esakal | झूम : इनोव्हा ते क्रिस्टाचा दमदार प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Innova and Crysta

झूम : इनोव्हा ते क्रिस्टाचा दमदार प्रवास

sakal_logo
By
प्रणीत पवार

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या (टीकेएम) ‘क्वालिस’ या लोकप्रिय गाडीनंतर ‘इनोव्हा’ या एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेईकल) प्रकारातील कारने भारतीय बाजारपेठ काबीज केली. हीच इनोव्हा ११ वर्षांनंतर नव्या रूपात ‘क्रिस्टा’ या नावाने भारतीय बाजारात आली आणि दीड दशकानंतरही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ती आपला दबदबा कायम ठेवून आहे. या गाडीने कारप्रेमींना एकाच प्रकारातील कारमध्ये जखडून न ठेवता, कार आणि एमपीव्हीमध्ये फरक ओळखायला शिकवले. त्याकाळी शेव्रोलेट ऑप्ट्रा, ह्युंदाई ईलेंट्रा, स्कोडा ऑक्टाव्हिया या कारना पर्याय नव्हते. परंतु, इनोव्हाने नवा पर्याय देत लोकांना सेदान आणि एमपीव्ही कारमधील प्राधान्यक्रम ठरवायला भाग पाडले.

पेट्रोल (एक्स शोरूम किंमत ६.८२ लाखांपासून) आणि डिझेल (७.४२ लाखांपासून) या दोन्ही इंधन प्रकारात फेब्रुवारी २००५ मध्ये लाँच झालेल्या इनोव्हाकडे ‘क्वालिस’ची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जाते. २००५ ते २००८ या कालावधीत इनोव्हाने १ लाख कार युनिट विक्री केल्या. डिसेंबर २०१०मध्ये टोयोटा मोटरने १०७ टक्के कार विक्रीचा विक्रम नोंदवला, ज्यामध्ये ७७ टक्के वाटा इनोव्हाचा होता. जागतिक बाजारातही इनोव्हा लोकप्रिय ठरली. त्यामुळे २०१२पर्यंत जगभरात एकूण ५० लाख कार विक्री झाल्या.

फेसलिफ्ट व्हर्जन

इनोव्हाचे पहिले फेसलिफ्ट व्हर्जन चार वर्षांनंतर, म्हणजेच २००९मध्ये बाजारात आले. यामध्ये तिला अधिक लक्झरियस लुक देण्यात आला. स्टिअरिंग व्हील कंट्रोल, इल्युमिनिशन कंट्रोल मीटर आणि एमआयडी डिस्प्ले (डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अँड फ्युएल कन्झम्शन इंडिकेटर) फॅब्रिक सिट्स, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आदी फिचर्स देण्यात आले. २००५ ते २००९ या कालावधीत इनोव्हाच्या १.६२ लाख युनिटची विक्री भारतात नोंदवण्यात आली.

२०१३मध्ये पुन्हा नव्या व्हेरियंट आणि वैशिष्ट्यांसह इनोव्हा बाजारात दाखल झाली. ज्यामध्ये रिअर रुफ स्पॉयलर, ग्राफिक्स, ड्युअल टोन लेदर सिट्स, क्रोम इफेक्टसह रिअर एक्झॉस्ट, गिअरच्या गोलाकार मुठीवर लाकडी फिनिशिंग, आकर्षक डॅशबोर्ड आणि आर्मरेस्ट आदींचा समावेश झाला. तसेच फॉग लँपला क्रोम इफेक्ट, नवीन फ्रंट ग्रील, रिडिझाईन केलेले फ्रंट बम्पर आदी बदलही करण्यात आले.

क्रिस्टाची एन्ट्री

टोयोटाने मे २०१६ मध्ये पूर्णत: नव्या रूपात ‘इनोव्हा क्रिस्टा’ बाजारात आणली. बाहेरील डिझाईन, इंटिरियर, आकर्षक फीचर्ससह बाजारात आलेल्या या इनोव्हाची किंमत १३.८४ ते २०.७८ लाख इतकी ठेवण्यात आली. या इनोव्हाच्या केबिनमधील आधुनिक फीचर्स आणि दर्जात्मक तंत्रज्ञानामुळे तिला अधिक प्रीमिअम लुक आला. या इनोव्हामध्ये २.४ लिटर डिझेल आणि २.७ लिटर पेट्रोल इंजिनमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला. सात एअर बँग, एबीएस, व्हेईकल स्टॅबिलीटी कंट्रोलसह नव्या लुकमधील क्रिस्टालाही ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता २०२१मध्ये इनोव्हाचे फेसलिफ्ट व्हर्जन थोड्या बदलांसह बाजारात आणले.

रिडिझाईन केलेले फ्रंट ग्रील, हेडलँप, बंपर, डायमंड कट अलॉय व्हील आदी बदल या २०२१च्या क्रिस्टामध्ये करण्यात आले आहेत. इको आणि स्पोर्ट असे ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. इको मोडमध्येच सर्वप्रकारच्या रस्त्यांवर म्हणजे अगदी महामार्गावरही आरामदायी प्रवास होतो. ॲक्सिलेटर अधिक दिल्यानंतर गाडी चांगला पिकअप घेते. स्पोर्ट मोडमध्येही गाडी चटकन वेग घेते. या कारमधील साउंड सिस्टिम, वातानुकूलन यंत्रणाही पॉवरफुल आहेत. क्रिस्टा प्रीमिअम एमपीव्ही असल्याने दूरच्या प्रवासात चालकासह सहप्रवाशांनाही थकवा जाणवत नाही. ही कार शहरी रस्त्यांवर ९ ते १० किलोमीटर प्रतिलिटर तर महामार्गावर १० ते ११च्या आसपास मायलेज देते.

इंजिन

पेट्रोल :

 • २.४ लिटर

 • २६८४ सीसी

 • १६६ पीएस पॉवर

 • २४५ एनएम टॉर्क

 • ट्रान्स्मिशन

 • ५-स्पीड मॅन्युअल

 • ६ स्पीड ऑटोमॅटिक

डिझेल :

 • २.७ लिटर टर्बो चार्ज्ड,

 • २३९३ सीसी

 • १५० पीएस पॉवर, ३४३-३६० एनएम टॉर्क

 • ट्रान्स्मिशन - ५-स्पीड मॅन्युअल

 • ६ स्पीड ऑटोमॅटिक

 • किंमत : १६.२६ ते २४.३३ लाख

प्रतिस्पर्धी कार

टाटा सफारी

 • २.० लिटर डिझेल टर्बोचार्ज कायरोटेक इंजिन

 • किंमत : १४.६९ ते १९.९९ लाख रुपये

ह्युंदाई अल्काझार

 • २.० लिटर पेट्रोल एमपीआय इंजिन

 • १.५ लिटर डिझेल सीआरडीआई इंजिन

 • किंमत : १६.३० ते २०.१४ लाख रुपये

loading image