पावसाळ्यात घ्या बाळाच्या त्वचेची काळजी

नवजात बाळांची त्वचा ही प्रौढांपेक्षा 40-60 पट नाजूक असते.
 baby
baby

एप्रिल, मे महिन्यातील तप्त वातावरण थंड करण्यासाठी जून महिन्यात पाऊस पडतो. आणि, प्रत्येकालाच आनंद देऊन जातो. त्यामुळे पावसाळा हा तसं पाहायला गेलं तर अनेकांच्या आवडीचा ऋतू. मात्र, या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या काळात प्रत्येकानेच स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सोबतच आपल्या लहान मुलांचीदेखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. नवजात बाळांची त्वचा ही प्रौढांपेक्षा 40-60 पट नाजूक असते. त्यामुळे त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते पाहुयात. (Monsoon-care-tips-for-your-baby)

१. मालिश करणे -

बाळाला तेलाने मालिश करणे ही एक जुनी पद्धत आहे. त्यामुळे बाळाच्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात बाळाला मालिश केले जाते. इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) या संस्थेच्या मते, योग्य तेलाने, योग्य पद्धतीने मालिश केल्याने बाळाच्या मनावरचे तणाव कमी होतात, ‘कॉर्टिसॉल’ची पातळी कमी होते आणि बाळाची आकलनक्षमता वाढते.

जेव्हा बाळ आरामात असते आणि भुकेले नसते, तेव्हाच त्याला मालिश करणे योग्य. त्याला मालिश करण्याची खोली उबदार असावी. आपल्या हातावर थोडे तेल घेऊन ते बाळाच्या त्वचेवर हळूवारपणे लावा. हे तेल ‘व्हिटॅमिन ई’युक्त, हलके, चिकटपणा नसलेले असावे.

बाळाच्या अंगावर कडकपणे मालिश करू नये. त्याऐवजी, वरच्या दिशेने चोळणे, हात वर्तुळाकार फिरवणे अशा पद्धतींनी त्याच्या पुढील व मागील अंगाला हळूवारपणे मालिश करावे. या जेंटल स्पर्शामुळे पालक आणि मूल यांच्यात भावनिक बंध निर्माण होतात. बाळाच्या त्वचेत या मालिशमुळे उबदारपणा निर्माण होतो. पावसाळ्याच्या बदलत्या तपमानात हा उबदारपणा बाळाला लाभदायी ठरतो.

 baby
Shopping Tips : ओरिजनल लेदरची बॅग कशी ओळखावी?

२. सहजपणे अंघोळ घालणे -

पावसाळ्यात बाळाला दररोज अंघोळ घालणं गरजेचं नाही. आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्याला अंघोळ घातली, तरी ते पुरेसे ठरते. एखाद्या उबदार खोलीमध्ये कोमट पाण्याने बाळाला अंघोळ घालावी. बाळाच्या अंघोळीसाठी पालक ‘बेबी क्‍लेन्जर’ किंवा ‘बेबी सोप’ निवडू शकतात. ही उत्पादने ‘पॅराबिन’, कृत्रिम रंग आणि ‘थॅलेट्स’पासून मुक्त असल्याची आणि वैद्यकीयदृष्ट्या सौम्य व मुलाच्या त्वचेसाठी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. ‘मिल्क प्रोटिन’ आणि ‘व्हिटॅमिन ई’ने समृद्ध असलेला ‘बेबी सोप’ हा सर्वोत्तम असतो. साबणाप्रमाणेच, नैचुरल मिल्‍क एक्‍सट्रॅक्‍ट्स, राइस ब्रॅन प्रोटीन व 24 तास मॉइश्चरायझिंग यांसारख्या घटकांनी युक्त असे ‘बेबी वॉश’देखील बाजारात सहज उपलब्ध आहेत.

अंघोळ झाल्यावर बाळाला मऊ आणि उबदार टॉवेलने पुसावे. त्याच्या अंगावरील वळ्यांखालील भागदेखील व्यवस्थित कोरडे करावेत; जेणेकरून त्याच्या त्वचेवर पुरळ येणार नाही.

३. मॉइश्चरायझिंग महत्वाचे -

एका संशोधनानुसार, भारतातील 3 पैकी 2 बाळांची त्वचा कोरडी असते. चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन वापरल्यास बाळाच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. ग्लिसरीन किंवा मिल्‍क एक्‍सट्रॅक्‍ट्स व राइस ब्रॅन प्रोटीन असलेली, 24 तासांची ‘लॉकिंग सिस्टम’ असलेली लोशन्स यासाठी वापरली जाऊ शकतात. विशेषत: अंघोळीनंतर ती वापरावीत.

मॉइश्चरायझर वापरताना, ते दोन्ही हातांवर थोडे घ्या आणि बाळाच्या पुढील व मागील बाजूस हृदयाच्या आकारात लावा. ‘व्हिटॅमिन ई’ व मिल्‍क एक्‍सट्रॅक्‍ट्स असलेले ‘बेबी क्रीम’ बाळाच्या चेहऱ्यावर लावावे आणि उर्वरित शरीरावर लोशन वापरावे.

४. डायपर वापराबाबत काळजी -

पावसाळ्यातील हवामानातील आर्द्रता वाढली असते. त्यामुळे ओल्या व घट्ट डायपरमुळे बाळाच्या पार्श्वभागावर भागात खूप घाम येतो. परिणामी डायपरच्या भागात लाल चट्टे उमटतात, तेथील त्वचेची जळजळ होते आणि जंतूसंसर्ग होऊ शकतो. शक्य असेल तेव्हा नेहमी डायपर बदलावा किंवा बाळाला डायपर-मुक्त ठेवावे. डायपरची जागा स्वच्छ करण्यासाठी मॉइश्चरायझिंगसह ‘अल्कोहोल-मुक्त वाइप्स’ वापरावेत.

५. आरामदायी कपडे -

पावसाळ्यात संपूर्ण लांबीचे सुती कपडे घातल्यास, त्वचेला ताजी हवा मिळेल. त्यामुळे पुरळ टाळता येईल आणि डास चावण्यापासून बचाव होईल. जास्त पावसामुळे तपमान कमी झाल्यास, बाळाला मऊ वूलन स्वेटर घालावा.

( लेखक डॉ. प्रदीप सूर्यवंशी हे पुण्यातील बीव्हीयू मेडिकल कॉलेजमध्ये नवजात शिशू चिकीत्सा विभागाचे प्रमुख व प्राध्यापक आहेत. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com