दुर्गम रस्त्यांची राणी 'जीप'

दुर्गम रस्त्यांची राणी 'जीप'

खडकाळ रस्त्यांवर उत्तम कार म्हटली की, जगप्रसिद्ध जीप ब्रॅंडच्या गाड्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. ‘दुर्गम रस्त्यांची राणी’ अशी ओळख असणाऱ्या जीपच्या
 गाड्या अगदी दुसऱ्या जागतिक महायुद्धापासून प्रसिद्ध आहेत. भारतातही स्वातंत्र्यपूर्व काळापासून जीप ब्रॅंडच्या गाड्या विकण्यात येतात. जीप गाड्यांतील ‘जीप कंपास’ ही सध्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात खप होणारी एसयूव्ही ठरली आहे.

दुसरे महायुद्ध सुरू असताना अमेरिकन लष्कराला खडकाळ भागात सैनिकांना वापरण्यासाठी एका मजबूत गाडीची गरज भासत होती.  यासाठी ४ व्हिल ड्राईव्ह तंत्रज्ञान वापरून, दणकट गाडी तयार करण्यासाठी जवळपास १३५ कंपन्यांना विनंती करण्यात आली होती. ज्यातील केवळ दोन कंपन्यानीच या मागणीला प्रतिसाद दिला. अमेरिकन बॅंटम आणि विलिस-ओव्हरलॅंड अशा या त्या दोन कंपन्या.

यातील अमेरिकन बॅंटम कंपनीने  कमी काळात गाडी तयार केल्याने पहिली जीप तयार करण्याचा मान या कंपनीला मिळाला. बीआरसी असे या मॉडेलचे नाव. या मॉडेलच्या तब्बल २,७०० गाड्या विकण्यात आल्या. मात्र या गाड्या आकाराने लहान असल्याने पुन्हा एकदा लष्कराने जीप ब्रॅंडच्या गाड्या तयार करण्यासाठी मोटार कंपन्यांना 
सांगितले. त्यानुसार विलिस आणि फोर्ड या दोघांनी ४ व्हिल ड्राईव्ह तंत्रज्ञान वापरून नव्या जीप तयार केल्या. ज्यात विलिसची ‘कॉड’ आणि फोर्डची ‘पिग्मी’ या गाड्या बाजारात दाखल झाल्या. यात विलिसची कॉड अधिक उपयुक्त असल्याने आर्मीकडून विलिसलाच जीप गाड्या तयार करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र गाड्यांची मागणी अधिक असल्याने विलिसने त्यांचे तंत्रज्ञान वापरून गाड्या तयार करण्याची परवानगी फोर्ड या कंपनीलाही दिली.

या दोन कंपन्यानी मिळून जीप ब्रॅंडच्या अनेक गाड्या तयार केल्या, ज्यात सर्वात शेवटी विलिसने ‘जीप मॉडेल एमबी’ आणि फोर्डने ‘जीप मॉडेल जीपीडब्लू’ तयार केली. यानंतर सन १९५३ पर्यंत विलिस ओव्हरलॅंड ही कंपनी जीप ब्रॅंडच्या गाड्या तयार करत होती. १९५३ मध्ये कैसर कंपनीकडे या गाड्या तयार करण्याचे काम देण्यात आले. १३ वर्षे जीप ब्रॅंडच्या गाड्या तयार केल्यानंतर सन १९७० मध्ये हे काम कैसरकडून ‘अमेरिकन मोटर्स कॉर्पोरेशन’ला मिळाले.

 या कंपनीने १९८७ पर्यंत जीप गाड्या तयार केल्यानंतर १९८७ मध्ये ‘क्रिसलर’ या कंपनीने जीप गाड्या तयार करण्याची परवानगी मिळवली,ती आतापर्यंत त्यांच्याकडेच असून ३२ वर्षांनंतरही क्रिसलर जगभरात इतर मोटर कंपन्यांच्या मदतीने या गाड्या तयार करीत आहे. २०१४ पासून फियाट कंपनीसह मिळून क्रिसलर जीप ब्रॅंडच्या गाड्या तयार करीत आहे. 

भारतात मात्र सुरुवातीपासूनच महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनीच जीप या ब्रॅंडच्या गाड्या तयार करत होती. १९५३ मध्ये महिंद्राने आपली पहिली जीप गाडी तयार केली. भारतात दुर्गम आणि जंगल भाग असणाऱ्या परिसरात या जीप गाड्या अत्यंत उपयुक्त ठरत होत्या. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तर खासकरून या जीप गाड्या प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. जगभरात जीप तयार करणाऱ्या क्रॅसलरने भारतातदेखील फियाटच्या मदतीने रांजणगाव येथे स्वत:चा प्रकल्प सुरू केला आणि २०१७ मध्ये ‘जीप कंपास’ हे पहिले मॉडेल भारतीय बाजारात दाखल झाले. विशेष म्हणजे हे मॉडेल ग्राहकांना इतके आवडले की, अवघ्या वर्षभरात या मॉडेलची वाहने मोठ्या प्रमाणात विकली गेली. दरम्यान भारतात सादर झालेली कंपास मॉडेलची ही दुसरी पिढी असून 
पहिली पिढी सन २००७ बाजारात आली होती. मात्र भारतात हे मॉडेल सादर झाले नव्हते.

सध्या जीप कंपासची एक्‍स शोरूम किंमत १५ लाख ६५ हजार इतकी असून ही कार विविध आकर्षक रंगात उपलब्ध आहे. यासोबतच जीपची ‘रॅंगलर’ ही गाडीदेखील बाजारात उपलब्ध असून याची एक्‍स शोरूम किंमत ६३ लाख ९४ हजार आहे. सर्वांत महागडी जीप ग्रॅंड चेरोकीची एक्‍स शोरूम किंमत ७५ लाख १५ हजार आहे. जीपचे रेनेगेड हे मॉडेलदेखील लवकरच भारतात दाखल होणार असून, याची एक्‍स शोरूम किंमत १२ लाखांच्या आसपास असणार आहे.

web title : Queen of the Roads 'Jeep' history

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com