esakal | चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात 'किसींग'ने का होते? |Kissing
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात 'किसींग'ने का होते?

चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात 'किसींग'ने का होते?

sakal_logo
By
टीम ईसकाळ

अनेक चित्रपट तुम्ही पाहात असाल. मागील दोन वर्षांपासून सिनेमागृह बंद असल्याने नेटफ्लिक्स, हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे पाहिले असतील. सिनेमांमध्ये घडणारे प्रसंग, त्यातील घटना आपल्या आयुष्याशी आपण रिलेट करायचा प्रयत्न करत असतो. अनेकदा नट आणि नटीत घडणाऱ्या श्रृंगाराबद्दलही आपण मतं मांडत असतो. चित्रपटातले काही सीन्स तुमचं लक्ष वेधतात. यामध्ये इंटिमेट सीन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. असे सीन्स अनेकांना उत्तेजित करतात. तर काही जणांना घृणास्पद सुद्धा वाटू शकतात.

काही व्यक्तींचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित असतो. अशा व्यक्तींना टीव्हीवर दाखवले जाणारे शारीरिक संबंध अप्रिय वाटू शकतात. पण सिनेमांमध्ये दाखवलं जाणारं चित्रण हे बहुधा काल्पनिक जगाचा भाग असतं. अगदी सत्य घटनेवर आधारित सिनेमे सुद्धा मसाला लावून सादर केल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण सिनेमांमध्ये चित्रित होणाच्या शारीरिक संबंधांबद्दल अनेकांना ओढ असते. पडद्यामागे घडणाऱ्या घटना जाणून घेण्यात त्यांना रस असतो. पण शारीरिक संबंध, त्यासाठीचा रोमान्स आणि समागमाशी निगडित विषयांवर बोलताना अनेकांना संकोच वाटतो. अशांसाठी हा लेख!

सिनेमांमध्ये सेक्स सीन्सची सुरुवात किंसींगनेच का?

जवळपास सर्व सिनेमांमध्ये सेक्स सीन्स किंवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक संबंधांच्या चित्रणाची सुरुवात नट आणि नटीच्या किसींगने होते. समलैंगिकतेवर आधारित सिनेमेही याच प्रकारे पुढे जातात. दोन व्यक्तींमध्ये होणाऱ्या प्रणयाची सुरुवात चुंबनानेच का व्हावी, किंवा प्रत्यक्ष जीवनात असे प्रसंग बहुधा चुंबनापासूनच का सुरू व्हावे, असे प्रश्न पडल्यास आपल्याला मानवी शरीराच्या संवेदना, त्याची रचना, मानसिकता आणि यामागील शास्त्र समजून घेतलं पाहिजे.

सेक्सोलॉजिस्ट डॉ. विवेक बिलमपल्ली यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. किसींगमध्ये समर्पणाचा संकेत असल्याचं ते म्हणतात. पण भारतातील शारीरिक संबंधांवर चित्रपट नाही, तर पॉर्नोग्राफीचा पगडा असल्याचं त्यांनी म्हटलंय. याचा अर्थ आपल्याकडे झिरपणारे शारीरिक संबंध आणि समागमाची कला ही पॉर्नोग्राफीवरून अनुसरलेली आहे. भारत आणि पाकिस्तानात पॉर्नसाठी मोठी बाजारपेठ आहे, असे डॉ. बिलमपल्ली म्हणाले. ज्या संस्कृतीत शारीरिक संबंधांना दुय्यम स्थान असतं. जिथे सेक्स दडपशाहीच्या आहारी जातं, ज्या ठिकाणी लोक शारीरिक संबंधांबद्दल उघडपणे आणि खुल्या मनाने बोलण्यापेक्षा न्यूनगंड बाळगून असतात, अशा ठिकाणी पॉर्नचं मार्केट फोफोवत असल्याची माहिती त्यांनी दिली. कुतूहल वाढलं की मार्केट वाढतं, असे म्हणाले.

हेही वाचा: किस करताय? 'शास्त्र असतं ते!'

प्रत्येक शरीराला 'इरोजिनस झोन्स'...पण सुरुवात ओठांनीच का?

