितीत बचत करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं बजेट बनवणं अत्यंत आवश्यक आहे.
आपण लक्ष न दिल्यास, स्वयंपाकघरात होणारा खर्च आपल्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पण थोडी हुशारी दाखवली तर बचत करणं सोपं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही किचन हॅकबद्दल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपये वाचवू शकता आणि तुमचा वेळही वाचवू शकता.
हंगामी फळं खा
फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण अनेक वेळा त्यांच्या किमतींमुळे महिन्याचं बजेट हादरतं. अशा परिस्थितीत भरपूर पैसे खर्च न करता फळांचे फायदे मिळवण्यासाठी फक्त हंगामी फळं खरेदी करा. कारण त्यांच्या हंगामात फळांची किंमत खूपच कमी असते. (Kitchen Hacks )
अन्न साठवून ठेवा
अन्न साठवण्याच्या तंत्रामुळे तुमच्या स्वयंपाकघरातलं बजेट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. एवढंच नव्हे तर तुम्ही तुमचा स्वयंपाकाचा वेळही कमी करू शकता. त्यामुळे अन्न खराब होणार नाही, वाया जाणार नाही व पैसेही वाचतील. मिरची, वाटाणे, टोमॅटो, लसूण, आलं, गाजर या गोष्टी साठवून ६ महिने ते वर्षभरापर्यंत तुम्ही वापरू शकता.
घाऊक खरेदी करा.
कमी प्रमाणात गोष्टी खरेदी करणं म्हणजे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. म्हणूनच गहू, तांदूळ यांसारख्या दीर्घकाळ साठवता येणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणं फायदेशीर आहे. असं केल्यानं अनेक वेळा सवलतीसोबत काही वस्तू मोफतही मिळतात.
भाज्या घरीच पिकवा
अशा अनेक भाज्या आहेत ज्या तुम्ही घरी पिकवू शकता. हे करणं घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जर तुमच्याकडे जास्त जागा नसेल, तरीही तुम्ही कोथिंबीर, मिरची, लसूण, टोमॅटो, वांगी यांसारख्या भाज्या बाल्कनी किंवा किचन गार्डनमध्ये छोट्या कुंड्यांमध्ये लावू शकता.
नॉन स्टीक भांडी वापरा
भारतीय स्वयंपाकघरात तेलावर सर्वाधिक खर्च होतो. कारण लोकांना जास्त तेल घालून मसालेदार पदार्थ खायला आवडतात. त्यामुळं हे टाळण्यासाठी नॉन-स्टिक भांडी किंवा अशी भांडी वापरणं फायदेशीर ठरेल, ज्यांना स्वयंपाकासाठी तेलाची गरज कमी लागते. याच्या मदतीने तुम्ही तेलावरच्या खर्चावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकता.