आनंदाचं ‘बाळ’कडू

लॅाकडाउन नुकताच संपला होता आणि हळूहळू जनजीवन पूर्ववत होत होतं.
railway
railwaysakal
Updated on

लॅाकडाउन नुकताच संपला होता आणि हळूहळू जनजीवन पूर्ववत होत होतं. कोविडची भीती सगळ्यांमध्ये होतीच; पण कामासाठी घराबाहेर पडणं गरजेचं झालं होतं. बस, रेल्वे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाल्या होत्या. माझं कर्जतला येणं-जाणं रेल्वेनंच होत असे. मी दोन दिवस कर्जतला गेले होते.

एरवी बॅंकर्सच्या आवाजाने (खंडाळ्याचा घाट चढण्यासाठी कर्जतला प्रत्येक मेल ट्रेनला जोडलं जाणारं इंजिन) दणदणून जाणारं कर्जत स्टेशन त्या दिवशी एकदम शांत होतं. ना वडापाव विकणारे फेरीवाले, ना भेळवाल्या मावशी.

गाडी स्टेशनला शिरल्यावर एक वेगळंच भीतीदायक वातावरण होतं. ट्रेनच्या रॅाडला हात लागला म्हणून लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करत मी फलाटावरून चालू लागले. चालत असताना माझ्यासमोर एक बाई आली. शिडशिडीत. परकर झंपर घातलेली. डोक्यावर ओढणी, तिच्या कडेवर एक खूपच गोंडस बाळ होतं. हातात कडीचा मोठा डबा.

डोक्यावर चुंबळ आणि त्यावर एक जीर्ण झालेलं घमेलं. त्या घमेल्यात एक मळकटशी गोधडी आणि नायलॅानची दोरी. मला का कोण जाणे; पण तिला बघून जरा गंमत वाटली. म्हणून मी थांबले. तिनं त्या गोड गुटगुटीत बाळाला फलाटावर ठेवलं. जेमतेम मान धरायला शिकलेलं ते पिल्लू आजूबाजूला बघत होतं.

तिथे असलेल्या स्कटीलच्या कचरापेटीखाली ती दोरी बांधून त्यावर गोधडी टाकली आणि छोटासा पाळणा तयार केला. त्या बाळाला त्या पाळण्यात ठेवलं!! ते बाळही कुठलीही कुरकुर न करता त्या पाळण्यात छान बसलं. ती बाई तिथून ट्रॅकमध्ये उतरली आणि कामाला लागली.

मला नवल वाटलं. सगळीकडे कोविडची भीती, सतत सॅनिटायझरचा मारा या वातावरणात त्या बाईला आपण बाळाला चक्क कचरापेटीखाली बसवलंय हा विचार मनात आला नसेल का? त्यात ते बाळ ये-जा करणाऱ्या ट्रेनच्या हॅार्नचा आवाज कसा सहन करेल?, तिथं केवढी धूळ असेल या आणि अशा अनेक प्रश्नांनी मलाच त्रास व्हायला लागला.

ती बाई, तिचा नवरा आणि असे आठ-दहा जण ट्रॅकवर खडी मोकळी करण्याचं काम करत होते. अधूनमधून त्या बाळाला हाका मारत काहीतरी टिवल्याबावल्या करत होते.. ते सगळं बघून मन गलबललं.. आणि नवलही वाटलं. आपण आपल्या बाळांना किती जपतो, कुठंही जरा धूळ माती त्याना लागुही देत नाही; पण त्या बाळाच्या बाबतीत कसली इम्युनिटी? कसला कोविड? आणि कसलं हायजिन!

मग वाटलं, कदाचित तुमच्यावर आलेली परिस्थितीच तुमची इम्युनिटी वाढवत असेल का? किंवा मग पुन्हा त्या बाळाला असं ठेवावं लागू नये म्हणूनच अशा भीतीदायक काळात बाळाला असं ठेवून मेहनत करत असतील का ते आई-बाप? काय भविष्य असेल त्या बाळाचं? कितीसा पगार मिळत असेल त्याना? तरीही किती आनंदी दिसत होते ते. हे आणि असे अनेक विचार करत मी तिथं उभी होते.

हातात सॅनिटायझरची बाटली होतीच. मी ज्या लोकलनं आले, ती लोकल निघायची वेळ झाली. गाडीनं हॅार्न दिला आणि माझी तंद्री तुटली. मी त्या गोड बाळाकडे बघून टाटा केला, त्यावर ते मान कशीबशी वळवत गालातल्या गालात हसलं. मी मात्र परत एकदा मास्क नाकावर चढवत हाताला सॅनिटायझर लावत घराकडे निघाले!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com