आपुलकीची ‘बेचकी’

कोणत्या ना कोणत्या कारणांनी आपण अनेक व्यक्तींना भेटतो आणि कधी त्यांच्याशी आपले ऋणानुबंध जुळून येतात हे आपल्यालाही कळत नाही.
purva pawar and neha joshi
purva pawar and neha joshisakal

- पूर्वा पवार, नेहा जोशी

कोणत्या ना कोणत्या कारणांनी आपण अनेक व्यक्तींना भेटतो आणि कधी त्यांच्याशी आपले ऋणानुबंध जुळून येतात हे आपल्यालाही कळत नाही. असंच काहीसं झालंय मराठी अभिनेत्री पूर्वा शिंदे आणि नेहा जोशी यांच्यासोबत. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे या दोघीही एकमेकींना ओळखत तर होत्याच; परंतु त्यांची पहिली भेट झाली ती ‘बेचकी’ नाटकादरम्यान.

याविषयी पूर्वा म्हणाली, ‘नेहानं आणि मी ‘बेचकी’ नाटकात एकत्र काम केलं होतं. तसे आम्हा दोघींचे वडीलही एकेमकांचे मित्र आहेत. त्यामुळे वडिलांच्या मित्राची मुलगी अशीही आमची ओळख होती. मात्र, या नाटकादरम्यानच आम्ही एकमेकींना जवळून ओळखायला लागलो. आपण टीव्ही शोज करत असतो, त्यावेळी काम करताना आपण चुकलो, एखादा सीन विसरलो किंवा डायलॉग विसरलो, तरी काही मोठी अडचण उद्‍भवत नाही.

कारण आपण त्यावेळी रिटेक घेऊ शकतो; परंतु नाटक करत असताना असं नाही करता येत.त्यावेळी आपण चुकलो, तर ते पटकन लक्षात येतं. अशा वेळी आपल्या सहकलाकारांनी आपल्याला सांभाळून घेऊन पुढे जाणं ही मोठी गोष्ट आहे. माझ्या बाबतीत असंच झालं आणि त्यावेळी मला सांभाळून घेणारी नेहाच होती.

नाटकादरम्यान झालेली चूक कोणाच्याही लक्षात न आणून देता सांभाळून घेण्याची तिची स्टाइल मला अतिशय आवडते. यातून ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे समजतंच; पण त्या सोबतच ती एक उत्तम माणूस आहे हेही समजतं. म्हणूनच ती मला खूप आवडते.’

दुसरीकडे नेहा म्हणाली, ‘थोडं विचित्र वाटेल; पण मी कोणतीही साडी बघते तेव्हा मला पूर्वा आठवते. कारण तिला साड्या नेसायला अतिशय आवडतात. कोणत्याही प्रकारची साडी असो, पूर्वा त्यात नेहमीच सुंदर दिसते. मग तिनं मेकअप केला, नाही केला तरी चालेल. नुसतं काजळ जरी तिनं लावलं, तरी तिचं सौंदर्य त्या साडीत खुलूनच येतं. मला तर नेहमी वाटतं, की साडी हे पूर्वासाठी तयार झालेलं वस्त्र आहे.

तिच्यातल्या अनेक गोष्टी मला आवडतात. मुख्य म्हणजे तिचा स्वभाव. ती अतिशय बिनधास्त आणि धाडसी आहे. आपण बऱ्याचदा आपल्यातल्या चांगल्या गोष्टी इतरांना खूप सहजपणे सांगतो; परंतु आपल्यातल्या दोषांबद्दल बोलणं आपल्याला फारसं आवडतं नाही. परंतु पूर्वा आपल्यातल्या गुणांसोबत आपल्यातले दोषही मान्य करते.

त्यासोबतच तिच्याकडून काही चुकलं, तर ती तेवढ्याच मोठ्या मनानं ते मान्य करते. तिचा हा बिनधास्तपणा तिला प्रत्येकवेळी इतरांपेक्षा वेगळं बनवतो. जो मला अतिशय आवडतो. ती खूप स्वच्छंदी आहे, हट्टी आहे. तिचा हा हट्टीपणा बऱ्याचवेळा लोकांना उद्धटपणा वाटू शकतो; पण मला वाटतं तो स्पष्टवक्तेपणा आहे. तिला जे वाटतं, ते ती बोलून मोकळी होते.

तिचं बोलणं कदाचित त्यावेळी आपल्याला चुकीच वाटेल, मनाला लागेल, वाईट वाटेल; पण ती इतक्या स्पष्टपणे बोलते, की तेवढ्याच स्पष्टपणे बोलल्याशिवाय समोरच्याकडे दुसरा पर्याय नसतो. म्हणूनच जी माणसं पूर्वाच्या खूप जवळ आहेत, ती कधीच तिच्यापासून दुरावत नाहीत. अतिशय पारदर्शक व्यक्तिमत्त्व आहे तिचं.’

पूर्वा सांगत होती, ‘एक माणूस म्हणून नेहा अतिशय नम्र आहे. सगळ्यांची काळजी घेणारी. तिच्या आसपास वावरताना तिच्यामध्ये असणारी सकारात्मकता जाणवते. तिचा स्क्रीनवरील प्रेझेन्स खूप चांगला आहे. सध्या ती एक हिंदी मालिका करत आहे. त्यामुळे ती सध्या बिझी असते. अनेक कारणांमुळे हल्ली आमची भेट नाही होत; पण तरीही आम्ही नेहमीच एकमेकींच्या टचमध्ये असतो.

आमच्या फॅमिलींचेही खूप चांगले संबंध आहेत. बऱ्याचदा मी तिच्या घरी जाते, आणि तिथे राहिलेसुद्धा आहे. तिच्याकडे दोन बोके आहेत, ते मला खूप आवडतात. त्यांच्यासोबत नेहाचं जे नातं आहे, त्यामधून मला नेहातलं आईपण दिसतं.’

नेहा म्हणाली, ‘आमच्या ‘बेचकी’ नाटकादरम्यानचा एक किस्सा मी कधीच नाही विसरू शकत. त्यावेळी माझ्या पायाला दुखापत झाली होती. मला त्याचा खूप त्रास व्हायचा तेव्हा. नाटकाला मी आणि पूर्वा एकत्रच रिक्षाने यायचो. त्यावेळी मला आठवतंय, त्या रिक्षामध्ये पूर्वा माझा दुखवलेला पाय तिच्या पायावर घेऊन बसली होती.

त्यासोबतच नाटकावेळी असो किंवा ‘ऑफस्टेज’ असो, पूर्वा शक्य ती सगळी मदत मला करायची आणि हे दाखवण्यासाठी न करता तिला मनापासून माझी मदत करावीशी वाटायचं म्हणून करायची. माझ्या पायाला दुखापत झालेली असूनही मी नाटक करायला आली आहे, याचा ती आदर करायची. हे मी कधीच नाही विसरू शकत.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com