झूम : इलेक्ट्रिक दुचाकींचा नवा ‘झटका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Bike

भारतात इलेक्ट्रिक कारपेक्षा इलेक्ट्रिक दुचाकींचा खप तुलनेने अधिक आहे. सर्वसमान्यांना इंधन आणि दुचाकींच्या वाढलेल्या किमतीमुळे इलेक्ट्रिक दुचाकीचा पर्याय किफायतशीर वाटतो.

झूम : इलेक्ट्रिक दुचाकींचा नवा ‘झटका’

भारतात इलेक्ट्रिक कारपेक्षा इलेक्ट्रिक दुचाकींचा खप तुलनेने अधिक आहे. सर्वसमान्यांना इंधन आणि दुचाकींच्या वाढलेल्या किमतीमुळे इलेक्ट्रिक दुचाकीचा पर्याय किफायतशीर वाटतो. ‘आयसीई’ दुचाकींच्या किमतीत इलेक्ट्रिक दुचाकी येत असल्याने अनेकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळवला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही अद्ययावत वाहने बाजारात दाखल करावी लागत आहेत. नोएडा येथे नुकताच ऑटो एक्स्पोही संपन्न झाला. त्याचही इलेक्ट्रिक दुचाकींचे दमदार सादरीकरण झाले. अशाच काही अद्ययावत, नवीन दुचाकींचा घेतलेला आढावा.

एथर ४५०

एथर एनर्जीने ४५० सिरिज इलेक्ट्रिक स्कूटर अद्ययावत स्वरूपात बाजारात दाखल केली आहे. यामध्ये चार नवीन रंगांचे पर्याय आणि अद्ययावत सॉफ्टवेअर दिले आहे. पहिल्या ‘एथर कम्युनिटी डे’निमित्त कंपनीने ‘AtherStack 5.0’ अंतर्गत हे बदल केले आहेत. यामध्ये गुगलचे यूजर्स एन्टरफेअरन्स (यूआय) व्हेक्टर मॅप, ५ वर्षांची बॅटरी वॉरंटी, ऑल ईव्ही चार्जिंग सोल्युशन, ऑटोहोल्ड टीएम तंत्र दिले आहे जे चढ किंवा उतारावर स्कूटरला रोखून धरते.

लायगर : सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ‘लायगर मोबिलिटी’ या मुंबईतील स्टार्टअप कंपनीच्या स्कूटरने तिच्यातील सेल्फ बॅलन्सिंग तंत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या स्कूटरची खासियत अशी, की स्वत: तोल सांभाळत असल्याने चालकाला पाय जमिनीवर टेकवण्याची गरज पडत नाही. ठराविक वेग मर्यादेत हे तंत्र काम करते. या स्कूटरचे ‘लायगर एक्स’ ‘लायगर एक्स +’ असे दोन मॉडेल्स आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करण्यात आला आहे.

एलएमएल स्टार

‘एलएमएल’ या दुचाकी कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर करत भारतात पुनरागमन केले आहे. कंपनीने या स्कूटरसाठी बुकिंगही सुरू केले आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डीआरएल्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलँप, ३६० डिग्री कॅमेरा, एबीएस, रिव्हर्स पार्क आसिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (टीपीएमएस) आदी फीचर्स दिले आहेत. पॉवरफुल मोटर आणि बॅटरीमुळे ही स्कूटर कामगिरीतही सरस ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टीव्हीएस आयक्यूब एसटी

टीव्हीएस मोटर कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये आयक्यूब एसटी व्हेरिएंट प्रदर्शित केले. लूक आणि डिझाईनच्या बाबतीत आयक्यूब एस आणि एसटी व्हेरिएंटमध्ये विशेष बदल जाणवत नाहीत. आयक्यूब एसटीमध्ये सर्वांत मोठी ४.५६ किलोव्हॅट बॅटरी पॅक, ११० ते १४५ किलोमीटरची रेंज दिली आहे. शिवाय ही स्कूटर ० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी ४ ते ६ तास आणि फास्ट चार्जरवर ० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी २.३० तासांचा वेळ घेते.