

कुठल्याही गोष्टीकडं आपण कसं पाहतो, त्यावर तिचे आपल्यावरील परिणाम अवलंबून असतात. पाण्याचा अर्धा ग्लास भरलेला की रिकामा, हे ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार त्याला जाणवतं. दृश्य एक; पण उत्तरं वेगवेगळी. हा दृष्टिकोन नकारात्मक, निराशाजनक असेल, तर त्याचं उत्तर एक असणार आणि हा दृष्टिकोन बदलला, की उत्तरही बदलणार. काहींना कुठलंही काम त्रासदायक वाटतं, तेव्हा त्यांच्यावर नकारात्मकतेचा पगडा जास्त झाला आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं.
मनानं एखादं अस्तित्व मान्य केलं, की तेच वास्तवही वाटू लागतं. माणसं चर्चा करतानाही आनंदापेक्षा दुःखांचीच उजळणी करतात. दुःख कुरवाळत बसल्यानं तिथंच दीर्घ काळ मुक्काम ठोकतं.