
Why Did Monsoon Arrive Early in India in 2025: गेले काही आठवडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की यंदा एवढ्या लवकर पावसाळा कसं काय आला.
शनिवारी म्हणजेच 24 मे रोजी केरळमध्ये मान्सूनने हजेरी लावली तर मुंबईसह पुण्यातही आजपासून मान्सून सुरु झाल्याचे दिसून येत आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊया मान्सूनची सुरुवात कशी होते आणि यंदा एवढ्या लवकर मान्सून सुरु होण्याचं काय कारण आहे.
'मान्सून' हा शब्द अरबी भाषेतील 'मौसिम' या शब्दातून घेतलेला आहे, ज्याचा अर्थ ऋतू किंवा हवामान असा होतो. हवामानशास्त्रात याला वाऱ्यांची दिशा बदलणं म्हणजेच (Reversal of Winds) असंही म्हणतात. या काळात वाऱ्यांची दिशा सुमारे 120 ते 180 अंशांनी बदलते.
दक्षिण-पश्चिमेकडून येणारे दमट समुद्री वारे जेव्हा भारताच्या दिशेने येतात, तेव्हा ते सोबत भरपूर आर्द्रता असलेले ढग घेऊन येतात. हे ढग डोंगररांगा आणि मैदानांवर आदळतात आणि तेथून पावसाला सुरुवात होते. या वाऱ्यांचा वेग, दिशा आणि ताकद यावर पावसाचे प्रमाण आणि त्याचा पॅटर्न अवलंबून असतो. यामध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमानही तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते.
भारतातील पावसाळा दोन प्रकारांमध्ये विभागला जातो. एक म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान येणारा दक्षिण-पश्चिम (समर) मान्सून, जो उत्तर, मध्य आणि पूर्वोत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन येतो. तर दुसरा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान येणारा उत्तर-पूर्व (विंटर) मान्सून, जो विशेषतः तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात पडतो.
मान्सून जेव्हा भारताच्या दिशेने येतो, तेव्हा तो दोन भागांमध्ये विभागतो. एक भाग अरबी समुद्राच्या बाजूने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने येतो, तर दुसरा भाग बंगालच्या उपसागरातून ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमार्गे हिमालयात जातो आणि मग गंगेच्या खोऱ्याकडे वळतो. त्यामुळे देशात वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आणि वेळ वेगळी असते.
भारतीय हवामान विभाग (IMD) दरवर्षी 10 मेनंतर कधीही नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत घोषणा करण्याचा प्रयत्न करतो. तसेच काही वैज्ञानिक निकष तपासूनच मान्सूनची अधिकृत घोषणा केली जाते:
पर्जन्यमान (Rainfall): केरळ आणि आजूबाजूच्या 14 हवामान केंद्रांपैकी किमान 60% केंद्रांवर सलग दोन दिवस 2.5 मिमी किंवा अधिक पाऊस पडणे.
वारा (Wind field): पश्चिमेकडून 15–20 नॉट वेगाने वारे वाहत असावेत.
आऊटगोइंग लॉन्गवेव्ह रेडिएशन (OLR): विशिष्ट क्षेत्रात OLR (Out-going Longwave Radiation) 200 W/m² पेक्षा कमी असावा.
या वर्षी मान्सूनने 13 मे रोजी अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागात आगमन केले. ही तारीख नेहमीच्या म्हणजेच 21 मेच्या तुलनेत आठवडाभर लवकर आहे. हवामान विभागाने सांगितले की, यंदाचे मान्सून आगमन अतिशय अनुकूल हवामानाच्या परिस्थितीत झाले. यामागे काही मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या हवामान बदलांचा तसेच स्थानिक पातळीवरील हवामानातील घडामोडींचा देखील प्रभाव आहे.
- मान्सून ट्रफ:
कमी दाबाचा पट्टा जो उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचतो. याची हालचाल पावसावर परिणाम करत असते.
- मस्करेन हाय:
दक्षिण हिंद महासागरातील उच्च-दाबाचा प्रदेश. याचा परिणाम पावसावर आणि वाऱ्यांच्या वेगावर होतो.
- कन्वेक्शन वाढ:
वायुमंडलातील उष्णता आणि आर्द्रतेचा उर्ध्वगामी प्रवाह वाढल्याने ढग निर्माण होऊन पाऊस होतो.
- मैडन-जूलियन ऑसिलेशन (MJO):
हे महासागरातील हवामान चक्र आहे जे जगभर फिरतं. अनुकूल परिस्थितीत भारतात पावसाची शक्यता वाढवतो.
- हीट-लो:
उन्हाळ्यात पाकिस्तान व आजूबाजूच्या भागात तयार होणारा तीव्र उष्णदाबाचा क्षेत्र दमट वाऱ्यांना खेचून आणतो.
- ऑनसेट वॉर्टेक्स आणि प्रेशर ग्रेडिएंट:
अरब सागरात तयार होणारे चक्रवाती वारे आणि दाबातील फरक देखील मान्सून सुरुवातीला गती देतात.
- सोमाली जेट:
एक विशिष्ट प्रकारची जलद वाऱ्यांची पट्टी जी अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रभाव टाकते. यामुळेही वारे वेगाने पुढे येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.