विळखा व्हिडिओ गेम्सचा

व्हिडिओ गेम्सचं प्रमाण कसं वाढत चाललंय हे आपण समरच्या उदाहरणाद्वारे गेल्या आठवड्यात बघितलं. त्यामागची कारणंही आपण बघितली. आता त्याचे परिणाम आणि उपाय यांचा विचार करू.
Video games
Video gamessakal

व्हिडिओ गेम्सचं प्रमाण कसं वाढत चाललंय हे आपण समरच्या उदाहरणाद्वारे गेल्या आठवड्यात बघितलं. त्यामागची कारणंही आपण बघितली. आता त्याचे परिणाम आणि उपाय यांचा विचार करू.

भावनिक, शारीरिक लक्षणं आणि परिणाम

  • काही कारणांमुळे गेम खेळता आला नाही तर चिडचिड होते. विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं.

  • पूर्वी खेळलेल्या डावाची आठवण येत राहते किंवा भविष्यात खेळायच्या गेमविषयी मनात आडाखे चालू राहतात. आपण किती वेळ खेळलो याविषयी कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी खोटं बोलणं सुरू होतं.

  • मानसिक थकवा, डोकं दुखणं, मायग्रेनसारखा त्रास, डोळ्यांवर ताण येणं, सतत संगणकाचा माऊस हाताळल्यामुळं कार्पल टनेल सिंड्रोमसारखे त्रास.

  • स्वत:च्या शरीराच्या, कपड्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष. अपुरी झोप आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि त्यातून उद्‍भवणारे पचनाचे व इतर आजार.

  • अभ्यासात पूर्ण दुर्लक्ष, शाळा, क्लास, कॉलेजला दांड्या मारणं. सायबर कॅफेची सवय असल्यास भरपूर पैसे खर्च करणं. पैसे न दिल्यास गैरमार्गानं मिळवणं.

  • लहानसहान गोष्टींवरून प्रचंड राग येणं. लहानशा कारणांमुळे निराश होणं.

  • Counter Strike सारख्या अनेक गेम्समधून हिंसात्मक प्रवृत्ती वाढत जाते. समोरच्याला संपवूनच आपण यश मिळवू शकतो अशी चुकीची भावना वाढीस लागते. इतर मैदानी खेळ खेळू नयेत असं वाटतं.

  • भविष्याविषयी पूर्ण उदासीन राहणं. आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा विचारच न करणं. तशी जाणीव करून दिली तर चिडणं किंवा निराश होणं.

उपाय

या व्यसनाकडे वेळीच लक्ष द्यावं लागतं अन् ते थांबवावं लागतं. तज्ज्ञांची मदत वेळीच घ्यावी लागते. फक्त घरातील इंटरनेट काढून उपयोग होत नाही. मुलांचं मन व्हिडिओ गेम्समधून काढून घेणं महत्त्वाचं आहे. या मुलांची अनेक सेशन्स करावी लागतात. आई-बाबांशी मुलांच्या बालपणाविषयी बोललं जातं. मुलांची भावनिक जडणघडण, व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

बऱ्याच केसेसमध्ये आढळतं, की ही मुलं introvert, लाजाळू, अबोल आहेत. त्यांच्यात विलक्षण न्यूनगंड आहे. बाहेरच्या परिस्थितीतील आव्हानं पेलण्याची त्यांची तयारी नाही. मग कृत्रिम वास्तवात म्हणजे गेम्समध्ये जगात भारी ठरता येतंय याचं सुख त्यांना वारंवार हवंय; पण त्याच वेळेला आपण आपला

अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ वाया घालवतोय हा अपराधगंड आहेच; पण ती हतबल झालीयत. गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत. एन्जॉयमेंट म्हणून ते आता खेळू शकत नाहीय. ते compulsion बनलंय.

या सर्व मुलांना वाचवायला हवं. त्यांना वास्तवात जगायची हिंमत द्यायला हवी. त्यांच्यावरचे ताणतणाव समजून घायला हवेत. त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्यांना मिळवून द्यायला हवी. त्यांची मूल्यं दुरुस्त करायला हवीत. बाहेरचं जग खरं जग आहे. त्यातले आनंद, जय, पराजय, आव्हानं स्वीकारण्यातली गंमत त्यांना समजून द्यायला हवी. काही काळ मग काही कटू निर्णय घ्यावे लागतील. गेम्सपासून त्यांना तोडावं लागेल. पण हे सगळं हळुवारपणे, त्यांना विश्वास देत देत करावं लागेल. CBT (Cognitive behavioural therapy), REBT (Rational emotive behavior therapy), IPT (Interpersonal Therapy) यांसारख्या काही थेरपीजचा उपयोग होईल. समुपदेशन लागेल.

आंतरिक शांततेच्या स्रोतांची, त्यांच्याशी भेट घडवून आणावी लागेल. मग परिस्थिती बदलेल. निश्चित बदलेल.

समरच्या बाबतीत आता परिस्थिती सुधारतीय. त्याचे आई-वडील, शिक्षक, तो आणि मी सगळ्यांनी मिळून टीम म्हणून काम केलं. व्हिडिओ गेमचा थोडा वेळ आनंद घेणं आणि व्यसनाधीन होऊन जाणं यांतला फरक त्याच्या लक्षात आलाय. या पुनर्वसनाच्या निमित्तानं एक चांगली गोष्ट घडली. त्याच्या व्यक्तिमत्त्वामधले दोष, कमतरता लक्षात आल्या. त्यावर मात करून त्याला स्वत:ला आतून शांत आणि कणखर बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले.

व्हिडिओ गेम्सच्या अजगराचा विळखा जगभर वेगात पसरतो आहे. बहुतांशी, न्यूनगंड असलेली, अंतर्मुख असलेली, सोशल नसलेली, मनानं दुर्बल असलेली मुलं आणि वयानं मोठ्या व्यक्तीसुद्धा या व्यसनात अडकताना दिसतायत. आपण सावध राहायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com