- अश्विनी आपटे-खुर्जेकरआपल्याला भाषा शिकवली जाते; पण संवाद कसा साधायचा हे शिकवलं जात नाही. मातृभाषा आपण लहानपणीच बोलायला शिकतो, मुख्यतः ऐकून, बघून, आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करून; पण भाषा शिकणं आणि संवाद साधणं यात खूप फरक असतो..बऱ्याच वेळेला आपण शब्दांवर प्रभुत्व मिळवतो, व्याकरण बरोबर शिकतो, तरीसुद्धा संवाद नीट जमत नाही- कारण चांगली भाषा म्हणजे चांगला संवाद नाही. संवाद कसा साधायचा, कसा ऐकायचा, कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या अयोग्य हे बरेचदा कोणी शिकवतच नाही. मात्र, आता याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे- कारण संवाद हे नात्यांचं, सहजीवनाचं आणि समाजाच्या गाठीभेटीचं सशक्त माध्यम आहे. योग्य संवाद शिष्टाचार शिकणं ही आता काळाची गरज झाली आहे..बहुतेक वेळा बोलताना आपण काही गोष्टी अगदी नकळतपणे करतो. मध्येच दुसऱ्याचं बोलणं तोडणं, आपलीच गोष्ट पुनःपुन्हा सांगणं किंवा दुसऱ्याच्या अनुभवावर काहीतरी वरचढ सांगणं हे सगळं ऐकणाऱ्याला अस्वस्थ करतं. संवादामध्ये ‘मी’पेक्षा ‘आपण’ हे महत्त्वाचं असतं. ऐकणं आणि समजून घेणं याला संवादात खूप महत्त्व आहे.कधी कधी आपण अति वैयक्तिक प्रश्न विचारतो. ‘तू लग्न का नाही केलं?’ ‘पगार किती मिळतो?’ ‘तुम्हाला बाळ कधी होणार’ असे प्रश्न अगदी सहजपणे विचारले जातात; पण ते दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे असतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याचे अनुभव, त्याच्या परिस्थितीची जाणीव नसताना असे प्रश्न नक्कीच टाळले पाहिजेत..तसंच आदर, शांतपणा, समजूतदारपणा अशा काही गोष्टी संवादांत असाव्यात. समोरच्याचं मत वेगळं असलं, तरी त्याला मान देणं गरजेचं असतं. मतभेद असू शकतात; पण त्यासाठी संबंध तोडणं किंवा टोचून बोलणं गरजेचं नसतं. आपण संवाद साधतो तेव्हा आपण फक्त माहिती देत नसतो, तर एक नातं घडवत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे.संवाद शिकणं म्हणजे नुसतं चांगलं बोलता येणं नाही, तर समोरच्याच्या मनाचा, मतांचा आदर करणं, शब्दांचा वापर विचारपूर्वक करणं, समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकणं आणि गरज असेल तेव्हा शांत राहणं हे संवादाचे महत्त्वाचे भाग आहे..आजच्या धावपळीच्या युगात मैत्री, कुटुंब, सहकारी या नात्यांमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला चांगल्या संवादकौशल्याची गरज भासते. सोशल मीडियामुळे तर संवाद आणखीन कठीण झालाय. शब्दांचा सूर, चेहऱ्यावरील हावभाव आणि आपली देहबोली ही तर इथं हरवूनच जाते आणि फक्त शब्दांना महत्त्व प्राप्त होतं आणि म्हणून प्रत्यक्ष संवादात शिष्टाचार पाळणं अधिक गरजेचं ठरतं.माझं चुकलं हे मान्य करणं कठीण असलं तरी हे मान्य केलं गेलं पाहिजे. कुठे चुकीचं सूर लागला असेल, कुणाला त्रास झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करणं ही संवादातली खूप मोठी गोष्ट आहे..मैत्रिणींनो, बोलणं हे एक प्रभावी माध्यम आहे. ते योग्य पद्धतीनं वापरलं तर नाती जोडली जातात. शब्द ज्या प्रकारे नाती जोडू शकतात, त्याच प्रकारे नाती तोडू शकतात. म्हणून संवादाचे शिष्टाचार अंगीकारा, ऐका, समजून घ्या आणि जबाबदारीनं बोला. कारण चांगल्या संवादांतूनच आत्मविश्वास, नातेसंबंध आणि व्यक्तिमत्त्वाची उंची वाढते. तुमचं बोलणं तुमचं प्रतिबिंब असतं, त्यामुळे ते सुंदर असू द्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.