‘संदेश’वहन

मी माझ्या मैत्रिणीकडे राहायला गेले होते. ती कामानिमित्त मुंबईत एकटीच राहते. तीही कलाकार आहे, त्यामुळे तिच्या घरी येण्या-जाण्याच्या वेळा फारशा निश्चित नसतात.
Message Writing
Message Writingsakal

- डॉ. समीरा गुजर-जोशी

मी माझ्या मैत्रिणीकडे राहायला गेले होते. ती कामानिमित्त मुंबईत एकटीच राहते. तीही कलाकार आहे, त्यामुळे तिच्या घरी येण्या-जाण्याच्या वेळा फारशा निश्चित नसतात. मी आज तिच्या घराजवळ शूटिंग करत होते. छान योग जुळून आल्याने आम्ही लगेच प्लॅन आखला. मी शूटिंगनंतर तिच्या घरी गेले. मस्त गप्पा मारत चमचमीत जेवण झालं. आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या, तर ती म्हणाली, ‘थांब, एक मिनिटात आले.’

तिने पटकन एक पिशवी दाराला s आकाराच्या एका खिळ्यानं अडकवली. ती म्हणाली, ‘अग, मी कधी घरी असते- नसते. मग ही माझी आणि दूधवाल्याची कोड लँग्वेज आहे. पिशवी पाहिली, की तो एक लिटर दूध पिशवीत ठेवतो आणि बेल वाजवतो. तसा सोसायटीत प्रत्येकाचा रतीब ठरलेला आहे; पण दोन-तीन लिटर दूध तो एक्स्ट्रा आणतो बरोबर. त्यामुळे आमचं हे संदेशवहन काम करतं.’

मला तिचा शब्द आवडला - संदेशवहन. खरंच, घरातल्या घरात किंवा आसपासच्या व्यक्तींबरोबर किती वेगवेगळ्या निरोपांची देवाण-घेवाण करावी लागते आपल्याला. घरकामासाठी येणाऱ्या बाईंना सूचना द्यायच्या असतात. मुलं/नवरा आपल्याआधी घरी येणार असतील, तर त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. हे निरोप वेळेवर मिळाले, तर काम खूप सोपं होतं. वेळ वाचतो.

आमच्याकडे आम्ही यासाठी फ्रीजचं दार वापरतो. फ्रीज मॅग्नेटनं त्यावर कागद लावतो. त्यावर निरोप लिहून ठेवतो, ‘आत डोशाचं पीठ आहे, बाहेर काढून ठेवणे’... हा निरोप घरी आधी आलेला मेंबर वाचतो आणि तसं करतो. म्हणजे मी घरी येईपर्यंत पीठ रूम टेंपरेचरला आलेलं असतं. (कधी कधी तर डोसे खाऊनही झालेले असतात.) किंवा माझ्या लेकीचं शाळेचं, क्लासेसचं टाइमटेबल आम्ही तिथंच लावतो. कारण मी घरी नसताना आजी-आजोबा तिचं शेड्युल सांभाळत असतील, तर त्यांना सगळं शेड्युल लक्षात ठेवायला नको. नुसती फ्रीजच्या दारावर नजर फिरवली की झालं.

अशाच आणखी एक दोन जागा आहेत. काही वस्तू संपली आहे, आणायची आहे, तर डायनिंग टेबलवर पैसे आणि चिठ्ठी ठेवायची इत्यादी. अर्थात यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मी माझ्या आईकडून शिकले आहे. कारण माझं बालपण शहरात छोट्या कुटुंबात गेलं. मला वाटतं, गावात आजही अशा संदेशवहनाची गरज फार लागत नसेल- कारण एकमेकांना निरोप देणारं घरात तरी कोणी असतं किंवा शेजारी तरी.

आपल्या घराला कुलूप पाहतो आहोत, तोवर कोणीतरी काकू येऊन सांगते, ‘अरे, आईला जरा जावं लागलं बरं. पण किल्ली दिली आहे माझ्याकडे. आत्ताच आलीस ना शाळेतून? लाडू खा आणि मग जा घरी.’ हे असं संदेशवहन किती छान! पण छोट्या कुटुंबांत त्यातही शहरात जिथं सगळेच आपापल्या व्यवहारात बिझी आहेत, तिथं हे अशा संदेशवहनाचं सुख दुर्मीळच म्हणावं लागेल.

अलीकडेच माझा परिचय ‘फॅमिली कॅलेंडर’ या कल्पनेशी झाला आणि मला ती कल्पना खूप भावलीदेखील. ‘फॅमिली कॅलेंडर’ हे एक शेअर्ड कॅलेंडर आहे. खरंतर गुगल कॅलेंडर आपण सगळेच वापरतो. मोबाइलमध्येच असल्यानं, ते वापरणं अतिशय सोयीचं आहे. आपण एखाद्याच्या येऊ घातलेल्या वाढदिवसाची नोंद ठेवू शकतो किंवा डॉक्टरची फॉलोअप appointment कधी आहे, याची नोंद करू शकतो.

आपण कामंही नोंदवू शकतो. मला ठाऊक आहे, की मैत्रिणी, तू आता विचारशील, की याचा संदेशवहनाशी काय संबंध? तर गुगल फॅमिली या ॲपद्वारा आपण हे कॅलेंडर आपल्या कुटुंबीयांबरोबर शेअर करू शकतो. म्हणजे मी समजा कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार असेन, तर ती नोंद मी करताच माझ्या सर्व कुटुंबीयांना दिसतं. (त्यातही कोणत्या नोंदी मला शेअर करायच्या आहेत हेही मी ठरवू शकते.) अनेकदा दिवसभरात आपलं कुटुंबीयांशी बोलणं होत नाही.

झालं तरी असल्या नोंदी सांगायच्या राहून जातात किंवा सांगितल्या तरी ‘तू कधी सांगितलंस?’, ‘या शनिवारी का? मला वाटलं पुढच्या!’ हे असे घोळ व्हायचे काही राहत नाहीत. त्या दृष्टीनं मला ही सोय छान वाटते. मला ही गोष्ट अलीकडे कळली आणि वाटलं, की जरा उशीरच झाला हे समजून घ्यायला. आता मोबाइल सगळ्यांच्या हातात आल्यापासून गजर लावण्यापासून ते ठिकाण शोधण्यापर्यन्त अनेक कामांसाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत.

व्हॉटसॲपवर ‘फॅमिली ग्रुप’ नाही असं कुटुंब आता शोधावे लागेल. मग संदेशवहनाचा हा गुगल मार्ग फार प्रॅक्टिकल वाटला मला. तू वापरतेस का ‘फॅमिली कॅलेंडर’? तुमच्या घरातलं संदेशवहन कसं चालतं? मला नक्की सांग. कारण हे निरोप पोचले, तर कुटुंबातले सदस्य एकमेकांशी खरंखुरं बोलू शकतात. नाहीतर आपलं बोलणं कामापुरतं होतं अनेकदा. अर्थात तो एक वेगळाच विषय. त्याविषयी पुढे केव्हातरी बोलू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com