Ram Navami 2024: नागेश्वरवाडीत तीनशे वर्षांपूर्वीचे राम पंचायतन

Ram Navami 2024: तीनशे वर्षांपूर्वीचे राम पंचायतन या सोहळ्याचे आकर्षण आहे. यामध्ये श्रीरामाच्या डाव्या मांडीवर बसलेली सीतामाई, मारोती, हनुमंताची माता अंजनी आणि गरुडस्वामी यांचा या पंचायतनमध्ये समावेश आहे.
Ram Navami 2024:
Ram Navami 2024:Sakal

आज रामनवमीचा सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नागेश्वरवाडी परिसरातील दिवाकर, सखाराम आणि प्रदीप गबाजी मुळे या मुळे (रामदासी) कुटुंबीयांकडे सुमारे तीनशे वर्षांपासून रामनवमीचा सोहळा साजरा करण्यात येतो. तीनशे वर्षांपूर्वीचे राम पंचायतन या सोहळ्याचे आकर्षण आहे. यामध्ये श्रीरामाच्या डाव्या मांडीवर बसलेली सीतामाई, मारोती, हनुमंताची माता अंजनी आणि गरुडस्वामी यांचा या पंचायतनमध्ये समावेश आहे.

या पंचायतनचे वैशिष्ट्य म्हणजे, हे पूर्ण पंचायतन एकाच काळातील असून पंचधातूने तयार केलेल्या वेगवेगळ्या चार मूर्ती आहेत. यामध्ये प्रभू श्रीराम यांची आणि त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेल्या सीतामातेची मूर्ती एकत्र आहे.

पंचायतनसमोर गरुडस्वामींची मूर्ती आहे. उजव्या बाजूला मारुतीरायांची माता अंजनी यांची मूर्ती तर डाव्या बाजूला हनुमंताची मूर्ती आहे. मुळे (रामदासी) कुटुंब मूळचे सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथील रहिवासी आहे.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी हे राम पंचायतन सिंदखेडराजा येथील एका कुटुंबाकडे होते. कालांतराने या पंचायतनची पूजाअर्चा विधीवत करण्यासाठी कोणी नसल्याने त्यांनी हे राम पंचायतन सध्याची मुळे कुटुंबीयांची चौथी पिढी सीताराम मुळे यांच्याकडे रामनवमीच्या उत्सवासाठी सोपवली. सीताराम मुळे यांच्या कार्यकाळात मुळे यांच्याकडे रामनवमीचा सोहळा सुरू झाला.

सीताराम मुळे यांच्यानंतर हे पंचायतन त्यांचे सुपुत्र रामचंद्र मुळे यांच्याकडे आणि नंतर पिढ्यांनुसार वासुदेव मुळे, नंतर गबाजी मुळे आणि आता त्यांची मुले दिवाकर, सखाराम आणि प्रदीप मुळे यांच्याकडे आले आहे.

दोन दिवसांची परंपरा

मुळे यांच्याकडे हे पंचायतन आल्यापासून रामनवमी आणि राम जन्मोत्सवाचा दोनदिवसीय सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी रामनवमीचे घट स्थापन करतात. दररोज पहाटे पाचला काकड आरती, पूजा, रामनवमीचे उपवास, दररोज दुपारी प्रवचन, सायंकाळी उपासना आदी विधी या कालावधीत सुरू असतात. रामनवमीच्या दिवशी दुपारी बाराला रामजन्म सोहळा साजरा करण्यात येतो. यानंतर दुसऱ्या दिवशी ११ ब्रह्मवृंदाच्या हस्ते पवमान अभिषेक करण्यात येतो. यानंतर आरती आणि महाप्रसादाचे आयोजन भाविकांसाठी करण्यात येत असल्याची माहिती मुळे कुटुंबीयांनी दिली.

श्री रामाच्या मांडीवर सीतामातेची मूर्ती
श्री रामाच्या मांडीवर सीतामातेची मूर्तीSakal

भावार्थ रामायणामध्ये

वामांगी सीतेचा उल्लेख

श्री एकनाथ महाराजकृत ‘श्री भावार्थरामायण बालकाण्ड’ अध्याय विसावा यात श्रीराम-सीता विवाह सोहळ्यामध्ये काही ओव्यांत जनक आणि विश्वामित्राच्या संवादात वामांगी सीतेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढीलप्रमाणे तो उल्लेख आहे.

जनक म्हणे विश्वामित्रा । उभयपक्षीं तू सोयरा ।

जाणोनि शास्त्रविचारा । येथें वधूवरां राहवावें ॥ १४ ॥

जनकाची निजकांता । सुमेधा सती पतिव्रता ।

तीही पाहूण् धांवें रघुनाथा । वामांगी सीता बैसवोनी ॥ १५ ॥

आणावें दशरथ भूपाळा । करावा सम्भ्रमें सोहळा ।

सुख द्यावें दोहीं कुळां । ऋषिनिर्मळा कृपाळुवा ॥ १६ ॥

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com