esakal | मास्क विसरणाऱ्या सिंड्रेलाची परिकथा; मुंबई पोलिसांकडून हटके जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

 mumbai police post

मास्क विसरणाऱ्या सिंड्रेलाची परिकथा; मुंबई पोलिसांकडून हटके जनजागृती

sakal_logo
By
शर्वरी जोशी

महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मुंबई, पुण्यासारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. इतकंच नाही तर, मास्क वापरणंदेखील सक्तीचं करण्यात आलं आहे. प्रशासनासोबतच वैद्यकीय आणि पोलिस प्रशासनदेखील नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम करत आहेत. यात मुंबई पोलिस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत आहे. अनेकदा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ते हटके पोस्टचा वापर करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळीदेखील मुंबई पोलिसांनी अशीच एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एप्रिल फूलचं निमित्त साधत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी त्यांनी थेट सिंड्रेला या कार्टून कथेचा वापर करुन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा : मास्क लावून जेवायचं कसं? यावर 'इटिंग मास्क'चा भन्नाट उपाय

"वस्तू विसरण्याचा चांगला परिणाम फक्त कथेत होऊ शकतो, खऱ्या आयुष्यात नाही! मास्क लावायला विसरू नका", अशी पोस्ट मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे.

सिंड्रेलाच्या कथेत सिंड्रेला तिचा काचेचा शूज पार्टीत विसरुन गेली होती. ज्यामुळे राजकुमार आणि तिची भेट झाली होती. विशेष म्हणजे याच कथेचा आधार घेत मुंबई पोलिसांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सिंड्रेलाचा बूट विसरल्यामुळे पुढे एक चांगली कथा घडली. मात्र, ही चूक मास्कच्या बाबतीत होऊ शकत नाही. मास्क विसरलात तर ही चूक महागात पडू शकते असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता मास्क लावणे, सॅनिटाइझर वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे.