Mrunal Kulkarni
Mrunal Kulkarnisakal

मानसीची चित्रकार मी...

माझ्या तीस वर्षांच्या करिअरमध्ये मी माझ्या अनेक छंदांबद्दल यापूर्वी अनेक ठिकाणी बोलले आहे; पण माझा एक छंद जो लोकांना अजिबात माहीत नाही, तो म्हणजे पेंटिंग.

माझ्या तीस वर्षांच्या करिअरमध्ये मी माझ्या अनेक छंदांबद्दल यापूर्वी अनेक ठिकाणी बोलले आहे; पण माझा एक छंद जो लोकांना अजिबात माहीत नाही, तो म्हणजे पेंटिंग. मी याविषयी फारसं बोलत नाही कारण ते अगदी, अगदी माझ्यापुरतं आहे. ती अगदी माझी वैयक्तिक कला आहे. मी माझ्या चित्रांचं प्रदर्शन मांडत नाही किंवा प्रत्येक गोष्ट मला फेसबुकवर टाकायलाही आवडत नाही; पण मला मनापासून चित्रं काढायला आवडतात.

मला ॲक्रेलिक चित्र काढायला आवडतात, मी अजून पोर्ट्रेटकडे वळले नाही. मला मुक्त चित्रं काढायला आवडतात. मी निसर्गचित्रंही काढते. नुकतंच मी राजगडचा बालेकिल्ला आणि रायगडावरची जगदीश्वर आणि समाधी या दोन्हीची चित्रं माझ्या नव्या घरासाठी काढली आहेत आणि आता माझे पती कौतुकाने ती चित्रे सगळ्यांना दाखवत असतात.

फार कमी लोकांना हे माहीत असेल, की अभिनय क्षेत्रात माझं येणं अपघातानं झालं. मी नेहमी म्हणते, की अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी नियतीनेच माझी निवड केली. मला अभिनव कला विद्यालयात जायचं होतं आणि मला चित्रकलेतच करिअर करायचं होतं. मला त्यात खूपच इंटरेस्ट होता. शाळेमध्ये मी एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षाही दिल्या होत्या, त्यामध्ये मला चांगलं यशही मिळालं होतं.

मला तेव्हा स्केचिंग आणि पेंटिंग इतकं आवडायचं, की मला त्यातच करिअर करायचं होतं. मला अजूनही आठवतं की, माझे आई-बाबा मला तेव्हा अनिल अवचट यांच्याकडे घेऊन गेले होते. अनिल अवचट, सुभाष अवचट या दोघांनाही त्यांनी भेट घालून दिली होती. अनिल अवचट इतके उत्तम लेखक; पण त्यांची ओरिगामी आणि चित्रकलाही प्रसिद्ध होती. सुभाष अवचट तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार.

त्यांनी मला असे काही प्रश्न विचारले, की त्यामुळे माझा कल, दृष्टिकोन बदलला. ते मला म्हणाले, ‘मग तुझ्या इतर छंदांचं काय? कारण तू या क्षेत्रात आलीस तर तुला इतर गोष्टींना वेळ देता येणार नाही. तुला माहीत आहे का अभिनव महाविद्यालयात फार कमी असे कलाकार आहेत- जे नाटकातही काम करतात, गाण्याचाही छंद जोपासला आहे. तुझं हे सगळं बंद होईल.

तुझी ती तयारी आहे का?’ मग मात्र माझं मन कचरलं आणि मग त्या दोघांनी मला मार्ग दाखवला. ‘हा छंद म्हणून सुरू ठेव आणि वाटल्यास पुढे जाऊन क्षेत्र बदल,’ असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा ‘स्वामी’ मालिकेतून मला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. ‘अभिनयाच्या क्षेत्रात तू अजून नवीन आहेस, लोकांचं प्रेम मिळतंय, तू ते सगळं बंद करून फक्त कलेच्या क्षेत्रात यावं असं आम्हाला वाटत नाही, त्यातूनही तू ठरव,’ असंही ते दोघं मला म्हणाले. मग मात्र मी चित्रकला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अभिनयावर लक्ष केंद्रित केलं.

पुढची अनेक वर्षं मला तो छंद जोपासायला जमलंच नाही. माझा तसा मूडही लागला नाही; पण कोरोनाच्या काळात मात्र मी या छंदाकडे अधिक लक्ष द्यायला सुरू केलं. त्यावेळी माझ्या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता. फक्त जे करशील ते सारासार विचार करून कर, एवढंच त्यांचं म्हणणं असायचं. कुठल्याही आईवडिलांची हीच इच्छा असते आणि हेच त्यांचं काम असतं.

ते वय असं असतं, की आपण एखाद्या गोष्टीवर अडून राहतो, मला हेच करायचंय असा हट्ट करतो. आजही कित्येक लोक कलेच्या क्षेत्रात येण्यासाठी आपण ज्यात शिक्षण घेतलंय ते क्षेत्र सोडतात. मी अनेकदा पाहते, काही इंजिनिअर असतात, काही डॉक्टर असतात, काही जण अर्धवट शिक्षण सोडतात आणि या क्षेत्रामध्ये येतात. हे त्या वयात ठरवणं अवघड असतं. त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर अनेक अपघात टळतील. तसा माझा हा अपघात टळला असं मला वाटतं.

इच्छा असली की तुम्हाला अशा छंदांसाठी नक्कीच वेळ मिळतो, त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. इतक्या वर्षांच्या करिअरनंतर मी मालिकांमध्ये काम करणं अगदीच कमी केलं आहे. मी सध्या चित्रपट आणि दिग्दर्शन यामध्येच रमते. त्यामुळे मला चित्रकलेसाठी छान वेळ मिळतो; पण सध्या तरी चित्रकला मला माझ्यापुरतीच ठेवायची आहे.

जेव्हा वेळ यायची असेल तेव्हा ती येईलच. माझं आधीपासून ठाम म्हणणं आहे की, फक्त काम एके काम केल्यानं माणसाला जीवन चांगल्या पद्धतीनं जगताच येत नाही. जीवन जगण्यासाठी तुम्हाला छंदाची अत्यंत आवश्यकता असते. डॉक्टरांनी तुम्हाला छंद जोपासायला सांगण्यापेक्षा आपणच स्वतःहून छंद जोपासावा.

सुदैवानं मी माझ्या आवडीच्या क्षेत्रातच काम करते; पण तरीही आपल्या व्यावसायिक आयुष्याशिवाय आपल्याला आयुष्यात काही गोष्टी करण्याचा पर्याय नेहमीच असतो. त्यामुळे हा पर्याय कायम ठेवायला हवा. कारण आपल्याला जे करायला आवडतं, तेच आपल्याला जगण्याची उर्जा देत राहतं.

(शब्दांकन - वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com