Love Matters: "साडी, मंगळसूत्र आणि जोडव्यांची बंधनं घालणारा मी कोण?' सांगताहेत आरजू-विशाल

Valentine day
Valentine day

Valentine Week Special : आरजू आणि माझी पहिल्यांदा मैत्री, मैत्रीतून प्रेम झाले आणि पुढे जाऊन आम्ही सहजीवन सुरू केले. त्यात आमचे हिंदू-मुस्लिम प्रेममय सहजीवन असल्यामुळे प्रेम या विषयावर आजवर खूप बोलून आणि लिहून झाले आहे. मात्र प्रेम हा विषयच असा आहे की, त्याच्या सतत नवनवीन बाजू समोर येतात आणि प्रेम याविषयावर सतत बोलण्याची, लिहिण्याची इच्छा अनावर होते. 

आरजू आणि माझी ओळख होऊन नऊ वर्षे झाली. पहिली दोन वर्षे मैत्रीची आणि त्यानंतर आमचे प्रेम सुरू झाले. मग दोन वर्षांनी आमचे सहजीवन सुरू झाले. त्याला आता पाच वर्षे होत आहेत. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी साधना साप्ताहिकाच्या प्रकाशन विभागात नोकरी करत होतो. त्यात पुस्तकांवर आमच्या दोघांचंही जिवापाड प्रेम. पहिल्याच भेटीत एका कॉमन मित्राकरवी ओळख आणि मग् तिथेच गप्पा रंगल्या. एक मुस्लिम मुलगी एवढे शुद्ध मराठी बोलते, डॉक्टर आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आणि सामाजिकदृष्ट्या एवढी संवेदनशील या गोष्टीचे मला विशेष आणि कौतुक वाटले. यातूनच ओढ निर्माण झाली आणि आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. निखळ गप्पांची गरज आणि गप्पा मारण्यासाठी आम्ही एकमेकांना साजेशे आहोत, इतकेच आमच्या मनाला माहीत होतं. आता लिहिताना हसायला येते, पण सांगतो, आरजूला लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठी आम्ही पुण्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांना देखील भेटलो आहोत आणि माझ्या पूर्वीच्या मैत्रिणीशी माझे व्यवस्थित सूत जुळावे म्हणून आरजू माझ्याशी तासनतास बोलली आहे. निखळपणे एकमेकांच्या आयुष्यातील भल्याबुर्‍या गोष्टीबद्दल बोलणे हा आमच्या मैत्रीतील महत्वाचा भाग होता. त्यामुळे तिचे हसणे आणि माझे हॅंड्सम दिसणे, याला आम्ही अजिबात भाळलो नाही. पण आम्ही भाळलो ते आमच्या एकमेकांच्या आचार-विचारांवर ! मात्र एकमेकांवर छाप टाकण्यासाठी आम्ही कधी वेगवेगळे चेहरे दाखवले नाहीत. एकमेकांना प्रेमासाठी पटवणे, त्यासाठी मागेपुढे करण्याची गरजच वाटली नाही.

आमचे मैत्रीतून सहजपणे प्रेमाकडे पाऊल पडले आहे. आमचे कॉमन मित्रमैत्रीणी आम्हाला सतत सांगायचे की, तुमचे वागणेबोलणे हे मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेमाचा आहे. मग कुठे आम्ही एकमेकांच्या वागण्याचे परीक्षण करू लागलो. ओळख, भेटी, मग मैत्री आणि तासंतास निखळ गप्पा यातून एकमेकांचे दृष्टिकोन उलगडत केले. वागण्यातील स्पष्टता लक्षात आली आणि या सर्वांतूनच आतमध्ये कुठेतरी उमगत गेले की एकमेकांना असाच साथीदार हवा आहे. त्यामुळे एकमेकांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्लृप्त्या वापराव्या लागल्या नाहीत. उलट आम्हाला एकमेकांच्या क्षमता आणि मर्यादा चांगल्या माहीत होत्या आणि त्या प्रत्येकात असतात हे लक्षात घेऊन आम्ही माणूस म्हणून एकमेकांचा स्वीकार केला.

प्रेम आहे, पण पुढे काय ? असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा आम्ही कोणताही विलंब न लावता सोबत रहाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकदाही मागे न फिरता दोन वर्षांनी आमचा बौद्ध जयंतीला विशेष विवाह कायद्यानुसार सहजीवनारंभ सोहळा झाला. कोणतेही कर्मकांड केले नाही. आमच्या लग्नाचे पौरोहित्य कुण्या भटजीने अथवा कुण्या मौलविणे न करता कायदेशीरपणे सरकारच्या अधिकार्‍यांनी केले. त्याला आमचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवार, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि दिग्गज उपस्थित होते.

