
डॉ. राजश्री पाटील
खेडेगावातील भलीथोरली दारं सताड उघडी असतात. निजानीज होतानाच काय तो दरवाजा बंद होतो. चौसोपी वाड्याची आगळ लावल्याचा ठरावीक आवाज आला, की घरातल्या लहानग्यांना डोळे घट्ट मिटून घेण्याची सवयच होते! झोप येवो की न येवो. अंगण, ओसरी, माजघर, स्वयंपाकघर या सगळ्यांचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हा दरवाजा. उत्तम नक्षीकाम केलेले दरवाजे हे या चौसोपी वाड्यांचं वैशिष्ट्य असे. मोरांची, राघूंची जोडी, वेली, फुलं कोरलेले लाकडी दरवाजे हे त्या त्या घरातल्या माणसांची प्रतिष्ठा दर्शविणारे असत.