Maharashtrian Jewelry : प्रियंकापासून काजोलपर्यंत सगळ्यांनाच मराठी दागिन्यांची भूरळ! बघा कलेक्शन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry : प्रियंकापासून काजोलपर्यंत सगळ्यांनाच मराठी दागिन्यांची भूरळ! बघा कलेक्शन...

Maharashtrian Jewelry : महाराष्ट्राच्या मराठमोळ्या दागिन्यांची सर बाकी कोणत्याच दागिन्यांना नाही; विशेष म्हणजे या मराठमोळ्या दागिन्यांना बॉलीवुड सेलेब्रिटींकडूनही विशेष पसंती मिळते आहे, तान्हाजी या चित्रपटाच्या वेळी काजोलने आपण नऊवार साडीच्या आणि दागिन्यांच्या प्रेमात आहोत हे सांगितलेलं, श्रद्धा कपूर तर नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मराठमोळ्या दागिन्यांचे फोटो टाकत असते.

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

आपण अनेक चित्रपटांमध्ये बॉलीवुड अभिनेत्रींना मराठी साज परिधान केल्याचं बघितलेलं आहे. नाकी नथ, गळ्यात चिंचपेटी, राणीहार, बोरमाळ, कोल्हापुरी साज, तोडे, बुगड्या, कुड्या, झुबे किती ते प्रकार... जरा गडबडायला होतं, नाही? अशात नक्की मराठमोळा साज कसा करावा हा प्रश्नही पडतच असेल, हरकत नाही, या सगळ्यात हे काही विशेष दागिने तुमच्याकडे असलेच पाहिजेत.

१. चिंचपेटी

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

चिंचपेटी हा ठुशीसारखाच गळ्यालगत घालण्याजोगा एक पारंपरिक दागिना आहे. ही प्रामुख्याने मोत्याची असते. कधी या पेटीला खाली एकच मोती तर कधी लांबी वाढवत गेलेल्या मोत्यांच्या लहान माळांच्या छोट्या तोरणाने गळा भरून जाईल असा दागिनाही मिळतो.

२. तन्मणी

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो. याच्या मध्यभागी असलेल्या पदकाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात बघायला मिळतात. त्यात दोन किंवा तीन सर असतात. हा दागिना मोत्यांच्या मण्यांत विणलेला असतो. काठपदराच्या साडीवर खूप शोभून दिसणारा हा दागिना आहे.

३. कोल्हापुरी साज

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

कोल्हापुरकरांची शान असलेला हा दागिना लाखेवर तयार केला जातो. कोल्हापूरच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरुन त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. मध्यभागी लोलक असते त्यास 'पानडी' असेही म्हणतात.

४. मोहनमाळ

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

महालक्ष्मीच्या दागिन्यातील हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो. आजही अनेक स्रिया या दागिन्याला पसंत करतात. मोहनमाळ शक्यतो तीन पदरी असते व कधीकधी यात पदकही घातले जाते.

५. कुडी

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिद्ध झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६ ते ७ मणी वापरुन केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुड्या या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुड्यांव्यतिरीक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल, सोन्याचे कान यांसारखी आभूषणेही कानात घातली जातात.

६. नथ

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

महाराष्ट्रीयन स्त्रीचे विशेष अभिमानाचे आभूषण म्हणजे नथ. नथ मोत्याची, खड्यांची व हिऱ्याची असते. नथीचे मुख्य दोन प्रकार असतात एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस असते.

७. बुगडी

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

कानाच्या खालच्या पाळीबरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते. ही मोत्यापासून बनविलेली असते. कानाच्या पाळीच्या वरच्या भागांवर घातली जाणारी बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.

८. तोडे

Maharashtrian Jewelry

Maharashtrian Jewelry

तोडे हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्यांसारखाच असतो. हा दागिना बांगडयांपेक्षा ही दिसायला जाड असतो. शिवाय हिरव्या बांगड्या सोबत तोडे घातल्यावर खूप उठून दिसतात. या तोड्यांवर सुरेख असे बारीक नक्षीकाम केलेले असते.