ओठांसोबतच आपल्या शरीरात अनेक उद्यपीत करणारे भाग(स्नायू) असतात. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा अंगाला नुस्ता हात लागल्याने देखील उद्यपीत झाल्याची भावना मनात जागी होते. काहींच्या अंगावर शहारे येतात. शरीराच्या स्पर्शाबद्दल 'सेंसरी कॉर्टेक्स' नावाचा मेंदूचा एक भाग त्याला सतत चेतना देत असतो. या भागात शरीराला होणारे सर्व स्पर्श पोहोचवले जातात. बदललेल्या स्पर्शानुसार तुमच्या प्रत्युत्तर आणि प्रतिसाद देण्याच्या भावनेत बदल होतो, असे डॉ. बिलमपल्ली यांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक संवेदनशील भाग ओठ आहेत. लहान मूल जन्माला आल्यानंतर कोणतीही गोष्ट ओठांना लावून तोंडात घालत असतं. कारण लहान मुलांना वस्तू, तापमान, वेग या गोष्टी ओळखण्याचे ज्ञान त्यांच्या वाढीनुसार प्राप्त होते. तोपर्यंत स्पर्शानेच वस्तूंचा अंदाज ते बांधत असतात.

शरीरात उद्यपीत करणाऱ्या भागांमध्ये मान, कान, स्तन, नितंब, मांडीचा अंतर्गत भाग, यांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक शारीरिक संबंधाची सुरुवात ओठांपासूनच होईल, याची शाश्वती नसते. काहींना ओठांपेक्षा अन्य अवयवांपासून सुरुवात केल्यास आणखी सुख मिळते. एका ३२ वर्षांच्या विवाहित महिलेने नाव न घेण्याच्या अटीवर 'सकाळ'ला त्यांच्या आयुष्यातील काही वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. पतीसोबत झालेल्या पहिल्या शारीरिक संबंधांनंतर आमच्यात एकदाही ओठांनी समागमाची सुरुवात झाली नाही, असा अनुभव या महिलेने शेअर केला.

जिथे स्त्री 'उपभोग्य वस्तू', तिथे चुंबनाचं महत्व दु्य्यम!

पुरुष प्रधान संस्कृतींमध्ये स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि मानवी पातळीवरही दुय्यम स्थान मिळतं. अशा ठिकाणी स्त्रियांना उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं जातं. यामुळे शारीरिक संबंधांमध्येही पुरुष वरचढ राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे शारीरिक संबंधांमधील रोमान्स कमी होऊन चुंबनाची प्रक्रिया मर्यादित राहते. दोन्ही शरीरांना सेक्ससाठी तयार होण्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा वेळ मिळत नाही. अशा पुरुषांवर सतत 'परफॉर्मन्स अँझाईटी'चा दबाव असतो, असे डॉ. बिलमपल्ली म्हणाले. चुंबनापेक्षा थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यावर पुरुषांचा भर असतो. त्यात जास्त काळ टिकण्यावर पुरुषांचा अट्टाहास असतो. यामुळे अनेकजण पुन्हा पॉर्नोग्राफीच्या आहारी जातात. मात्र पॉर्नमध्ये गोष्टी अतिरंजीत आणि अशास्त्रीय पद्धतीने दाखवल्याने त्याच अंमलात आणल्या जातात आणि सेक्स एज्युकेशनचे वाभाडे निघतात.

Sex Scene Coordinator| 'असे' प्रसंग चित्रीकरणासाठी समन्वयक?

चित्रपटांमध्ये शूट होणाऱ्या शारीरिक संबंधांचे प्रसंग हाताळण्यासाठी पश्चिमी देशात सेक्स सीन को-ओर्डिनेटर असतात. त्यांना इंटिमेट सीन डायरेक्टरही म्हणतात.

चित्रीकरणादरम्यान सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दोन व्यक्तींमधील केमिस्ट्री असते. ती जितकी जास्त तितका सीन प्रभावी होतो. मात्र या केमिस्ट्रीसाठी नट-नटी दोघांनाही एका कम्फर्ट झोनमध्ये आणलं जातं. त्यांना अशाप्रकारचे सिन करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्यात येतं. तसेच या प्रक्रियेतील सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे काही सिन्सचे रिटेक घेताना नट किंवा नटी अस्वस्थ होऊ शकतात. ही अस्वस्थता संपूर्ण सीनमधील भावनिक स्पर्श कमी करू शकते, याचा थेट परिणाम चित्रीकरणाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.

सेलिब्रिटींचे शारीरिक संबंध पाहण्यासाठी चाहते अतूर असतात. माध्यमांमध्ये अशा चित्रीकरणावर चर्चा घडतात. तसेच सर्वसामान्यांना या विषयाचं आकर्षण असतं. त्यामुळे अशा प्रकारचे सीन प्रभावीपणे शूट करणं आव्हान असल्याचं दिग्दर्शक सांगतात.

loading image
go to top