व्यक्तिमत्त्व खुलवणारी ‘किणकिण’

इतिहास, संस्कृतींमध्ये अलंकार आवर्जून येतात. इतिहासात कान देऊन ऐकाल, तर ‘बांगड्या’चीही किणकिण ऐकू येईल. भारतात तर प्रत्येक शुभ प्रसंगात बांगड्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे.
bangle
banglesakal

- पृथा वीर

इतिहास, संस्कृतींमध्ये अलंकार आवर्जून येतात. इतिहासात कान देऊन ऐकाल, तर ‘बांगड्या’चीही किणकिण ऐकू येईल. भारतात तर प्रत्येक शुभ प्रसंगात बांगड्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे. नववधूच्या हातात हिरवा चुडा चढतो, तेव्हा तिच्या मनातला आनंद तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसतो. म्हणूनच कदाचित बांगड्यांचे असंख्य प्रकार असले, तरी आजही काचेच्या बांगड्यांशिवाय शृंगार पूर्ण होत नाही.

बांगडी हा शब्द बंगाली किंवा ‘बांगरी’ या संस्कृत शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ हात सजवणारा दागिना असा आहे. पूर्वीच्या संस्कृतींपासून बांगड्या ही फॅशन ॲक्सेसरी आहे. सिंधू संस्कृती असो मोहेंजोदडो संस्कृती. आठवा ती, हातात बांगड्या असलेली ‘नर्तिका’. जरा मागे गेले, तर टेराकोटा, ऑयस्टर, लाकूड, काच, धातूंपासून बांगड्या तयार होत असल्याचे पुरावे मिळतात. मौर्य काळापासून बांगड्या हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे.

लाखेच्या बांगड्यांचा असाच इतिहास आहे. महाभारतातील ‘लाक्षागृहा’ची गोष्ट आपण नेहमी ऐकत आलोय. हस्तकलेसाठी प्रसिद्ध राजस्थान हाताने बनवलेल्या खास प्रकारच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लाखेच्या बांगड्या बनवण्याच्या कलेला जयपूरच्या राजघराण्याने संरक्षण दिले होते. आजही लाखेच्या बांगड्यांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. विशेष म्हणजे या बांगड्या तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये फारसा बदल झाला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही लाखेच्या बांगड्या हाताने बनवल्या जातात हे लक्षात घेण्यासारखे आहे.

बांगड्यांचे इतर प्रकारही तितकेच प्रसिद्ध आहेत. काचेच्या बांगड्यांचा किणकिण हा मंजूळ ध्वनी आहे. अलीकडे हातात गच्च बांगड्या भरण्याची पद्धत शहरी भागांत कमी झाली, तरीही ग्रामीण भागांतील महिला मात्र एका हातात दोन-दोन डझन बांगड्या भरतात. या बांगड्या घालून गावांतील महिला पाट्यावर वाटण वाटतात, तेव्हा एक वेगळा ध्वनी कानावर पडतो. असे म्हणतात, की बांगड्या हातात घातल्याने हातावर हलका दाब पडतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. बांगड्या मांगल्य आणि प्रेमाचे प्रतीक मानल्या जातात.

आजही लग्नापूर्वी बांगड्या भरण्याची प्रथा आहे. फक्त या बांगड्या हिरव्या रंगांच्या असतात. काचेच्या बांगड्यांपासून ते सोन्याच्या बांगड्यांपर्यंत, तुम्हाला निवडण्यासाठी विविध प्रकार मिळतात. या एका ॲक्सेसरीमध्ये काहीतरी खास आहे. बांगड्या कोणत्याही पोशाखांत मिसळून जातात आणि तुमच्या लूकमध्ये भर घालतात. वेगवेगळ्या रंगांच्या किंवा साडी किंवा ड्रेसप्रमाणे दोन रंगांच्या बांगड्या घालण्याचा ट्रेंड आहे. साधा कुर्तां परिधान केला असला, तर हातात अगदी तीन-चार बांगड्यासुद्धा खूप छान दिसतात. मग त्या काचेच्या असोत, की ऑक्सिडाइज्ड.

भरपूर प्रकार

प्रत्येक ड्रेस व साडीवर मॅचिंग ॲक्सेसरी हवी. काचेच्या बांगड्यांना यात मानाचे स्थान. फिरोजाबादी, हैदराबादी या काचेच्या बांगड्या किंवा काचेच्या प्लेन बांगड्या. नीट निवड केली, तर ही परफेक्ट ॲक्सेसरी आहे. याशिवाय लाख व स्टोनचे फ्युजन असलेल्या बांगड्या मिळतात. प्लॅस्टिकचे व स्टोनचे गोट, मीना वर्कच्या सुंदर बांगड्यांसह अलीकडे ऑक्सिडाइज्ड बांगड्या तर प्रचंड लोकप्रिय आहेत.

सुंदर नक्षीकाम व स्टोन हाताने बसवण्याऐवजी मशीनचा वापर असलेला लेशिया बांगड्या हासुद्धा उत्तम प्रकार. मेटलच्या बांगड्या, गोल, त्रिकोणी, चौकोनी आकारातल्या ‘धुनकी चुडी’, ‘धागे की चुडी’, ‘हैदराबादी फॅमिली सेट’, ‘स्टोन सेट’, ‘दुल्हन सेट’, ‘मेटल सेट’, काचेचे सेट, डायमंड बँगल्स असे किती तरी प्रकार आहेत. सोने, चांदी, प्लॅटिनमच्या बांगड्या गुंतवणूक आणि परंपरा या दोन्ही दृष्टिकोनांतून खरेदी केल्या जातात. अलीकडे मिनिमलिस्ट बांगड्या घेतल्या जातात. या प्रकारच्या बांगड्या वजनाने हलक्या असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com