radhika deshpande
radhika deshpandesakal

आव्हानात्मक काळ

मी आई होणार असल्याचं २००६ मध्ये कळलं, तेव्हा आम्ही बंगळूरला होतो. मी स्पाइसजेटमध्ये नोकरी करत होते. लग्न करून दीड वर्ष झालं होतं.

मी आई होणार असल्याचं २००६ मध्ये कळलं, तेव्हा आम्ही बंगळूरला होतो. मी स्पाइसजेटमध्ये नोकरी करत होते. लग्न करून दीड वर्ष झालं होतं. बंगळूरला असताना मी तिथल्या महाराष्ट्र मंडळात एकांकिका स्पर्धा आणि गणेशोत्सवात उत्साहानं भाग घ्यायचे. नाटकाची तालीम सुरू असताना दमायला व्हायचं. नाटकाचा एकदा प्रयोग झाला की डॉक्टरकडे जाईन, असं ठरलं. मग डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं.

माझा नवरा नीरज माझ्यासोबत होता. आम्ही दोघंही जवळच्या मंदिरात गेलो आणि तिथून माझ्या आईला नागपूरला आणि माझ्या सासूबाईंना मुंबईला फोन लावला. दोन्हींकडून पहिलंच नातवंड, त्यामुळे दोन्हीकडे विशेष आनंद. तेव्हा मी चित्रपट, मालिका करीन असं वाटलं नव्हतं; पण नोकरी सोडणार, हे केव्हाच ठरवलं होतं. आता गर्भवतींना सुट्ट्या मिळतात, तशा तेव्हा नव्हत्या आणि मी आधीपासूनच ठरवलं होतं की मी पूर्णपणे बाळाकडे लक्ष देणार. 

एकीकडे नोकरी सोडली, दुसरीकडे मी गर्भवती. आम्ही अगदी १५ दिवसांपूर्वी नवीन घरात आलो होतो. खर्च वाढले होते आणि २००७ मध्ये मंदीची लाट आली. खूप लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. नीरज १६ तास काम करायला लागला आणि २६ सप्टेंबर २००७ ला अंतराचा जन्म नागपूरला झाला. तोपर्यंत सगळ्या गोष्टी आटोक्यात होत्या. आम्ही बंगळूरला आलो.

आई, सासूबाई महिना-महिना राहून घरी परत गेल्या. खर्च वाढले. बाळ झालं होतं, त्यामुळे घरच्यांचं म्हणणं असायचं, विमानाने या. येणार कसं? पैसेच नव्हते. आमचं वरच्या मजल्यावरचं, ते गळायचं. मोलकरीण परवडेनाश्या झाल्या. सहा महिने बँकेत ५०० रुपये. आम्ही घरी कोणालाच सांगितलं नाही.

मी नोकरी करण्याचा प्रश्‍नच नव्हता. सहा महिने गेले. नीरज १६ तास घराच्या बाहेर. सहा महिने धुणीभांडी आणि बाळाचं सगळं मलाच करावं लागत होतं. मला गच्चीवर जाऊन ओरडावंसं वाटत होतं. एक वेळ वाटलं, इथे सगळ्या आया आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवतात.

मी दोन तास अंतराला ठेवलं, तर मला श्‍वास घ्यायला वेळ मिळेल; पण तेवढे पैसे नव्हते. मग मला कुठेतरी बाहेर जाता यावं म्हणून एरोबिक्सचा क्लास लावला. पहाटे पावणेसहाची बॅच होती. कारण नंतर नीरजचं ऑफिस असायचं. माझ्या मुलीचा चेहरा कायम हसरा. तिने आजतागायत मला कधीही म्हटलं नाही, की आई तू नको जाऊस, किंवा मी गेले म्हणून रडली आहे असं कधीच झालं नाही. माझी मुलगी माझी मैत्रीणही आहे. आज मी ज्या क्षेत्रात काम करते ते तिच्यामुळेच. ती रडली असती, नको जाऊ म्हटली असती किंवा ‘मला नाही आवडत तू मालिकेत काम केलेलं’ असं म्हटली असती तर मी नसतं काम केलं.

दरम्यान, आम्ही ते घर विकलं आणि पुण्यात स्थायिक झालो. सासू-सासरे सेवानिवृत्त होऊन पुण्यात आले. माझ्या आईइतकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त माझ्या सासूबाईंनी मला आधार दिला. ‘तू कशाला काळजी करतेस? मी आहे, आम्ही सगळे आहोत, तू जा बिनधास्त,’ असं त्या म्हणायच्या. अंतरा लहान होती पाच वर्षांची. मी तिला सांगितलं, ‘अंतरा तुझ्या आईची खूप स्वप्नं आहेत. ती संसार सुखाचा करताना नाही पूर्ण करता आली.

आता तू मोठी झाली असं नाही म्हणणार मी, पण तू समजूतदार आहेस. मला नाटक, सिनेमा, मालिकांमधून काम करावंसं वाटतं आहे. मी जाऊ का गं?’ ती म्हणाली, ‘आई तू जा; पण घरी कधी येशील?’ ‘हे काय काम संपलं, की दुसऱ्या मिनिटाला बस पकडून परत पुण्यात.’ मी निश्‍चिंत होऊन काम करायला लागले; पण कामाचा व्याप क्षमतेपेक्षा वाढू दिला नाही. मी आधी एक आई आहे, हे मी कधीच विसरत नाही.

माझं करिअर खऱ्या अर्थानं आई झाल्यावरच सुरू झालं. मी ज्या मालिका केल्या, त्या सुपरहिट झाल्या. त्यामुळे सेलिब्रिटी स्टेट्स मला पहिल्या दोन वर्षांत लाभलं. अंतराही नाटक-सिनेमांमध्ये उत्तम काम करते. आज ती १६ वर्षांची आहे आणि तिचं करिअर ती लवकरच सुरू करेल. माझी मुलगी करिअरिस्ट आहे का नाही, हे सांगणं आगाऊ ठरेल. पण ती शोधते आहे, करून पाहते आहे, तिला कलेत रुची आहे, ही जमेची बाजू आहे. मुलींसाठी करिअर निवडणे आजही कठीण. पूर्वीही कठीणच होतं. आज काळ बदलला असला तरी समस्याही बदलल्या आहेत.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

१) तयारीनिशी उतरा, माग हटू नका, झोकून देऊन काम करा, शिक्षण पूर्ण करा, काम करतानाही विद्यार्थी दशेत असल्यासारखं नवनवीन शिकत रहा.

२) मेहनतीला घाबरून पळून जाऊ नका. सातत्याने, प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते, त्याकरिता स्वप्नं मोठी बघा.

३) प्रत्येकाची वेळ येते, दिवस चांगले आहेत, तुम्ही तयार राहा.

४) आई होणं ही अतिशय सुखावणारी गोष्ट आहे आणि योग्यवेळेत आई व्हायला हवं.

५) तुमच्यातला आईपण जपा. स्त्रीची मूलभूत गरज आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com