esakal | कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर ८ आठवड्यांचं का?

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर ८ आठवड्यांचं का?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता देशातील कोरोना लसीकरणात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील अनेकांनी कोरोना लस देण्यात आली असून ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. सध्या देशात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचे डोस देण्यात येत आहेत. मात्र, ही लस घेण्यावरुन अनेकांमध्ये मतमतांतरे आहेत. तर, नागरिकांमध्ये समज-गैरसमज आहेत. त्यातच कोविशिल्डच्या लसीचे दोन डोस घेतांना यात ५ ते ८ आठवड्यांचं अंतर ठेवावं लागत आहे. याविषयी केंद्राने राज्य सरकारला तशा सुचनाही दिल्या आहेत. परंतु, इतकं अंतर का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे कोविशिल्डची लस घेतांना ५ ते ८ आठवड्यांच्या कालावधीचं अंतर का ठेवतात ते जाणून घेऊयात.

कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. हा पहिला डोस घेतल्यावर अँटीबॉडी हळूहळू तयार होतात. या अँटीबॉडीच्या माध्यमातून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्राथमिक स्तरावर वाढते. त्यानंतर ८ आठवड्यांनंतर कोरोनाची दुसरी लस देण्यात येते. या लसीला बूस्टर डोस असंही म्हणतात.

हेही वाचा: Corona virus: जाणून घ्या, मुंबईत कुठं उपलब्ध आहेत बेड

बूस्टर डोस दिल्यावर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वेगाने काम करु लागते. यादरम्यान अनेकांवर त्याचे दुष्परिणामदेखील होतात. परंतु, हे दुष्परिणाम म्हणजे ही लस काम करते असा त्याचा अर्थ होतो. दुसरा डोस घेतल्यावर अँटीबॉडी तयार होत नाही. तर, त्याऐवजी शरीरात लिंफ नोड्स तसंच इतर अवयवांना प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करतात.

दरम्यान, पहिल्या डोस दिल्यावर अँटीबॉडी तयार व्हायला वेळ लागत असल्यामुळे दुसरी लस ८ आठवड्यांनंतर दिली जाते. तसंच अनेक देशांमध्ये दोन लसीकरणांमध्ये नेमकं किती अंतर असावं याविषयी मतमतांतरे आहेत.