विशेष विवाह कायद्यानुसार आम्ही एकत्र आल्याने धर्मांतराचा प्रश्नच आला नाही. देश पातळीवर धर्मांतरामुळे चिघळणारे वाद आमच्यावेळी काही झाले नाही, पण सामाजिक दबाव आणि नातेवाईकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. मी शालेय जीवनापासूनच परिवर्तनवादी चळवळीत असल्याने घरी, मी राहतो त्या गावात, मित्र परिवारात माझे विचार माहीत होते. त्यामुळे मला फार काही विरोधाला, संघर्षाला सामोरे जावे लागले नाही. मात्र माझ्या घरच्यांना इतरांचे टोमणे सहन करावे लागणे, बोलणी ऐकावी लागली, तरी देखील ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. माझ्यापेक्षा आरजूला जास्त विरोध सहन करावा लागला. काही धार्मिक संघटनांनी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर ट्रोल केले. अनेकांनी आरजूच्या घरच्यांना हरतर्हेने सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक नातेवाईकांनी आरजूशी बोलणे बंद केले. नातेवाईकांवर देखील सामाजिक दडपण आणले गेले. तरी देखील आरजूचे घरचे आमच्या पाठी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे आम्ही सहजीवन सुरू करू शकलो. घरच्यांनाच मान्य आहे तर विरोध करणारे आपण कोण? असा प्रश्न धर्मांध लोकांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे आमच्यावर ते दबाब टाकू शकले नाहीत. आम्ही दोघे आंतरधर्मीय असतानाही आम्ही सहजीवन जगतोय, यात आम्हाला फार कौतुक वाटत नाही, कारण की आम्ही नव्या पिढीचे, नव्या विचारांचे पाईक आहोत. पण आमच्या दोघांचे कुटुंबीय आमच्या पाठीशी उभे राहिले, याचे आम्हाला सतत कौतुक वाटत आले आहे, कारण ते ज्या ग्रामीण भागात रहातात, तेथील विचार आणि रितिभाती झुगारून ते आमच्या पाठीशी उभे राहिले, ही खरे तर सलाम करण्यासारखी गोष्ट आहे.

आमची मैत्री, प्रेम, सहजीवन हे वैचारिक पायावर उभे आहे. त्यात स्वातंत्र्य आहे, त्यात कामाचे समान वाटप आहे, त्यात आदर आहे. आरजू राज्य विक्रीकर निरीक्षक आहे, तर मी पत्रकार, कार्यकर्ता म्हणून काम करतो. पुरेपूर एकमेकांना स्पेस देत जगत असतो. पुरुषाने भांडी घासली, कपडे धुतली तर बिघडत नाही, हा आमचा प्रेमातील विचार आम्ही आता सहजीवनातही जगतो. बालसंगोपन ही काही फक्त आईचीच जबाबदारी नाही, तर ती वडिलांचीही जबाबदारी असते, हा विचार आमच्या मेंदूत कोरलेला असल्याने बाळाच्या जन्मापासून त्याला मालिश करण्यापासून ते त्याची अंघोळ, शी-सु, त्याला सांभाळण्याचे काम मी आनंदाने करतो. त्यातून मला सृजशीलतेचा आविष्कार घडतो. लग्नानंतर बायकोने पतीचे नाव, आडनाव स्वतःच्या नावापुढे लावलेच पाहिजेत, असा कुठे नियम नाही. तसेच, ती आणि मी कोणतेच धार्मिक कर्मकांड करत नाही. पण तिला जर करायचे असेल तर तिने ते करू नये, टिकली लावावी, स्वतःच्या नावापुढे माझे नाव, आडनाव लावावे, साडी वापरावी, मंगळसूत्र घालावे, हे तिच्यावर बंधन घालणारा मी कोण? ती जे करते, त्यात तिच्यामुळे माझी काहीही हानी होत नाही, तर मग हे करू नको असं काही तिला बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही. आम्हाला खूप जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी आहेत. तिथेही आम्ही एकमेकांचे स्वातंत्र्य जपतो. खरे तर हे स्वातंत्र्य जपलेच पाहिजे कारण स्वातंत्र्य हा प्रेमाचा आविष्कार आहे. बंधने म्हणजे प्रेम नव्हे !

-    विशाल विमल, पुणे (7276559318)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com