गंगूताईंचा फोन आला, त्यानंतर नक्की काय करावं सुचत नव्हतं.. स्वप्नील दोन दिवसांपूर्वीच पुण्याला कामासाठी आला होता, गाडी घेऊन महाबळेश्वरला गेलेल्या आमच्या केअरटेकरलासुद्धा पुढचं वाहन मिळेपर्यंत शेतावर परतणं शक्य नव्हतं.. स्वप्नीलला कदाचित घडलेल्या प्रसंगाबद्दल काहीच माहीत नव्हतं. मीसुद्धा त्याला फोन करू की नको, या विवंचनेमध्ये होते.
जवळजवळ वीस दिवस शेतावर कोणीच नव्हतं. जे कामाला होते त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे ते सुट्टीवर गेले होते. स्वप्नील कार्बन आणि हनिवाबरोबर शेतावर वीस दिवस एकटाच होता. एकट्यानं शेत सांभाळणं, सकाळ-संध्याकाळ झाडांना, रोपांना पाणी देणं, स्ट्रॉबेरीची राखण करणं, पहाटे उठून स्ट्रॉबेरी तोडून काही पुण्याला पाठवणं आणि उरलेल्या स्ट्रॉबेरीचा जॅम तयार करणं; कार्बन, हनिवाला सांभाळणं (तेही अजिबात सोपं नाहीये- कारण हनिवाचे गावामधले रोजचे उद्योग हे आता ठरलेले आहेत) आणि त्यानंतर कंपनीचं काम आणि घरकाम हेही असतंच.
मी महाबळेश्वरमध्ये असताना कामं आपसुक वाटली जातात; पण एकट्यानं सगळं करणं- याबाबतीत स्वप्नीलला मानलंच पाहिजे. अक्षरशः दोन दिवसांपूर्वी सुट्टी संपून अंकुश परत आला होता आणि स्वप्नील पुण्याला येऊन थांबला होता. अर्थातच प्रचंड थकलेला होता.
स्वप्नीलला फोन न करण्याचं कारण हे फक्त तो थकला असेल एवढ्यापुरतं नव्हतं; पण ‘घर पेटलंय, शेत जळतंय’ हे मी त्याला कसं सांगू शकले असते? शेतावरची प्रत्येक वनस्पती, प्रत्येक झाड, त्या झाडावर कुठले पक्षी राहतात, छोट्या रोपांवर कुठली फुलपाखरं असतात.. हे सगळं त्याला माहीत आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीबरोबर त्याची नाळ जोडली गेली आहे.
मी शेतावर गेल्यावर पहिले दोन तास त्याच्या याच सगळ्या गप्पा चालू असतात, ‘या भाजीला ‘बालगा’ म्हणतात. आपल्या वाटत होतं, जंगली काहीतरी आहे; पण मला कालच कळलं, की ही रानभाजी आहे आणि अत्यंत चविष्ट असते. आपल्या शेतावर केवढी आहे बघ! निसर्ग देत असतो.. आपल्यालाच माहिती नसतं काय घ्यायचं.
‘मोमो बघ, गणूमामा (आमचे शेतात मदतीला असलेले मामा) म्हणत होते ना, हे ‘भोम्याचं झाड’ कशाला ठेवताय. साफ करून टाका सगळं. बांध कसा चकाचक दिसेल! बघ त्याला फुलं आली आहेत, त्यातला मध गोळा करायला माश्या आल्या आहेत आणि माश्यांना खायला ‘व्हर्डिटर फ्लाय कॅचर’ (या पक्ष्याचं दर्शन अत्यंत दुर्मीळ असतं.) आले आहेत. आपल्या शेतावर निसर्गचक्र काम करायला लागलंय...’ (त्या निळ्याभोर पक्ष्याला बघण्यात आमचे चार-पाच तास कसे गेले आम्हाला कळलंही नव्हतं.)’
हसतहसत ही सगळी माहिती तो मला देत असतो. या निसर्गचक्राला नैसर्गिक रीतीनं गती द्यायला गेली पाच वर्षं त्याची आणि पर्यायानं आमची अविरत मेहनत चालू आहे. कसं सांगायचं त्याला, की कदाचित परत नव्यानं सुरुवात करायला लागणार आहे? कदाचित ते भोम्याचं झाड नसेल उद्या तिथं..
फार विचार करायला वेळ नव्हताच. आणि जिथे आमच्या हातातून गोष्टी सुटतात, तिथं कायमच आम्ही संतोष अप्पांना फोन करतो...
‘मॅडम, मला दिसत आहे इकडून, मी गाडीतच बसतोय, काही पोरांना पुढे शेतावर पाठवलं आहे. मी बघतो काय झालं आहे ते आणि तुम्हाला फोन करतो. तुम्ही काळजी करू नका. मी आहे....’ फोन केल्यावर मी ‘हॅलो’ म्हणायच्या आधी अप्पा हे सगळं बोलून मोकळे झाले होते. ‘काळजी करू नका, मी आहे!’ हे वाक्य म्हणणारी व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात आहे ती माणसं खरी श्रीमंत आहेत असं मी म्हणेन.
एव्हाना मी गाडीमध्ये जाऊन बसले होते, गाडी सुरू केली होती आणि मनाची पूर्ण तयारी केली होती, की तातडीनं निघून महाबळेश्वर गाठायचं. तेवढ्यात स्वप्नीलचा फोन आला, ‘‘मोमो, कुठे आहेस?’’ त्याच्या आवाजामध्ये काळजी होती; पण त्याहून जास्त माझा अंदाज घेण्याचा प्रयत्न होता, कदाचित तोही हाच विचार करत होता, की मला कसं सांगावं.
आवाजामध्ये कमालीची शांतता ठेवून त्यानं मला सांगितलं वणवा लागलाय. मी त्याला पुढची बातमी दिली, की संतोष अप्पा आणि गावातली काही मुलं घरी गेली आहेत.
‘अच्छा तुला कळलं आहे...’
पुढचे जवळजवळ पाच ते दहा सेकंद आम्ही दोघंही फोनवर शांत होतो. ती शांतता पुरेशी बोलकी होती. मला रडायला येत नव्हतं. करण महाबळेश्वरचा आत्तापर्यंतचा प्रवास, आम्हाला इतका जास्त शिकवून, किंवा स्ट्रॉंग करून गेलाय, की ‘रडायच्या’ आधी ‘लढायचं’ हे आमचं ठरलं आहे.
(क्रमशः)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.