esakal | ‘अर्थ डे’ का साजरा केला जातो ? जाणून घ्या रंजक कथा

बोलून बातमी शोधा

‘अर्थ डे’ का साजरा केला जातो ? जाणून घ्या रंजक कथा
‘अर्थ डे’ का साजरा केला जातो ? जाणून घ्या रंजक कथा
sakal_logo
By
शर्वरी जोशी

पृथ्वी ही आपली माता आहे, असं अनेकदा आपणं ऐकतो. ते काही अंशी खरंदेखील आहे. जन्म झाल्यापासून प्रत्येक मानव या पृथ्वीवर मुक्तपणे संचार करत असतो. तिच्या अंगाखांद्यावर खेळत असतो. त्याच मातेचा आज हक्काचा दिवस म्हणजे वसुंधरा दिन. आजच्या दिवसाला अर्थ डे असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी सजीवसृष्टी पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे खरं तर या दिवसाचं खास महत्व आहे. परंतु, मग हा दिवस का साजरा करावा ते जाणून घेऊयात.

निसर्ग- पर्यावरण यांचं मानवाशी अतुट नातं आहे. दोन्हीही गोष्टी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा दिवस साजरा करण्याची नेमकी सुरुवात कुठून झाली ते आज जाणून घेऊयात.

१९७० साली खरंतर अमेरिकेत अर्थ डे साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या दिवशी तब्बल २० लाखांपेक्षा अधिक जणांनी हा दिवस साजरा केला. पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता त्याकाळी अनेक शहरामधील लोक एकवटले व त्यांनी धोरणकर्त्यांना या विषयी लक्ष देण्यास भाग पाडलं. त्यांच्या या कृतीमुळे तेथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. अमेरिकेपासून सुरुवात झालेला हा दिवस १९९० मध्ये संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला.

दरम्यान, सध्याच्या काळात निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केवळ अर्थ डेच्याच दिवशी नव्हे तर अन्य दिवशीदेखील निसर्ग जपला पाहिजे. म्हणूनच, प्रदुषण रोखणे, इतरत्र होणारा कचरा कमी करणं यासारखे लहान लहान बदलांची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. तर, खऱ्या अर्थाने वसुंधरा दिन साजरा होईल.