लोकल ट्रेननं प्रवास करताना कितीतरी नाती जोडली जातात, नवीन मैत्री होतात. फक्त सहप्रवाशांबरोबर नाही, तर गाडीत विकायला येणाऱ्या प्रत्येकाशी. अशीच माझी एक मैत्रीण मला जवळजवळ १५ वर्षांनी भेटली. कॉलेजला जाताना तिच्या ‘टाइमपास’चा मला खूप आधार वाटायचा..तिची बेंबीच्या देठापासून मारलेली हाक ऐकूनच आमची भूक भागायची. तेव्हा तिचं वय साधारण ४०-४५ असेल.. गोरीपान, नितळ कांती असलेली ती. केस नेहमी अगदी टापटीप बांधलेले असायचे. साडी व्यवस्थित नेसून ती लोकल ट्रेनमध्ये ‘टाइमपास’ विकायची!म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे फ्रायम, चकल्या, नळ्या, चिप्स असं सगळं तिच्याकडे असायचं. कर्जतवरून सुटणाऱ्या ६.३२ च्या लोकलला ती भिवपुरीला चढायची. मुलांचे डबे, स्वतःचा डबा, नवऱ्याचं दिवसभराचं जेवण असं सगळं करून ती अगदी फ्रेश असायची सकाळी. मग भिवपुरीला चढल्यावर आधी भाकरी-भाजी खाऊन घ्यायची आणि थोडा वेळ शांत बसायची गाडीच्या दारात..तिच्याकडे बघून मला नेहमी तिच्याशी बोलावंसं वाटायचं. एक दिवस मी आणि माझ्या मैत्रिणीनी तिच्याकडून ‘टाइमपास’ घेतला आणि तिला विचारलंच, ‘कुठे राहता? घरी कोण असतं? परत घरी कधी जाता?’ त्यावर शांतपणे ती म्हणाली, ‘काय सांगू ताई? हे पण आधी कानातले विकायचे. लोकल मारायचे.एकदा लोकल पकडताना पाय घसरला आणि ट्रेन खाली आले. दोन्ही पाय गेले. तेव्हापासून खाटेवर आहेत. उठतच नाय माणूस जागचा. मुलाची शाळा, लेकीचं कॉलेज.. सगळा खर्च मीच बघते. थकते गं ताई.. पण काय करू...’ असं म्हणत हसली. एव्हाना बदलापूर आलं होतं. ती ‘टाइमपास’ विकायला निघून गेली..आमची अशी रोजचीच भेट. कित्येक वर्षं मी तिचा रोजचा स्ट्रगल बघितलाय. लोकलच्या खिडकीतून पावसाचं पाणी थोडं आत आलं, तर आपली चिडचिड होते; पण ती भिजलेली साडी नेसून दिवसभर त्या लोकलच्या गर्दीतून चेहऱ्यावर स्मित ठेवून काम करत राहायची. पायातली स्लीपर शिवून शिवून पार जीर्ण होईपर्यंत वापरायची.गेले चार-पाच दिवस जो पाऊस पडतोय त्यावरून तिची आठवण झाली. एकदा अशाच पावसामुळे लोकल जागच्या जागी ठप्प झाल्या होत्या.. आम्ही दोन तास एकाच ठिकाणी होतो आणि आजूबाजूला दूरदूर कुठे जमीन दिसत नव्हती. फक्त पाणी. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. भूकही खूप लागली होती. डबे नाहीत, काही खायला नाही. काय करायचं काही कळेना..तेव्हा मावशींनी ‘टाइमपास’ची दोन पाकिटं आम्हाला दिली आणि म्हणाली, ‘नको पैसे.. माझी पोरं घरी पोचलीत की नाय माहीत नाही. भुकेली असतील. आज मी जेवण पण केलं नाही.. तुम्हाला खाऊ घालते.. तुम्ही पण माझी लेकरंच आहात...’ तेव्हापासून आमची चांगली मैत्री झाली आणि तिच्याबद्दल मनात असलेला रिस्पेक्ट अजून वाढला.नंतर कॉलेज संपलं. मग कधी वेगवेगळ्या वेळेला लोकल्समध्ये मावशी भेटायची. गप्पा व्हायच्या. मागच्या आठवड्यात माझं कर्जतला जाणं झालं आणि मी तीच हाक आर्त आवाजात ऐकली आणि मी ओळखलं, की ही तर मावशीच आहे. मी मागे वळून बघितलं, तर तीच मावशी ‘टाइमपास’ विकत होती..वय साधारण ६०-६५. थकलेली. काळवंडलेली. सैलसर राखाडी केसांची वेणी. जीर्ण झालेली साडी. पायात रबरी स्लीपर. टाचांना भेगा पडलेल्या. चेहऱ्यावरचं तेज पूर्णपणे निघून गेलेलं. पूर्वीएवढं मोठं बोचकं आता नव्हतं तिच्याकडे. मी पटकन जाऊन तिला ओळख सांगितली. खूप खूश झाली ती.मी घरातल्या सगळ्यांबद्दल विचारलं त्यावर म्हणाली, ‘नवरा गेला १० वर्षापूर्वी. मोठ्या मुलीचं लग्न मोडलं. तिनं जीव दिला. धाकटीचं लग्न झालं. जावई म्हणाला, आता आराम करा... शेवटची गाडी मारतेय ताई, बरं झालं भेटलीस..’ मावशी भिवपुरीला उतरली. उतरताना मला ‘टाइमपास’ देऊन गेली. तिच्या चेहऱ्यावर त्या दिवशी एक वेगळंच समाधान दिसत होतं..ती शांतपणे प्लॅटफॉर्मवर चालत राहिली... आणि मी विचारात मग्न झाले. अख्खं आयुष्य तिनं त्या लोकलमधले धक्के खात घालवलं. हातातोंडाशी आलेली मुलगी गमावली; पण चेहऱ्यावर कधी त्रास दिसला नाही तिच्या. कसं काय जमलं असेल तिला हे?? असा प्रश्न पडला मला. आता या वयात तरी तिला आराम मिळो अशी प्रार्थना मी देवाकडे केली.कधी कधी अशी काही माणसं आपल्याला खूप काही शिकवून जातात. गाडी कर्जतच्या दिशेनं निघाली आणि मी शेवटच्या त्या ‘टाइमपास’चं पाकीट उघडलं... गाडीच्या दारात बसलेल्या एका लहान मुलाला ते दिलं... तेही कोणाचं तरी लेकरूच. कोण जाणे भुकेलं असेल....सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.