जाणून घ्या यंदाच्या नवरात्रातील नऊ दिवसांचे नऊ रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri-colors

नवरात्रीत उपवास, नैवेद्याप्रमाणेच रंगांचेसुद्धा महत्त्व आहे. नऊ दिवस नऊ निरनिराळे रंग परिधान केले जातात.

जाणून घ्या यंदाच्या नवरात्रातील नऊ दिवसांचे नऊ रंग


नागपूर : अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात, परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. धरणीमातेबरोबर सर्वजण सुखावले असतात. अशा या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्र येते.

नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो.

तामसी, क्रूर वृत्तीच्या दुर्जनांचे प्राबल्य जेव्हा भूतलावर वाढते, तेव्हा त्या दुर्जनांपासुन साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देवी अवतार धारण करते. ती म्हणते, "भक्तांनो, मी तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे. तुम्ही मला शरण आलात की, मी प्रगट होईन तुम्हास दुःखमुक्त करीन. त्यासाठी तुम्ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस माझा उत्सव साजरा करीत जा. घटपूजा, होमहवन आदी करून माझे पूजन करा. जे माझ्यावर अचल निष्ठा ठेवतील, त्यांच्यामागे मी नेहमीच असेन.

प्रतिपदेस देवळात किंवा घरी घटस्थापना केली जाते. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस नंदादीप तेवत असतो. रोज एक माळ वाढवितात. एकूण नऊ माळा होतात. घराशेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात ते दसऱ्याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवव्या दिवशी होम होतो. याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला होते.

नवरात्र हा वर्षातील असा कालखंड आहे जो रंग, परंपरा,गायन आणि नृत्यांनी समृद्ध असतो. जे अध्यात्मिकतेचा शोध घेत आहेत त्यांना ही वेळ धार्मिक दृष्टया पवित्र आणि पूजनीय आहे. ही अशी वेळ आहे की आपण स्वत:ला जीवनातील इंद्रिय संवेदना आणि भौतिक सुखांपासून दूर नेऊन अध्यात्मिक प्रक्रियांमध्ये स्थिर करून अंत:सामर्थ्याचा निर्भेळ आनंद,संतोष आणि अगणित उत्साह जीवनात आणू शकतो.आणि हे सर्व आपल्या बाह्य वर्तणुकीतून सहजतेने व्यक्त होऊ शकते,हे होईल जेंव्हा आपल्यामध्ये सत्व गुण वाढेल आणि उपवास हा एक सात्विकता वाढवण्याचा पर्याय आहे.

उपवास शरीर शुद्ध करण्यासाठी केला जातो.विशिष्ट प्रकारच्या अन्नाचा विशिष्ट परिणाम शरीरावर होतो तसेच आपण सेवन केलेल्या अन्नाच्या प्रमाणाचा परिणाम सुद्धा शरीरावर होत असतो. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारचे अन्न ग्रहण करणे होय.

शरीर आणि मन हे दोन्ही जोडलेले आहे. म्हणून जेंव्हा शरीर उपवास करून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध होते. आणि निर्मळ मन हे शांत आणि स्थिर असते. म्हणून या नवरात्रीमध्ये थोडी फळे व पाणी किंवा अल्प प्रमाणात,पचायला हलके अन्न खाऊन उपवास करून शरीराला हलके ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्वांचा मनावर कसा परिणाम होतो.

नवरात्रीत उपवास, नैवेद्याप्रमाणेच रंगांचेसुद्धा महत्त्व आहे. नऊ दिवस नऊ निरनिराळे रंग परिधान केले जातात.

सविस्तर वाचा - काय आहे डिजीटल आय स्ट्रेन? जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय

यंदा १७ आक्टोबर रोजी नवरात्रोत्सव प्रारंभ होतो आहे. जाणून घेऊया यंदाच्या नऊ दिवसांच्या नऊ रंगांविषयी

  • १७ आक्टोबर पहिला दिवस करडा
  • १८ आक्टोबर दुसरा दिवस केशरी
  • १९ आक्टोबर तिसरा दिवस पांढरा
  • २० आक्टोबर चवथा दिवस लाल
  • २१ आक्टोबर पाचवा दिवस आकाशी
  • २२ आक्टोबर सहावा दिवस गुलाबी
  • २३ आक्टोबर सातवा दिवस निळा
  • २४ आक्टोबर आठवा दिवस पिवळा
  • २५ आक्टोबर नववा दिवस हिरवा

चला तर साजरा करुया नवरंगी नवरात्रोत्सव नव्या उल्हासाने, उत्साहाने आणि नव्या आकांक्षेने.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top