Isuzu V Cross Car
Isuzu V Cross CarSakal

झूम : इसुझू व्ही क्रॉस; ऑफरोडिंगचा बादशाह

‘व्ही क्रॉस’चे स्टिअरिंग हातात आल्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचा जो काही ‘फील’ येतो तो रस्त्यावर ‘बादशाह’च असल्याची जाणीव करून देतो.
Summary

‘व्ही क्रॉस’चे स्टिअरिंग हातात आल्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचा जो काही ‘फील’ येतो तो रस्त्यावर ‘बादशाह’च असल्याची जाणीव करून देतो.

जपानी कार कंपनी असलेल्या ‘इसुझू’ची भारताला तशी ओळख नवी नाही. हिंदुस्थान मोटर्सच्या प्रसिद्ध अॅम्बेसिडर कारला डिझेल इंजिन पुरवठा करणारी ही कंपनी भारतीयांनाही थोडीफार परिचित असावी. याच कंपनीच्या ‘व्ही क्रॉस’ पिकअप ट्रकची राईड घेण्याची संधी मिळाली. तेव्हा या गाडीला ‘पिकअप ट्रक’ का म्हणावे, एक भारदस्त ‘एसयूव्ही’ का म्हणू नये, असा प्रश्न पडला.

‘व्ही क्रॉस’चे स्टिअरिंग हातात आल्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचा जो काही ‘फील’ येतो तो रस्त्यावर ‘बादशाह’च असल्याची जाणीव करून देतो. हा ‘पिकअप ट्रक’ असला, तरी सेकंड रो केबिन आणि गाडीची लांबीही मोठी असल्याने रस्त्यावर सर्वांना आकर्षित करतो. लाईफस्टाईल कॅटेगरी म्हणून बनलेल्या ‘व्ही क्रॉस’चे तसे दोन (झेड, झेड प्रेस्टिज) व्हेरिएंट. यात ६ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशमन; ४ बाय २, ४ बाय ४ व्हील ड्राईव्हचा पर्यायही यामध्ये येतो. या पिकअप ट्रकमध्ये १८९८ सीसी क्षमतेचे ४ सिलिंडर इनलाईन, ४ वॉल्व्ह/सिलिंडर, व्हीजीएस टर्बो कूल्ड डिझेल इंजिन दिले आहे. जे ३६०० आरपीएमला १६१ बीएच पॉवर, २००० आरपीएमला ३६० एनएम टॉर्क निर्माण करते. या गाडीची एक्स शोरूम किंमत १९.४८ ते २६.९४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

प्रथमच या श्रेणीतील गाडीची राईड केली. ''व्ही क्रॉस झेड ४x४'' मॅन्युअल ट्रान्समिशन राईडिंगचा अनुभव वेगळा होता. गाडी सुरू केल्यानंतर पहिल्या गिअरलाच क्लच सोडल्यावर ती ज्या पद्धतीने पिकअप घेते, तेव्हा तिच्या ताकदीचा अंदाज येतो. अगदी तिसऱ्या-चौथ्या गिअरलाही इंजिनमधून पहिल्या गिअरसारखीच मिळणारी ताकद इंजिनच्या क्षमतेची जाणीव करून देते. महामार्गावर तिला कितीही वेगात पळवा तिची रस्त्यावरील पकड आणि अवघड वळणही आरामात पार करण्याचे तिचे वैशिष्ट्य खास वाटते. तत्काळ नियंत्रितही होते. आता पिकअप ट्रकच असल्याने स्टिअरिंग हाताळणीही तुलनेने जड वाटली.

परंतु, ‘व्ही क्रॉस’ चालवताना येणारा आनंद ‘लाजवाब’च आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑफरोडिंगसाठीच ही गाडी बनल्याने रस्ता कसाही असला तरी इंजिन पूर्ण ताकद देऊन हवी तशी हाताळण्याचा विश्वास देते. जोडीला फोर व्हील ड्राईव्ह असल्याने विविध प्रयोग करता येतात. इतकी भारदस्त असूनही, प्रतिलिटरला १० ते १२ किलोमीटरचा मिळणारा मायलेज, ही तिची जमेची बाजू.

पर्यटनासाठीही पर्याय

‘व्ही क्रॉस’ लाईफस्टाईल रेंज व्हेईकल असल्याने तिचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर होतो. तिची सामान वहन क्षमता अमर्याद असल्याने काही अडचण येत नाही. लोडिंग बे गेट ज्याला आपण बोली भाषेत ‘फालका’ बोलतो त्याची रचनाही अत्यंत मजबूत असल्याने त्यावरही अतिरिक्त सामान राहू शकते. शिवाय त्यावर बसून एखाद्या रम्य निसर्गस्थळी जेवण किंवा इतरही गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.

व्ही क्रॉसमध्ये मिळणारे फीचर्स

इसुझू व्ही क्रॉसला लांबलचक असा ३०९५ मिलिमीटरचा व्हीलबेस, २१५ लिटर बूटस्पेस, सुरक्षेसाठी दोन एअर बॅग, ओव्हर स्पीड वॉर्निंग, एबीएस+ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेक आसिस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलँप, डेटाईम रनिंग एलईडी, ७ इंची टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो/ॲपल कार प्ले, क्रूझ कंट्रोल यांसारखे फीचर्स दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com