
स्मिता शेवाळे - अभिनेत्री
माझ्या लहानपणी नागपंचमी सण साजरा झालेला मी पाहिला आहे. नागपंचमीच्या दिवशी केवळ शाळेला सुट्टी आणि घरात गोडधोड एवढंच नसे, तर वारूळाची पूजा करणं, सगळ्या माहेरवाशिणी घरी आल्यावर त्यांची ओटी भरून सौभाग्याचं लेणं म्हणून बांगड्या देणं, हे सगळं बघण्याचं भाग्य मला लाभलं असं आता म्हणावं लागेल. कारण आताच्या काळात या सगळ्या गोष्टी दुर्मीळच आहेत. मी माझ्या आजोळी हा सण फुगड्या आणि वेगवेगळे खेळ खेळून साजरा केलाय. बांगड्या म्हटलं, की अजूनही मला गाव आठवतं, झाडावर बांधलेले झोके आठवतात आणि हातात वाजणाऱ्या त्या खळखळ बांगड्या... बांगड्या या आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिकतेचं प्रतीक आहेत. मी लहान असताना आजी ज्या कुठल्या तीर्थक्षेत्री जायची तिथून बांगड्या आणायची. किती आकर्षण वाटायचं या गोष्टीचं. खूप साऱ्या बांगड्यांचं कलेक्शन करावं असं वाटत असे. पुढे आता शूटिंगच्या निमित्तानं इतक्या ज्वेलरी आणि विविध साड्या नेसणं होतं, की आता मात्र काम नसेल तेव्हा अगदी साधं राहावं, काहीही परिधान करू नये असं वाटतं.